Full Width(True/False)

अभिनेते अमोल पालेकर इस्पितळात भरती, वाचा आता कशी आहे तब्येत

पुणे- न्यूज : १९७० आणि ८० च्या दशकात समांतर आणि अर्थपूर्ण सिनेमाचे नायक म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारे अभिनेते अमोल पालेकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमोल पालेकर यांच्या पत्नी संध्या गोखले यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, 'अमोल पालेकर यांच्या प्रकृतीबद्दल काळजी करण्यासारखे काही नाही. ते आता बरे होत आहेत आणि त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा खूपच चांगली आहे.' अमोल पालेकर यांच्या आजाराबद्दल सांगताना त्यांच्या पत्नी म्हणाल्या की, 'हा त्यांचा जुना आजार आहे. अति धुम्रपानामुळे त्यांना १० वर्षांपूर्वी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. पण आता त्यांची तब्येत चांगली आहे.' ७० आणि 80 च्या दशकात अमोल पालेकर यांनी रजनीगंधा, छोटी सी बात, नरम गरम, गोलमाल, चितचोर, भूमिका, श्रीमान श्रीमती, अनकही, रंग-बिरंगी, घरोंदा, सावन, बातों बातों में यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांत भूमिका साकारत मध्यमवर्गीय नायकाच्या रुपात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. अमोल पालेकर यांनी अभिनयाची सुरुवात १९७१ मधील सत्यजीत दुबे दिग्दर्शित शांतता! कोर्ट चालू आहे सिनेमातून केली होती. हिंदी-मराठी चित्रपटांचे अभिनेते असण्यासोबतच, अमोल पालेकर हे अनुभवी रंगभूमी कलाकार, दिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनही ओळखले जातात. २००५ मध्ये शाहरुख खान आणि राणी मुखर्जी अभिनीत 'पहेली' चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/yqL5DRU