Full Width(True/False)

रणबीर करोना पॉझिटिव्ह, दूर राहूनही आलिया घेतेय त्याची काळजी

मुंबई: अभिनेता रणबीर कपूरची करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यानं स्वतःला घरीच क्वारंटाइन करून घेतलं असून त्याच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती रणबीरची आई नीतू कपूर यांनी एक इन्स्टाग्राम पोस्टमध्ये दिली होती. त्यांनी रणबीरला करोना झाल्याच्या वृत्ताला दुजोरा देत त्याच्यासाठी काळजी आणि प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे या पोस्टमध्ये आभार मानले होते. त्यानंतर आता रणबीरची गर्लफ्रेंड आलिया भट्टनंही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पाठोपाठ आलियाचा आगामी चित्रपट 'गंगूबाई काठियावाडी'चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची करोना चाचणी सुद्धा पॉझिटिव्ह आली. आलियाचा या दोघांशी मागच्या काही दिवसांपासून सतत संपर्क असल्यानं तिनंही आपली करोना चाचणी करून घेतली होती. पण तिचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. पण बॉयफ्रेंड रणबीरसाठी मात्र तिनं इन्स्टाग्रामवर एक मोटिव्हेशनल पोस्ट लिहिली आहे. आलियानं तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यातून त्याचं मनोबल उंचावण्याचा प्रयत्न तिनं केला आहे. ज्यात तिनं लिहिलं, 'आयुष्यात ज्या गोष्टींचा सामना करून आपण पुढे जातो. त्यातूनच आपण मोठे होतो.' रणबीरच्या आयुष्यात मागच्या वर्षभरात अनेक कठीण प्रसंग आले पण आलिया नेहमीच त्याच्यासोबत खंबीरपणे उभी राहिली. आताही ती त्याच्यापासून दूर असूनही अशाप्रकारे त्याची काळजी घेताना दिसत आहे. दरम्यान काही मीडिया रिपोर्टनुसार रणबीर कपूरला 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटवर करोनाचा संसर्ग झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलियाची सुद्धा महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याशिवाय 'गंगूबाई काठियावाडी'चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी मागच्या काही दिवसांपासून त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बिझी होते. अशात त्यांच्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर 'गंगूबाई काठियावाडी'चं शूटिंग लगेचच थांबवण्यात आलं आहे. तसेच भन्साळी यांच्या जवळपास राहणाऱ्या आणि त्यांच्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची करोना चाचणी करण्यात आली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38rU8tl