Full Width(True/False)

...त्या बाबतीत मी खूपच स्वार्थी आहे; असं का म्हणतोय अभिनेता शरद केळकर?

० छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यानंतर तू एका किन्नरची भूमिकादेखील तितक्याच चोखपणे वठवलीस. त्यावेळी तुझ्या मनात काय विचार सुरू होते?- विशिष्ठ भूमिकेसाठी पहिल्यांदाच पेहराव आणि रंगभूषा करतो तेव्हा मी आरशासमोर उभा राहून स्वतःला सांगतो की, 'तू आता नाहीस. तू आता ती संबंधित भूमिका आहेस.' मग त्या भूमिकेची देहबोली मी माझ्यात आणण्याचा प्रयत्न करतो. कारण, अभिनय करण्याचा अभिनय करणं म्हणजे अभिनय नव्हे. तुम्हाला त्या दुसऱ्या व्यक्तिमत्त्वाला तुमच्या शरीरात स्थान द्यावं लागतं. 'लक्ष्मी'ची भूमिका साकारताना मी इतर अनेक किन्नरांचं निरीक्षण केलं. आपल्याला प्रथमदर्शनी वाटतं की, किन्नरांचा स्वभाव खूप भडक असतो. पण आपण हे विसरतो की, आपण त्यांच्याशी जसं वागतो, बोलतो. तसं ते आपल्याशी वागतात. शेवटी तेदेखील आपल्यासारखे माणूसच आहेत. ० कलाकार अनेकदा स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी ठरावीक भूमिका साकारतात. पण, तू अपवाद आहेस. याबाबत काय सांगशील?- मी कलाकार आहे. विविधांगी भूमिका पडद्यावर जगणं हा माझ्या कामाचा भाग आहे. कोणतीच भूमिका लहान किंवा मोठी अशी नसते. आपण प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडणं महत्त्वाचं असतं. इतरांना काय वाटेल हा विचार मी करत नाही. मला हे करण्यात आनंद मिळतोय का हे मी स्वत:ला विचारतो. मी स्वतःला आनंदी ठेवू शकलो तर मी दुसऱ्यांना आनंद देऊ शकेन. मी विशिष्ठ चौकटीतील भूमिका साकारत राहिलो तर ते मला आणि प्रेक्षकांनासुद्धा आवडणार नाही. म्हणूनच हा बहुरंगी होण्याचा अट्टाहास. काम आणि विविध भूमिका साकारण्याच्या बाबतीत तुम्ही मला स्वार्थी म्हणू शकता. ० पण, मनात भीती असते का?- हो असतेच. सिनेमा हिट होणार आहे की नाही?, माझं काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल की नाही?; याबाबत भीती ही नेहमीच असते. ती असायलाच हवी. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत सजग असता. असा धाक असल्यावर त्यातून चांगलंच काम केलं जातं. तसंच त्यातून तुमच्या कलागुणांचा विकाससुद्धा होत असतो. मनातील ती धाकधूक तुम्हाला चांगलं, दर्जेदार काम करण्याची प्रेरणा देत असते. ० दमदार अभिनय आणि आवाजाची जादू ही दुधारी तलवार कशी सांभाळतो?- हो, ही दुधारी तलवार आहे. पण, ती एकच तलवार आहे. त्यामुळे एकच तलवार मला हाताळायची आहे. आवाज देणं हेसुद्धा माझ्यासाठी ती भूमिका साकारण्यासारखंच आहे. प्रत्यक्षात मी ती भूमिका साकारत नसलो तरी, त्या भूमिकेला आवाज देताना मला ती भूमिका जगायला मिळते. डबिंग करताना माझ्या अभिनयाचा सराव होतो. पुढे मला तशा प्रकारची भूमिका साकारण्याची संधी मिळाली तर अभिनेता म्हणून ती भूमिका साकारण्यासाठी मी तयार असायला हवं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3bXWVgj