मुंबई- आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या आणि आपल्या विनोदाच्या जबरदस्त टायमिंगने प्रेक्षकांना खदखदून हसवणाऱ्या मराठी चित्रपटसृष्टीतील या अवलिया कलाकाराला कोण नाही ओळखत? मराठी चित्रपटसृष्टीत 'मामा' म्हणून ओळखले जाणारे अशोक सराफ आजही प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य करत आहेत. मराठीप्रमाणे बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचे झेंडे रोवणाऱ्या सराफ यांनी आजवर यशाची अनेक शिखरं सर केली. परंतु, त्यांचा हा प्रवास साधासोपा कधीच नव्हता. आज ४ जून रोजी अशोक सराफ त्यांचा ७४ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया मामांच्या आयुष्यातील काही खास गोष्टी. वडिलांच्या इच्छेसाठी करायचे बँकेत नोकरी अशोक मामा यांची आवड सुरुवातीपासूनच अभिनय क्षेत्राकडे होता. परंतु, सर्वसामान्य घरातील वडिलांप्रमाणे त्यांच्याही वडिलांनी मामांना बँकेत नोकरी करायला सांगितली. वडिलांच्या इच्छेसाठी त्यांनी तब्बल १० वर्ष स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी केली. परंतु, त्यानंतर मात्र नोकरीत मन न रमल्याने त्यांनी अभिनय क्षेत्राकडे वळायचं ठरवलं. नाटकातून केली अभिनयाची सुरुवात अशोक यांनी पहिल्यांदा लोकप्रिय मराठी लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांच्या 'ययाति' पुस्तकावर आधारित नाटकात काम केलं. त्यांनतर त्यांनी अनेक नाटकं केली. त्यातून यश मिळायला लागल्यावर त्यांनी त्यांचा मोर्चा चित्रपटांकडे वळवला. त्यांना निर्मात्यांकडून चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या. चित्रपटांमध्ये काम करताना लाभली नशिबाची साथ अशोक मामांनी सुरुवातीला काही चित्रपटात काम केलं परंतु ते खास कमाल दाखवू शकले नाहीत. त्यानंतर १९७५ साली आलेल्या 'पांडू हवालदार' या चित्रपटातून मामांना खरी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर मामांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. ते मराठी चित्रपटसृष्टीचा सुपरहिट चेहरा झाले. अशोक यांना का म्हणतात मामा एका चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कॅमेरामन त्याच्या मुलीला अशोक सराफ यांना भेटवण्यासाठी घेऊन आला होता. त्याने दुरूनच बोट करत आपल्या मुलीला सांगितलं, 'ते बघ तुझे अशोक मामा.' त्यानंतर त्या मुलीसोबतच सेटवरील सगळेच अशोक यांना मामा म्हणून हाक मारू लागले आणि संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी अशोक यांना मानाने मामा म्हणू लागली. हिंदी चित्रपटातही केलं आहे काम मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणे अशोक सराफ यांनी बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. बॉलिवूडचे प्रेक्षकही त्यांच्या अभिनयाचं कौतुक करतात. 'करण अर्जुन' चित्रपटातील त्यांचा दुर्जन सिंह असो किंवा मग 'सिंघम' चित्रपटातील हेड कॉन्स्टेबल असो. त्यांच्या अभिनयाची जादू त्यांनी सर्वत्र पसरवली. ९० च्या दशकात प्रचंड गाजलेली 'हम पांच' मालिका आजही कोणी विसरलेलं नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3z38nQX