वेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठ चौदा विद्या, चौसष्ठ कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचं आगमन यावर्षीही उत्साहात होणार यात शंका नाही. छोट्या पडद्यावरही बाप्पा विराजमान होणार आहेत. अनेक मालिकांमध्ये कथानकांच्या माध्यमातून तर काही मालिकांच्या सेटवर बाप्पा येणार आहेत. 'वेध भविष्याचा' या कार्यक्रमात गणेशोत्सवानिमित्त अनेक कलाकार प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून ते गुरुजींशी गप्पा मारताना दिसणार आहेत. नुकत्याच सुरू झालेल्या 'माझी तुझी रेशीमगाठ'मधील प्रार्थना बेहरे, श्रेयस तळपदे, मायरा वैकुळ आणि इतर कलाकार गणेशोत्सव साजरा करण्यासाठी 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर उपस्थित राहणार आहेत. 'मन उडू उडू झालं', 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकांमधून बाप्पा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'तू सौभाग्यवती हो' या मालिकेतील जाधव वाड्यात गौरी गणपतीचं उत्साहपूर्ण वातावरणात आगमन होणार आहे. 'आई कुठे काय करते', 'रंग माझा वेगळा', 'फुलाला सुगंध मातीचा', 'मुलगी झाली हो', 'सुख म्हणजे नक्की काय असतं', 'सांग तू आहेस का' यासह इतरही मालिकांमधील कलाकार एकत्र येऊन ढोल ताशांच्या गजरात गणेशोत्सव साजरा करणार आहेत. विशेष बाब म्हणजे सगळ्या मालिका मिळून परिवाराचा एकच गणपती बसवणार आहेत. 'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत ढाले पाटलांच्या घरी मोठ्या जल्लोषात बाप्पा विराजमान होतील. संजूवर कामाची आणि घरची अशा दोन्ही जबाबदारी असल्यानं ती यंदा बाप्पाची ऑनलाइन आरती करताना दिसणार आहे. 'सोन्याची पावलं' मालिकेत गणपतीसह गौरीदेखील विराजमान होणार आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात मालिकांमधून परंपरा आणि संस्कृती, कर्तव्य आणि भक्ती यांची सुंदर सांगड प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'च्या गणेशोत्सव विशेष आठवड्यात या मंचाशी अतूट नातं असलेल्या अभिनेत्री पल्लवी जोशी आणि संगीतप्रेमींचा आवडता गायक स्वप्निल बांदोडकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पल्लवी अनेक जुन्या आठवणींना उजळा देणार आहेत. तसंच यंदाच्या वर्षी या कार्यक्रमाच्या मंचावरदेखील बाप्पा विराजमान होणार आहेत. विशेष बाब म्हणजे ही गणरायाची मूर्ती सर्व लिटिल चॅम्प्सनं मिळून बनवली आहे. आपल्या आजूबाजूला वाईट वृत्ती असलेली काही माणसं असतात. या वृत्तीवर मात करून सणाचं पावित्र्य कसं राखलं जातं हे यंदाच्या गणपती विशेष भागात बघता येणार आहे. मालिकेतील मंडपाचा भाग चित्रित करताना तिथे उपस्थित सगळ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. लसीकरण, सुरक्षित अंतर या सर्व सरकारी नियमाचं पालन करून चित्रीकरण करण्यात आलं आहे. - मंदार देवस्थळी, दिग्दर्शक (मन उडू उडू झालं) यंदाचा गणेशोत्सव मालिकेतील संजूसाठी नक्कीच वेगळा असणार आहे. कारण गणेशोत्सवात पोलिसांना सज्ज राहावं लागतं. पण संजू कुटुंब आणि पोलिसाचं कर्तव्य पार पाडत गणेशोत्सव साजरा करणार आहे. - शिवानी सोनार, अभिनेत्री (राजा रानीची गं जोडी)


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3zXMdQo