काही वर्षांपूर्वी कॅसेटचा जमाना होता. एका कॅसेटमध्ये भावगीतं, भक्तिगीतं, गझल, विरहगीतं अशी विविध प्रकारची गाणी असायची. मी विचार केला की, एकाच विषयावर गाणी का होऊ शकत नाही? मग मी आणि मिलिंद इंगळेनं 'समुद्र' हा विषय घ्यायचा ठरवला. समुद्र सगळ्यांनाच आवडतो. गावातल्या लोकांना त्याचं एक वेगळं आकर्षण असतं. तर शहरातल्या लोकांना तो वेगळ्या कारणासाठी आवडतो. तसाच मग 'पाऊस' हा विषय डोक्यात आला. पावसाळा हा माझा अत्यंत आवडता ऋतू! पावसाळी, हवंहवंसं वाटणारं वातावरण मला खूप आवडतं. मग विचारविनिमय करुन काही नवीन गाणी लिहिली. नवीन कविता लिहिल्या. काही चालींवर लिहिल्या. मिलिंद म्हणाला की 'तू या गाण्यांमध्ये तुझ्या कविता मध्ये-मध्ये म्हण. तो एक वेगळा प्रयोग होईल.' आणि 'गारवा' रसिकांच्या भेटीला आला. आजही 'गारवा' सगळ्यांना हवाहवासा वाटतो. माझं दुसरं पावसाचं गाजलेलं चित्रपटगीत म्हणजे 'ढग दाटूनी येतात'. चित्रपटासाठी आपल्याला एक प्रसंग दिलेला असतो आणि त्यानुरुप आपल्याला गाणी लिहायची असतात. एक १६ वर्षांची, नुकतीच प्रेमात पडलेली आलेली तरुण मुलगी आहे. तिला तिच्या कॉलेजमध्ये एक गाणं गायचंय. तर तिच्या भावना नेमक्या काय असतील असा विचार करुन मी हे गाणं लिहिलं आणि अशोक पत्कींना दिलं. ते गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. हैदोस घालणारा पाऊस मला स्वत:ला आवडत नाही. 'गारवा'मधला होता तो हळुवार, एकमेकांना प्रेमात पडायला लावणारा, बालपणीच्या आठवणी ताज्या करणारा पाऊस मला मनापासून आवडतो. असं किशोर कदम म्हणतात.

पाऊस प्रत्येकाला आवडतो तसा कलाकारांनाही आवडतोच. मी तर पाऊस जरा लांबला, की लगेच कासावीस होतो. पावसाचं धुंद करणारं वातावरण मला खूप आवडतं. पावसाची रुपं इतकी असतात की लहानपणापासूनचा तो वेगवेगळा आठवतो. कधी बालपणात घेऊन जातो. कधी रोमँटिक वाटतो, कधी उदासीत भिजवतो, कधी व्याकूळ करतो तर कधी अंतर्मुख करतो. त्यामुळे कविता आणि गाणीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असतात. 'अग्गोबाई ढग्गोबाई'मध्ये माझ्या बालपणीच्या आठवणी आहेत. गावाकडे मी पावसात खूप खेळायचो, भिजायचो, रेनकोट घालून अक्षरशः लोळायचो. आमच्या घराच्या बाजूनं वाहणारा ओढा लगेच मातीच्या रंगानं लाल होऊन वाहायचा. तेव्हा मला प्रश्न पडायचा, की एवढा चहा कुठे जातोय? तीच निरागसता या गाण्यांमध्ये आलीय. माझ्या 'सरीवर सर'ची पण अशीच आठवण आहे. एकदा मी आणि माझा मामा दुचाकीवरुन शेतातून घरी जात होतो. अचानक खूप मुसळधार पाऊस सुरू झाला. मग आम्ही आडोशाला थांबलो. तिथे भिजलेल्या एका कागदावर मी ती कविता लिहिली. तिथेच त्या चालीनंही जन्म घेतला. मी घरी आल्यावर मग ती कविता नीट लिहिली. पावसाच्या अशा अनेक आठवणी मनात बंदिस्त आहेत. कवितांच्या रुपानं त्या बाहेर येत असतात. आपल्या आवडत्या माणसाला जसं आपण त्याच्या गुण-दोषांसकट सांभाळतो, तसंच पावसाचंही असतं. पाऊस हा ओढ लावतो तसाच अनेकदा नकोसाही होतो.

