मुंबई: केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागच्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून आंदोलन करत आहेत. ते सातत्यानं हा कायदा रद्द करण्याची मागणी करत आहेत. प्रजासत्तकदिनी दिल्लीत या आंदोलनाला हिंसक वळण मिळालं होतं. ज्यानंतर दिल्लीच्या सीमांवरील सुरक्षा वाढवण्यात आली असून ज्या ठिकाणी आंदोलन होत आहेत अशा जागांवर इंटरनेट सेवा रोखण्यात आली आहे. आता या आंदोलनावर आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहानानं आपली प्रतिक्रिया दिली आहे. मात्र यावर अभिनेत्री कंगना रणौतनं ट्वीट करून तिला उत्तर दिलं आहे. रिहानानं दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांमधून नव्या कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आपलं समर्थन दिलं आहे आणि हे आंदोलन थांबवण्यासाठी इंटरनेट बंद करण्यावर टीका सुद्धा केली आहे. रिहानानं तिच्या ट्विटर हॅन्डलवरून भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचं एक वृत्त शेअर केलं आहे. ज्यात आंदोलन सुरू असलेल्या भागातील इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आल्याचं म्हटलं आहे. हे वृत्त शेअर करताना रिहानानं लिहिले, ‘आपण यावर का बोलत नाही?’ रिहानाच्या या ट्वीटवर अभिनेत्री कंगना रणौतनं तिला उत्तर दिलं आहे. कंगनानं रिहानाला रिप्लाय देताना लिहिलं, ‘यावर कोणीही बोलत नाही कारण ते शेतकरी नाहीत तर दहशतवादी आहेत. जे देशाला तोडण्याचं काम करत आहेत. ज्यानंतर चीन आमच्या वेगळ्या झालेल्या प्रदेशांवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करेल आणि मग तिथे अमेरिकेप्रमाणे चायनिज कॉलनी उभी करू शकेल. तुम्ही मूर्ख आहात पण आम्ही आमचा देश असा विकत नाही आहोत. जसं तुम्ही मूर्ख लोकांनी केलं आहे.’ देशात सुरू असेलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन देणारी रिहाना ही पहिली सेलिब्रेटी नाही. याआधीही अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी या आंदोलनाला समर्थन दिलं आहे. ज्यात सोनम कपूर, प्रियांका चोप्रा, दिलजित दोसांज, स्वरा भास्कर यांचा समावेश आहे. मात्र कंगणा रणौत सुरुवातीपासून या शेतकरी आंदोलनाला विरोध करताना दिसली आहे. या संदर्भात दिलजित दोसांज आणि कंगनामध्ये ट्विटर वॉर देखील रंगलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36C5ytw