संपदा जोशी ० हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केलं आहेस. कसा आहे तिथला अनुभव?- माझ्या व्यक्तिरेखेचं नाव मालिनी आहे. तिच्या आयुष्यात अनपेक्षितपणे घटना घडत जातात आणि तिला ते धक्के पचवावे लागतात. एक कलाकार म्हणून मालिनीच्या या प्रवासामुळे मला रोज काहीतरी वेगळं करायला मिळतंय. ० तू साकारत असलेली व्यक्तिरेखा आणि तुझ्यात काय साम्य आहे?- कोणतीही भूमिका साकारताना त्या भूमिकेकडून आपण काहीतरी गुण घेतो आणि आपल्यातले काही गुण भूमिकेला देतोही. मालिनी बरीचशी मयुरीसारखी आहे. माझ्या आणि तिच्या आवाजात फरक आहे. तिचा आवाज सौम्य आहे. तसंच मालिनी खूप सहनशील आहे. ० हिंदीत काम करण्यासाठी भाषेवर काम करावं लागलं का?- हो. अजूनही अभ्यास सुरूच आहे. 'माझं हिंदी भाषेवर तितकंसं प्रभुत्व नाही' हे मी मालिका स्वीकारण्याआधीच दिग्दर्शकांना सांगितलं होतं. पण 'तू करू शकतेस' असं सांगत हा विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला. त्यानंतर माझा अभ्यास सुरू झाला. सभोवतालच्या हिंदी भाषिकांचे संवाद मी ऐकायचे आणि प्रेमचंद यांच्या काही कथादेखील मी वाचत होते. भाषा जीभेवर रूळण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात, ते सर्व मी केले आणि अजूनही करतेय. ० ओटीटीवर (ओव्हर द टॉप) काम करण्याचा काही विचार?- हो. ओटीटीवर काम करायचं आहेच. पण संहिता आणि पात्र मनोरंजक हवं. मराठी आणि हिंदीच्या छोट्या पडद्यावर माझं पदार्पण चांगल्या भूमिकांनी झालंय. त्यामुळे ओटीटीवर पदार्पण करेन तेव्हा या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्यात उतरेन. ० सोशल मीडिया आणि ट्रोलिंगवर तुझं काय म्हणणं आहे?- सोशल मीडियाचा उपयोग सकारात्मकतेसाठी करायला हवा. मध्यंतरी मालिकेत मालिनीला त्रास झाल्यामुळे इतर कलाकारांना ट्रोल केलं गेलं. त्यावेळेस मी चाहत्यांना आवाहन केलं होतं की, मालिनीचं कौतुक करायचं असेल तर इतरांना ट्रोल करू नका. आधीच आजुबाजूला भरपूर नकारात्मकता आहे. सोशल मीडियामुळे अजून कशाला त्यात भर? ० सोशल मीडियावर वैयक्तिक आयुष्याबद्दल तू मोकळेपणाने बोलतेस, याचा काही फायदा किंवा तोटा होतो का?- मी माझा फायदा बघत नाही. सोशल मीडियाचा उपयोग पारदर्शकपणे व्हायला हवा आणि तोच प्रयत्न मी करत असते. तुम्ही खरे असता तेव्हा तो खरेपणा लोकांना भावतो. त्यामुळे नेहमी खरं वागा. सकारात्मक राहा. तुमच्या कामातून, तुमच्या प्रत्येक गोष्टीमधून सकारात्मकता यायला हवी आणि सोशल मीडिया हा याचा आरसा आहे. ० तुझे आगामी चित्रपट कोणते?- 'ग्रे' आणि 'लग्नकल्लोळ' हे दोन मराठी चित्रपट तयार आहेत. लॉकडाउन नसतं, तर गेल्या वर्षी ते प्रदर्शित झाले असते. आताही लॉकडाउनमुळेच चित्रपट प्रदर्शित होण्यास विलंब होतोय.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3w8UHlW