- संदीप खरे

( गीत - अग्गोबाई ढग्गोबाई, आल्बम - अग्गोबाई ढग्गोबाई

गीत - सरीवर सर, अल्बम - दिवस असे की )

प्रेमासारखी सामर्थ्यवान गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे पाऊस आहे असं मला वाटतं. आपण उन्हाळ्यात कडक उन सहन केलेलं असतं. त्यामुळे पावसाळा आला की आपण सुखावतो. सगळी नकारात्मकता धुऊन काढतो. मला पाऊस इतका जवळचा आहे, की माझ्याबरोबर तो कायम असावा असं मला वाटलं. म्हणून मी स्वत: डिझाईन काढून त्याचा टॅटू करुन घेतलाय. 'भिजून गेला वारा' हे पावसाच्या जमून आलेल्या गाण्यांपैकी एक आहे असं मला वाटतं. 'इरादा पक्का' या चित्रपटाला नुकतीच दहा वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त सिद्धार्थ जाधवनं आम्हा सगळ्या कलाकारांबरोबर इन्स्टा लाइव्ह केलं. त्यात या चित्रपटाच्या अनेक आठवणींना उजळा मिळाला. या गाण्याचा किस्सा असा आहे की, नुकताच पाऊस सुरू झाला होता. संगीतकार निलेश मोहरीरला एक धून सुचली आणि त्यानं मला फोन करुन ती ऐकवली. मला ती खूप आवडली. पण, निलेशला ती काही फारशी रुचत नव्हती. त्यामुळे तो म्हणाला, 'जाऊ दे मी ही चाल बाजूला ठेवतो. मी त्याला म्हणाले, थांब मी तुला त्यावर काहीतरी लिहून देते. अवघ्या ५ मिनिटांत मी त्याला शब्द लिहून दिले. त्यानं ते त्या चालीत गायले आणि त्याला ते आवडले. मग तो मला म्हणाला की असेच सोपे आणि छोटे शब्द वापरुन दोन अंतरे पुढे लिहून दे. असं ते गाणं फोनवरच तयार झालं. पुढे सिनेमात आलं आणि लोकांनाही ते फार आवडलं. अशा अनेक गाण्यांच्या आठवणी पाऊस सुरू झाला की मनात रुंजी घालतात. पावसाचं आणि माझं असं खास नातं आहे.

- अश्विनी शेंडे - बगवाडकर

( गीत - भिजून गेला वारा, चित्रपट - इरादा पक्का )

