मुंबई : गेली ४३ वर्षं ज्या गुलमोहराच्या झाडानं बच्चन कुटुंबाला साथ दिली, सावली दिली ते यंदाच्या पावसात उन्मळून पडलं. ते झाड कोसळलेलं पाहिल्यावर महानायक भावुक झाले होते. '...आणि आज ते सर्व दु:खांपासून दूर आहे. कुणालाही त्रास न देता शांतपणे ते उन्मळून पडलं', अशा शब्दांत बिग बींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या निमित्तानं लिहिलेल्या ब्लॉगमध्ये त्यांनी गुलमोहराच्या झाडासाठी कविता करत त्यांनी झाडाचं महत्त्वही सांगितलं. बच्चन यांच्या बंगल्याच्या परिसरात हे गुलमोहराचं झाड होतं. एका छोट्याशा रोपट्यापासून ते त्याचं वृक्षात रुपांतर होईपर्यंत गेली ४३ वर्षे ज्या गुलमोहराची देखरेख केली, ते झाड पावसात उन्मळून पडलं. त्या झाडाशी निगडीत अनेक आठवणी अमिताभ बच्चन यांनी नुकत्याच लिहिलेल्या ब्लॉगमध्ये सांगितल्या आहेत. गुलमोहराचं ते झाड त्यांच्या सुखदु:खात कसं सहभागी झालं होतं, जिथे अभिषेक-ऐश्वर्याचं लग्न झालं, ज्या झाडाजवळ अनेक सण कुटुंबियांनी मिळून साजरे केले अशा सर्व आठवणी त्यांनी या ब्लॉगमध्ये मांडल्या आहेत. त्यांनी लिहिलं आहे, '१९७६ मध्ये ज्या दिवशी आम्ही आमच्या पहिल्या घरात आलो होतो, तेव्हा हे छोटंसं रोपटं लावलं होतं. अवघ्या काही इंचांचं ते रोपटं होतं. या घराचं नाव 'प्रतीक्षा' असं ठेवण्यात आलं होतं. वडिलांनीच लिहिलेल्या एका कवितेतील ओळींमधून हे नाव ठेवलं होतं. 'स्वागत सबके लिए यहाँ पर, नहीं किसी के लिए प्रतीक्षा…'. या गुलमोहराच्या झाडाच्या आठवणी सांगताना बिग बी लिहितात, 'याच झाडाच्या अवतीभवती खेळत मुलं लहानाची मोठी झाली. त्यांचे वाढदिवस, सणासुदीचे दिवस याच गुलमोहराच्या नारिंगी फुलांसारखे होते. अभिषेक-ऐश्वर्याचं लग्नसुद्धा याच झाडाजवळ झालं होतं. जेव्हा आई आणि वडिलांचं निधन झालं, तेव्हा प्रार्थनासभेसाठी आलेले अनेक लोक या झाडाच्या सावलीखाली उभे होते. होलिकादहन याच झाडाजवळ व्हायचं आणि दिवाळीत लख्ख प्रकाशात त्याच्या फांद्या चमकायच्या. सत्यनारायणाची पूजा, शांती-समृद्धीसाठी केलेले होमहवन त्याच्या अवतीभवती व्हायचे.' बिग बींची कविता... उँगली भर कोंपल , लगाई थी हमने , इस बहु सुंदर गुलमोहर वृक्ष की , चालिस तीन बरसों तक साथ दिया उसने, आज अचानक हमें छोड़ दिया उसने । ऐतिहासिक वर्ष बिताए थे हमने , इसकी सुगंधित छात्र छाया में , शोक है दर्द है, फिर से उगाएँगे, हम, इक नयी कोंपल पल भर में ।। एबी


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/38wZylR