मुंबई: अभिनेता मनोज बाजपेयीची सुपरहिट वेब सीरिज 'द फॅमिली मॅन'च्या दुसरा सीझन प्राइम व्हिडीओवर ४ जून रोजी रिलीज झाला. सस्पेन्स आणि अॅक्शननी भरलेल्या या थ्रीलर वेब सीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. दोन सीझनच्या यशानंतर आता निर्मात्यांनी या वेब सीरिजच्या तिसऱ्या सीझनची तयारीही सुरू केली आहे. यावेळी श्रीकांत तिवारी आणि त्याच्या टीमसाठी पूर्णपणे नवीन मिशन असणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी श्रीकांत आणि त्याची टीम चीनी शत्रुशी दोन हात करताना दिसणार असल्याचं बोललं जात आहे. एका हिंदी वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार 'द फॅमिली मॅन'चा तिसरा सीझन हा करोना व्हायरसच्या काळातीलच असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या सीझनची कथा ही देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आधारित असणार आहे. या सीझनमध्येही मनोज बाजपेयीसोबत शारिब हाश्मी आणि प्रियमणी मुख्य भूमिकांमध्ये असणार आहे. रिपोर्टनुसार तिसऱ्या सीझनमध्ये भारताच्या विरोधात चीननं एक मिशन आखल्याचं दाखवण्यात येणार आहे. ज्याचं नाव 'गुआन यू' असं असेल. हे चीनच्या हान राजवंशातील एका मिलिटरी अधिकाऱ्याचं नाव होतं. ज्याला चीनमध्ये खूप महान मानलं जातं. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तान आणि श्रीलंकानंतर आता श्रीकांत तिवारी आपल्या टीमसोबत चीनमध्ये गुप्त मिशन चालवणार आहे. 'द फॅमिली मॅन'च्या पहिल्या सीझनचं शूटिंग मुंबई, दिल्ली आणि काश्मीर येथे झालं होतं. तर दुसऱ्या सीझनचं शूटिंग चेन्नई, लंडन, मुंबई आणि दिल्ली येथे करण्यात आलं होतं. त्यानंतर आता तिसऱ्या सीझनचं शूटिंग मुंबई, दिल्लीच्या व्यतिरिक्त नागालँड तसेच पूर्वेवकडील राज्यात करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2T6tBNG