Full Width(True/False)

शूटिंगच्या नवीन नियमांमुळं मालिकांंच्या सेटवर घडतायत गमतीजमती

जुन्या मालिका, जुने भाग पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांना सोमवारपासून त्यांच्या आवडत्या मालिकांचे नवीन भाग पाहायला मिळणार आहेत. तब्बल साडेतीन महिन्यांनंतर नवीन एपिसोड्स दिसणार असल्यानं प्रेक्षक सुखावले आहेत. पण, त्याबरोबरच प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्न आहे, करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, दुर्दैवानं मालिकांतल्या एखाद-दुसऱ्या मुख्य कलाकाराला करोनाची लागण झाली तर पुढे काय? पण, मालिकावाल्यांनी याचा विचार करून ठेवला आहे. लॉकडाउननंतर नव्या नियमांनुसार मालिकांच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. सेट्सवर पूर्ण खबरदारी घेतली जात असून, नियमांच्या चौकटीत राहून चित्रीकरण करताना अनेक गमतीजमतीही घडताहेत. एकमेकांपासून अंतर ठेवून संवाद साधताना नजरेनं संवाद साधणं, मास्क न विसरण्याचा टास्क, स्वत:च स्वत:चा मेकअप करणं अशा गोष्टी होत आहेत. त्यासाठी कोणी डोअर कीपर बनलंय, तर कोणी कलाकारांचा बॉस. नक्की कोणत्या गमतीजमती घडताहेत सेटवर ते सांगताहेत तुमचे लाडके कलाकार.

लॉकडाउननंतर सुरू झालेल्या चित्रीकरणाच्या नियमांनुसार सेटवर ३३ टक्के लोकच काम करत आहेत. त्यामुळे आम्हा सर्वांसाठी एकच मेकअपमन सेटवर आहे. आता तो मेकअप दादा (राकेश) खरं तर आमचा बॉस झालाय. आम्ही स्वतःचा मेकअप करत असताना काही चुकलं तर तो आम्हाला ते सांगत असतो. घरूनच जेवणासाठी ताट, वाट्या बरोबर आणत असल्यामुळे जेवून झालं की ते धुण्यासाठी आम्हा सर्वांची रांग असते. अनेकदा तर कोण आधी ताट धुणार यावरून गमतीत आमची भांडणंही होतात. त्यामुळे जणू काही नळावरची भांडणं आम्ही सध्या अनुभवतोय. आधी आम्ही बॉससारखे सेटवर वावरायचो आता मात्र सेटवरची ती सगळी मंडळी आमचे बॉस झाले आहेत. शिवाय, मेकअप नसल्यामुळे इतर कलाकारांबरोबर माझीही धावपळ होते. टचअप करण्यासाठी घरून आणलेला आरसा आणि तो बसवण्यासाठी जागा शोधायची, ती धडपड हे सगळे अनुभव घेत चित्रीकरण करण्याची मजा काही औरच आहे.

-तेजस बर्वे, अभिनेता

सध्या आमच्या मालिकेतील गोष्टीनुसार आमचं लग्नाच्या नंतरच्या दृश्यांचं शूटिंग सुरू आहे. नवीन लग्न झालेल्या जोडप्यामधील केमिस्ट्री यावेळी दाखवायची आहे. परंतु नवीन नियमांच्या चौकटीमुळे आमचा खूपच गोंधळ होतोय. लॉकडाउनपूर्वी चित्रीकरण करताना सहकलाकाराचा हात पकडणं, एकमेकांना मिठी मारणं अशी दृश्यं असायची. पण, आता लग्न झाल्यानंतर आणि करोनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच गोष्टी दाखवणं थांबवावं लागलं आहे. त्यामुळे शूटिंग करताना त्या गोष्टी फारच मजेशीर वाटताहेत. मालिकेच्या खऱ्या कथेपलीकडे जाऊन, केवळ खबरदारी म्हणून घेतले जाणारे सीन्स मला फार मजेशीर वाटतात. लिहिलेले सीन्स जसेच्या तसे सादर करणं आता कठीण होतंय आणि त्यावर शोधले जाणारे उपाय हे खरंच चित्रीकरण करताना मला गमतीशीर वाटतंय. सगळे नियम पाळून चित्रीकरण करणं हे आव्हानात्मक का आहे हे माझ्या लक्षात येतंय आणि मी ते अनुभवतोय.

