म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई समाजमाध्यमांमध्ये फेसबुक हे सर्वाधिक वापरले जाणारे व्यासपीठ असल्याने येथे आकर्षक जाहिराती देऊन फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. एकावर एक मोफत, स्वस्तामध्ये मस्त, सवलतीमध्ये अधिकाधिक वस्तू अशाप्रकारच्या जाहिरातींद्वारे भुरळ घालून यूजरना पैसे भरण्यास भाग पाडले जाते. सायबर गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक गुन्हे अशा प्रकारच्या फसवणुकीचे असल्याचे दिसून येत आहे. वाचाः फेसबुक हे जाहिरातींसाठी सर्वात सोपे आणि स्वस्त माध्यम मानले जाते. फेसबुकचा वापर करणाऱ्यांची संख्या कोट्यवधीच्या घरात असल्याने यावरील जाहिरातींचा प्रभावही तितकाच अधिक असतो. याचाच फायदा सायबर भामटे घेतात आणि खोट्या जाहिराती फेसबुकवर पोस्ट केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने वस्तू, कपडे, फर्निचर, गाड्या, मोबाइल यांच्या जाहिरातींचे प्रमाण अधिक असते. स्वस्तामध्ये चांगल्या वस्तू मिळत असल्याने अनेकजण कोणतीही शहानिशा न करता या जाहिरातींना बळी पडतात. यातील लिंकवर किंवा दिलेल्या क्रमांकावर फोन करून पैशाचे व्यवहार केले जातात. बँक खात्यातून पैसे गायब झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येते. मुंबईत अशा घटना गेल्या काही दिवसांपासून वाढल्या आहेत. वाचाः हे लक्षात ठेवा - फेसबुक पेजवरील सर्वच जाहिराती विश्वासार्ह नसतात. - जाहिरातींमधील लिंकवर क्लिक करू नका. - संपर्कासाठी दिलेला मोबाइल क्रमांक तपासून पाहा. - बँक तपशील, क्रेडिट- डेबिट कार्डची माहिती देऊ नका. - कोणतीही कंपनी मोफत काही देत नाही. - जाहिरात पाहून ऑर्डर केल्यास ‘कॅश ऑन डिलिव्हरी’ पर्याय निवडावा. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cELcTy