०नव्यानं संजना हे पात्र स्वीकारताना काय विचार केला होतास? - गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात मला संजना या व्यक्तिरेखेसाठी विचारणा झाली. तेव्हाच्या परिस्थितीत काम मिळतंय तर नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. तसंच पात्राची खोली समजावून घेतली आणि होकार दिला. ० मालिकेच्या काही भागांनंतर तू हे पात्र साकारायला लागलीस. काय आव्हानं होती?- एखादं पात्र पहिल्या कलाकारानं साकारुन प्रेक्षकांच्या मनात छाप सोडलेली असते, एक स्थान निर्माण करुन ठेवलेलं असतं. तसंच सहकलाकारांसह ऑनस्क्रीन सूर जुळावा लागतो. या सगळ्याचं दडपण होतं. पण मी संजना हे पात्र साकारायला घेतल्यानंतर काही दिवसांतच प्रेक्षकांनी मला स्वीकारलं. ० रुपाली आणि संजना या दोघींमध्ये काय साम्य आहे?- दोघीसुद्धा कणखर आहेत. संजनाप्रमाणे रुपालीसुद्धा जगाशी व्यवहारिक वागते, पण आपल्या माणसांचा मनानं विचार करते. रुपाली आणि संजनानं वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार सहन केले आहेत. त्या दोघींनाही त्यांची लढाई एकटीनं लढायची आहे. ० नकारात्मक प्रतिक्रियांना कशी सामोरी जातेस?- 'बिग बॉस'नंतर मला नकारात्मक प्रतिक्रियांची सवय झाली आहे. आता मी त्यासुद्धा सकारात्मकरित्या घेते. मी गाणं बनवलं होतं, ते म्हणजे 'हेटर्स आर माय सिक्रेट लव्हर्स' हे गाणं खूप काही सांगून जातं. पण या सगळ्यात एक चांगली बाजू म्हणजे संजना या पात्राच्या अनेक छटा आहेत, त्या प्रत्येक छटांचा प्रेक्षक विचार करतात. म्हणजे संजनाचा राग-राग करत असले तरी त्यांना तिची कीवसुद्धा येते. ० 'संजना तिच्या जागी बरोबर आहे' असं म्हणणारा एक वर्ग आहे, त्याबद्दल तुझं मत काय?- संजना ज्या भावनिक-मानसिक परिस्थितीतून जात आहे, त्यातून आम्ही जातोय. असं आमच्यासोबतही घडलं आहे', असे मेसेज येतात. त्यावेळेला वाटतं की, प्रेक्षक आपल्याला त्यांच्या आयुष्याशी जोडू पाहत आहेत. हे पात्र लोकांना त्यांच्या भूतकाळात डोकवायला भाग पाडतंय. काम किती चांगलं होतंय, याचे अभिप्राय कळतात तेव्हा भरुन पावल्यासारखं होतं. मध्यंतरी अभिनेते सचिन खेडेकर आणि सुनिल तावडे यांनी कौतुक करण्यासाठी फोन केला होता. तेव्हा खूप आनंद झाला होता. ० वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारातून काय शिकलीस?- तुम्हाला कितीही अपयश आलं तरीही तुम्ही पुन्हा नव्यानं भरारी घेऊ शकता, यावर माझा विश्वास आहे. तुम्ही मनानं खंबीर असाल तर तुम्ही तितक्याच जोमानं कमबॅक करु शकता, हे शिकले. ० लग्न करण्याआधी वेळ घेणार आहेस. या वेळेत कोणकोणत्या गोष्टींचा विचार करत आहेस?- माझ्या भावाचं लग्न आहे. त्यावर लक्ष केंद्रीत करत आहे. त्यानंतर आई-बाबांना आर्थिकरित्या सुरक्षित करायचं आहे. ते कोणावरही अवलंबून राहता कामा नये. त्यानंतर लग्नाचा विचार करु. या सगळ्यात अंकितची साथ आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/35nZ9Bz