-आशुतोष गोखले, अभिनेत्री

अनलॉकनंतर शूटिंग करताना खरंच खूप बदल जाणवताहेत. आधी होत होती तशी मजा-मस्ती करता येत नसली, तरी आमच्यातला प्रत्येक जण कामाचा आनंद घेत आहे. नियमांच्या चौकटीत राहून काम करणं अंगवळणी पडलं असलं, तरी शूटिंग सुरू झालंय हे मुळात खूप सुखावणारं आहे. आमच्यातील चर्चा किंवा कॅमेऱ्यासमोरील तयारी आम्ही मेकअप रूमध्ये करून येतो. मास्क किंवा इतर गोष्टी हा आपल्या सवयीचा भाग नसल्यामुळे अनेकदा त्या गोष्टींचा विसर पडतो. मग शाळेत जसं व्हायचं तसं प्रोडक्शनची माणस अचानक तिथे भेट देतात आणि विनामास्क कोणी थोडा वेळ जरी वावरताना दिसला की त्या व्यक्तिला हमखास ओरडा मिळतो. मलाही एकदा असा ओरडा मिळाला आहे. त्यामुळे स्वतःबरोबरच इतरांची काळजी करण्यासाठी आवश्यक असलेले हे नियम पाळले जात आहेत. त्याबरोबर हे अनेक मजेशीर किस्सेही घडत आहेत. शिवाय, एकमेकांना हवेतून टाळी देणं, चेहऱ्यावरील हावभावातून जास्तीत जास्त संवाद साधणं असे नवनवीन प्रयोग आमचे सुरू झाले आहेत.

-अश्विनी कासार, अभिनेत्री

पूर्वीसारखं सेटवर हशे, एकमेकांना दिलेल्या टाळ्या, आनंदानं मारलेल्या मिठ्या असा टाइमपास आता होत नाहीत. सगळे एकमेकांपासून विशिष्ट अंतर राखून असतात. त्यामुळे आता डोळ्यांची भाषा अधिक वापरली जाते. पूर्वी आम्ही एकत्र डबे खायचो. पण, आता तसं करता येत नाही. त्यामुळे आता व्हिडीओ कॉलिंग करून एकत्र डबा खाणं सुरू करण्याचा विचार आहे. सगळ्यांची कामाची वेळ आणि इतर सगळ्या गोष्टींचा विचार करता हे अजून शक्य झालेलं नाही. पण, लवकरच ते करण्याचं प्लॅनिंग आहे. आमच्या सगळ्या गप्पा, मजा-मस्ती व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून अधिकाधिक रंगतदार होतील. याबरोबरच, आमचं सादरीकरण झाल्यानंतर एकमेकांचं केलं जाणारं कौतुक-टाळ्या हे सगळ आम्ही खूप मिस करतेय. मेकअपरूम जवळ असलेले आम्ही सगळे जण मेकअप रूमचे दरवाजे उघडे ठेवून, दोन शेजारी कसे एकमेकांशी गप्पा मारतील तशा मनमुराद गप्पा मारतो. अनेकदा आपण मास्क लावलाय हे लक्षातच राहत नाही आणि मी तसाच माइक लावायला जाते. कॅमेऱ्यासमोर गेल्यावर ते लक्षात येतं आणि पुन्हा धावपळ होते.

- विशाखा सुभेदार, अभिनेत्री

पूर्वी चित्रीकरण जेवढं मोकळेपणानं करता येत होतं, तेवढा मोकळेपणा नक्कीच आता नाहीय. शूटिंगदरम्यान धमाल करणं, सीन्स झाल्यानंतर मस्तपैकी गप्पांचा फड रंगवणं, एकत्र बसून संवादांवर काम करणं अशा कोणत्याच गोष्टी आता अजिबात होत नाहीत. आपल्या रुममध्ये बसून आपला मेकअप स्वतः करणं, स्वतःचे डबे खाणं असाच प्रकार सध्या सुरू आहे. शिवाय, सेटवर सगळेच कलाकार नसल्यामुळे अनेक सीन हे केवळ कल्पना करूनच करावे लागतात. हे काही प्रमाणात हास्यास्पद वाटतं. शिवाय, अनेकदा मास्क तसाचा राहून कॅमेऱ्यासमोर जातो किंवा पासिंगमधील कुणीतरी मास्क काढायला विसरलेला असतो. त्यामुळे परत शॉट्स घ्यावे लागतात. ही सगळी एक वेगळीच मजा आहे. खरी गंमत तर मेकअप रूमचा दरवाजा किंवा बाथरूमचा दरवाज उघडताना होते. सतत सगळ्यांना हात धुवावे लागू नयेत म्हणून जी व्यक्ती पहिल्यांदा दाराला हात लावेल, त्याच्यावर त्या दिवशी दिवसभर दार उघडणं आणि बंद करण्याची जबाबदारी पडते. सगळेच ते काम एक गमतीचा भाग म्हणून आणि मजा म्हणून करतात.


-समीर खांडेकर, अभिनेता



from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eujF5j