मुंबई: देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. खास करून महाराष्ट्र राज्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत आणि या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात १५ दिवसांसाठी कडक निर्बंध लावत लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यांनी याला 'ब्रेक द चेन' असं नाव दिलं आहे. अनावश्यक कामाव्यतिरिक्त नागरिकांना बाहेर फिरण्यास बंदी घालण्यात आली असून केवळ अत्यावश्यक सेवाच या १५ दिवसांत चालू राहणार आहेत. तसेच चित्रपट आणि टीव्ही शोंच्या शूटिंगवरही बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या लाइव्हमध्ये येत्या १५ दिवसांत महाराष्ट्रात कडक निर्बंध लावत असल्याचं स्पष्ट केलं. त्यानुसार आज १४ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्वांसाठी कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. संपूर्ण राज्यात कलम १४४ लागू करण्यात आलं असल्यानं अनावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. अशात चित्रपटांचं शूटिंग आणि रिलीजवरही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांमध्ये मनोरंजन विश्वातील अनेकांना करोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमार, आमिर खान, कटरीना कैफ, विक्की कौशल, आलिया भट्ट, रणबीर कपूर, तारा सुतारिया यासारख्या कलाकारांना चित्रपटांच्या सेटवर करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आता चित्रपटांच्या शूटिंगसोबतच चित्रपटगृहांवरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच जिम, शाळा, कॉलेज, स्विमिंग पूल यांनाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. करोना व्हायरसचं वाढतं संक्रमण लक्षात घेता 'थलाइवी', 'चेहरे', 'सूर्यवंशी' या चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. सध्या देशातील करोनाची परिस्थिती पाहता आता हे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना बराच काळ वाट पाहावी लागणार असल्याचं चित्र आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tlkaa4