मुंबई: नेहमी आपल्या कॉमेडीनं सर्वांना हसवणारा युट्यूबर भुवन बामच्या आयुष्यात करोनामुळे दुःखाचा डोंगर कोसळलेल याची कोणी कल्पनाही केली नसेल. आपल्या आई-वडिलांना गमावणं हे सर्वांसाठीच कठीण असतं. करोना व्हायरसच्या या लाटेत भुवननं आपल्या आई- वडिलांना गमावलं. त्यानंतर आता त्यानं इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याची ही भावुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. भुवन बामनं एका महिन्यातच त्याची आई आणि वडील दोघांनाही गमावलं आहे. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, 'करोनामुळे मी माझ्या दोन्ही लाइफलाइन गमावल्या. आई- बाबांशिवाय आता काहीच पूर्वीसारखं वाटत नाही. महिन्याभरातच होत्याचं नव्हतं झालं आहे. सर्व काही उध्वस्त झालं, माझं घर, स्वप्नं, सर्वकाही. माझी आई माझ्याकडे नाही, बाबा माझ्यासोबत नाहीत. आता पुन्हा सर्व सुरुवातीपासून सुरू करावं लागणार आहे. पण माझी आता तशी इच्छाही होत नाहीये.' आपल्या आई-वडिलांना गमावल्यानंतर भुवननं स्वतःवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानं आपल्या पोस्टमध्ये पुढे लिहिलं, 'मी एक चांगला मुलगा होतो का? मी त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला का? आता या आणि अशा सगळ्याच प्रश्नासोबत मला जगावं लागणार आहे. त्यांना पाहण्यासाठी मी आणखी वाट नाही पाहू शकत. तो दिवस लवकरच यावा अशी इच्छा आहे.' दरम्यान भुवनच्या मित्रांनी आणि काही बॉलिवूड सेलिब्रेटींनी त्याचं सांत्वन केलं आहे. श्रिया पिलगांवकर, राजकुमार राव, ताह‍िरा कश्यप, मुकेश छाब्रा, शर्ली सेठ‍िया, दीया मिर्जा यांसारख्या कलाकारांनी भुवनचं सांत्वन करत त्याच्या आई-वडिलांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. राजकुमार रावनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'तुझं जे नुकसान झालं त्यासाठी मी खूपच दुःखी आहे. तू खूप काही केलं आहे. मी माझ्या आई-वडिलांना गमावलं आहे. त्यामुळे मी तुला हे नक्की सांगू शकेन की, ते आपल्याला सोडून कधीच जात नाही त्यांचे आशीर्वाद नेहमीच आपल्यासोबत असतात.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pNVNkp