Full Width(True/False)

इन्स्टाग्राम व्हिडीओ बनवताना घाबरली श्रुती मराठे, कानावर पडला 'तिचा' आवाज

मुंबई- आपले आवडते कलाकारदेखील माणूस आहेत, याचा प्रेक्षकांना बऱ्याचदा विसर पडलेला दिसतो. कलाकारांनाही सामान्यांसारखी एखाद्या वस्तूची किंवा प्राण्यांची भीती वाटू शकते, हेही अनेकांच्या ध्यानीमनी नसतं. त्यांच्यासोबत एखादी अनपेक्षित घटना घडली तर कलाकार देखील गांगरून जातात. असंच काहीसं मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठेसोबत घडलं. श्रुतीने 'राधा ही बावरी' या मालिकेतून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर 'एका पेक्षा एक अप्सरा आली' आणि 'जागो मोहन प्यारे' या मालिकांमध्ये ती झळकली. श्रुती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे निरनिराळ्या वेशभूषेतील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. श्रुती नेहमी इन्स्टाग्रामवर नवनवीन व्हिडीओ बनवताना दिसते. अशाच एका व्हिडिओच्या चित्रीकरणादरम्यान ती गांगरून गेली. श्रुतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात ती सुरुवातीला शांत पण त्यानंतर घाबरलेली दिसतेय. त्याचं झालं असं की, श्रुती तिच्या इन्स्टाग्रामसाठी व्हिडीओ शूट करत होती. तेव्हा दोन ते तीन सेकंदानानंतर तिला तिच्या जवळूनच पालीच्या चुकचुकण्याचा आवाज ऐकू येतो. तो आवाज ऐकून श्रुतीच्या चेहऱ्यावरील हावभाव झपाट्याने बदलतात आणि ती व्हिडीओ बंद करते. हा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत तिने त्यासोबत भन्नाट कॅप्शन दिलंय. तिने लिहिलं, 'व्हिडीओ बंद, घाबरली, पळा....' असं लिहीत तिने तिथून पळ काढला. श्रुतीच्या या व्हिडिओवर चाहत्यांना मात्र हसू फुटलं आहे. त्यांनी श्रुतीच्या व्हिडिओवर हसण्याचे इमोजी पाठवत तिची थट्टा केली आहे. काहींनी आम्हालाही कधीकधी असं वाटतं, असं म्हणत तिला धीर दिलाय तर काहींनी एवढ्या मोठ्या कलाकारांच्या घरात देखील पाल येते, म्हणत तिची थट्टा केली आहे. श्रुतीने गौरव घाटणेकर सोबत विवाह केला आहे. श्रुतीने तामिळ चित्रपटांत देखील काम केलं आहे. त्यानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला. तिच्या अभिनयाचं मराठी प्रेक्षकांकडून प्रचंड कौतुक करण्यात आलं. तिने 'बंध नायलॉनचे', 'मुंबई- पुणे- मुंबई २', 'चाहतो मी तुला', 'प्रेमसूत्र', 'संघर्षयात्रा' यासारख्या चित्रपटात काम केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cASKWP