मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झानं १५ फेब्रुवारीला बिझनेसमन वैभव रेखीशी दुसरं लग्न केलं. लग्नानंतर जवळपास दिड महिन्यानंतर लगेचच दियानं प्रेग्नन्सीची घोषणा केली. त्यानंतर दियानं प्रेग्नन्सीमुळेच वैभव रेखीशी लग्न केलं असं म्हणून तिला सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. पण या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत दियानं त्यांची बोलतीच बंद केली आहे. लग्नाआधीच प्रेग्नन्ट असूनही ही गोष्ट सर्वांपासून का लपवून ठेवली याचं कारणंही दियानं आता स्पष्ट केलं आहे. एका इन्स्टाग्राम युझरनं दियाच्या पोस्टवर कमेंट करताना लिहिलं, 'खूप छान, अभिनंदन! पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की, यांनी महिला पंडित बोलावून लग्न केलं करून रुढीवाद संपवण्याचा प्रयत्न केला. तर मग लग्नाआधी प्रेग्नन्ट असल्याचंही त्यावेळीच का नाही सांगितलं? की, फक्त हे यासाठी केलं की, लग्नानंतर प्रेग्नन्ट होण्याचा समजच आपण फॉलो करतो. एक महिला लग्नाच्या आधी प्रेग्नन्ट का होऊ शकत नाही?' या इन्स्टाग्राम युझरच्या प्रश्नाला उत्तर देताना दियानं लिहिलं, 'खूपच चांगला प्रश्न आहे हा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही फक्त आम्हाला मुल होणार आहे किंवा मी प्रेग्नन्ट आहे या कारणासाठी लग्न केलेलं नाही. त्याआधीच आम्ही लग्न करून एकत्र आयुष्य जगण्याचा विचार पक्का केला होता. जेव्हा आम्ही लग्नाची तयारी करत होतो त्यावेळी आम्हाला आमच्या बाळाबद्दल समजलं. त्यामुळे हे लग्न फक्त प्रेग्नन्सीमुळे झालेलं नाही.' 'ही गोष्ट आम्ही लपवली त्याला काही वैद्यकिय कारणं होती. हे सुरक्षित आहे की नाही हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं. ही माझ्या आयुष्यातली सर्वाधिक आनंद देणारी गोष्ट आहे. ज्यासाठी मी अनेक वर्ष वाट पाहिली आहे. काही वैद्यकीय कारण वगळता ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवण्यासाठी माझ्याकडे काहीच कारण नव्हतं.' दियानं पुढे लिहिलं, मी या प्रश्नाचं उत्तर फक्त यासाठी देत आहे कारण १. आयुष्यात आपण आई होणं किंवा बाळाला जन्म देणं ही सर्वांत मोठी भेट असते. २. हा सुंदर प्रवास करत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारची लाज वाटायला नको. ३. एक स्त्री म्हणून आपल्याला नेहमीच आपल्या आवडी-निवडी लक्षात घ्यायला हव्या. ४. मग ते लग्न न करता बाळाला जन्म देणं असो किंवा मग लग्न करून ही प्रत्येकाची वैयक्तीक निवड आहे. ५. एक समाज म्हणून आपल्याला सर्वच रुढीवादी विचार तोडायला हवेत किंवा बाजूला ठेवायला हवेत. काय बरोबर आणि काय चुकीचं आहे या पेक्षा आपण स्वतःला काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे विचारायला हवं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sSYaDv