मुंबई: या अभिनेत्रीमुळं गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये जो काही गोंधळ सुरू झाला आहे, तो संपण्याचं नाव घेत नाहीए. मुंबई आणि मुंबई पोलिसांसंदर्भात वादग्रस्त व्यक्तव्य केल्यानंतर कंगना विरुद्ध शिवसेना हा वाद सुरू झाला. शिवसेनेशी पंगा घेणाऱ्या कंगनाच्या मुंबईतील कार्यालयावर मुंबई महापालिकेनं कारवाई करत अनधिकृत बांधकाम तोडलं. पालिकेनं केलेल्या या कारावईवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या कारवाईत कंगनाच्या कार्यालयाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून कंगनानं आता वेगळाचं निर्णय घेतला आहे. कंगनानं या कार्यालयाची दुरुस्ती न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात तिनं एक ट्विट देखील केलं आहे. मी १५ जानेवारी रोजी कार्यालयाचं उद्धाटन केलं होतं. त्यानंतर करोनाचा कहर सुरू झाला. अनेकांप्रमाणं या काळात माझ्याकडंही काही काम नव्हतं. त्यामुळं आता कार्यालयची दुरुस्ती करण्यासाठी पैसे नाहीत. तोडफोड केलेल्या कार्यालयातच मी माझं काम सुरु ठेवणार आहे. हे कार्यालय म्हणजे स्वत:चं स्थान निर्माण करणाऱ्या स्त्रीयांच्या अस्मितेचं हे प्रतिक असले, असं कंगनानं म्हटलं आहे. दरम्यान, 'अभिनेत्री कंगनाच्या बंगल्यातील मूळ बांधकामात केलेले बदल तसेच मोठ्या प्रमाणात केलेले हे मंजूर आराखड्याचे उल्लंघन करणारे होते. म्हणूनच कायदा व नियमाप्रमाणे तोडकामाची कारवाई करण्यात आली. न्यायालयात याचिका केली म्हणून तिच्या बेकायदा बांधकामांना संरक्षण मिळता कामा नये', असे म्हणत मुंबई महापालिकेने गुरुवारी आपल्या कारवाईचे समर्थन केलं. मात्र, 'पालिकेसोबत आमचा दोन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू असून अनेक महत्त्वाच्या बाबी न्यायालयासमोर आणायच्या आहेत', असं सांगून याचिकेत सुधारणा व अतिरिक्त प्रतिज्ञापत्र करण्यासाठी कंगनाच्या वकिलांनी मुदत मागितल्यानंतर न्यायालयानं याविषयीची पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला ठेवली. 'महापालिकेने विशिष्ट कुहेतूने माझ्या बंगल्यातील बांधकामे तोडली आहेत', असा दावा करत कंगनाने अॅड. रिझवान सिद्दिकी यांच्यामार्फत बुधवारी तातडीने न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी न्या. शाहरुख काथावाला व न्या. रियाझ छागला यांच्या खंडपीठाने तातडीची सुनावणी घेतल्यानंतर महापालिकेची कारवाई ही प्रथमदर्शनी कुहेतूने असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. मात्र, 'पालिकेची कारवाई कुहेतूने नसून रीतसर तपासणी करून आणि नोटीस बजावूनच कारवाई केली असल्याने कंगनाचे आरोप हे निराधार व खोटे आहेत', असे म्हणणे एच-पश्चिम वॉर्डचे प्राधिकृत अधिकारी भाग्यवंत लाटे यांनी ज्येष्ठ वकील अॅस्पी चिनॉय व अॅड. जोएल कार्लोस यांच्यामार्फत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मांडले.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2DUFXkI