वैशाख वणवा संपून ज्येष्ठ-आषाढ सुरू होतो आणि पाऊस लागतो. पावसाळा या ऋतूचं विशेष आकर्षण आहे. विरहानंतर प्रियकर - प्रेयसी भेटावे ना तशा आधी वेदना देऊन मग हा पाऊस येतो. जवळपास ३१ वर्षांपूर्वी 'रंग उषेचे' ही दीर्घ ध्वनिमुद्रिका आली. त्याआधी मीनाताईंनी मला सांगितलं की 'प्रवीण, गाणं तान्ह्या बाळाच्या जिवणीसारखं हवं. त्याचा शब्दबंध छोटा हवा.' माझी कसोटी होती. प्रभूकुंजच्या लतादीदींच्या घरी त्या जिथे रियाज करायला बसतात, त्या ठिकाणी मास्टर दीनानाथांची आणि स्वामी विवेकानंदाची तसबीर आहे, वीणा आहे. त्याच ठिकाणी बसून मला 'पाऊस पहिला जणू कान्हुला' या ओळी सुचल्या. मी आधी त्यात एक ओळ 'रंग निळा हा अंधाराला' अशी लिहिली होती. रेकॉर्डींगच्या वेळी उषाताईंनी मला बोलावून सांगितल की 'हा निळा रंग, पंक्तीला न बोलावता जेवायला आलेल्यासारखा वाटतोय. रंग निळाच, पण नाजूक आणि गोल हवा. तळहातावर मोती घेऊन आपण गोल गोल फिरवतो तसा हवा.' मला त्या रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये एसी असूनही घाम फुटला. आणि मग 'निळुला' हा शब्द सुचला. त्यांनाही तो आवडला आणि गाणं पूर्ण झालं. आजही अनेकांना पाऊस सुरू झाल्यावर हे गाणं आठवतं. माझं दुसरं गाजलेलं पावसाचं गाणं म्हणजे 'चिंब भिजलेले'. संगीतकार अजय-अतुल यांच्याबरोबर काम करणं म्हणजे संगीताच्या धबधब्याबरोबर काम करण्यासारखं आहे. त्यांनी आधी मला चाल दिली, मग मी त्यावर एका बैठकीत शब्द लिहिले. पुढे ते गाणं खूप प्रसिद्ध झालं. मी विसरुनही गेलो. मला तो चित्रपट बघायला मिळालं नाही. एकदा मी एकाची रिंगटोन म्हणून हे गाणं ऐकलं. आणि त्यांना विचारलं की हे गाणं कोणी लिहिलंय? तेव्हा त्यांनी मला आठवण करुन दिली की अहो, हे तुमचंच गाणं आहे. पाऊस आठवणींच्या जगात नेणारा असतो. पाऊस सुरू झाला की मध्यरात्री कधीतरी जाग येते आणि मी ४-५ कविता लिहितो.

- प्रवीण दवणे

(गीत - पाऊस पहिला, अल्बम - रंग उषेचे

गीत - चिंब भिजलेले, चित्रपट - बंध प्रेमाचे )

पाऊस हा प्रत्येक सर्जनशील माणसाला आवडतोच. पावसाळ्यात सगळ्यांनाच व्यक्त व्हावंसं वाटतं. मला कायम पाऊस हा संवादी ऋतू वाटतो. थांब रे, पड रे, कधी पडणार आहेस रे? अशा आपण त्याच्याशी गप्पा मारत असतो. विविध प्रकारच्या भावनांमध्ये पाऊस वापरला जातो. मी पहिल्यांदा पावसावर चारोळी फेसबुकवर लिहिल्या होत्या, तेव्हा त्या इतक्या प्रचंड व्हायरल झाल्या की मलाच माझ्या व्हॉटसअॅपवर थोड्या दिवसांनी अनेकांनी पाठवल्या. आजकाल चित्रपटांमध्ये बजेटमुळे वगैरे पावसाची गाणी खूप कमी वापरली जातात. जेव्हा गीतकार शब्दांनी पाऊस लिहितो, संगीतकार एखादा मल्हार रागासारखा राग वापरुन संगीत देतो, दिग्दर्शक ते छान पावसात चित्रीत करतो, तेव्हा त्या गीतकारानं लिहिलेल्या शब्दांना योग्य तो न्याय मिळतो. पाऊस हा आपल्याला हळवं करणारा ऋतू आहे असं मला कायम वाटतं. तेच हळवेपण आम्ही 'मन उधाण वाऱ्याचे' या गाण्यात वापरलंय. आयुष्याच्या विविध टप्प्यातील वेगवेगळ्या आठवणी जागवणारं हे गाणं अनेक जण त्यात पाऊस नसूनही पावसाळ्यात मनापासून ऐकतात. पावसाच्या विविध रुपांवर लिहायला मला कायमच आवडतं.

- गुरु ठाकूर

(गाणं- मन उधाण वाऱ्याचे, चित्रपट - अगंबाई अरेच्चा )

शब्दांकन : गौरी भिडे



from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gQamyv