होड्यांची शर्यत माझं बालपण अंधेरीतील साकीनाका इथे गेलंय. आता जितकी वर्दळ तिथे असते तितकी माझ्या बालपणी नसायची. पण पाऊस पडला की साकीनाक्याला तेव्हाही पाणी तुडुंब भरायचं. मग काय मी आणि माझ्या दोन्ही बहिणी मिळून भिजायला जायचो आणि कागदाच्या होड्या बनवून शर्यत लावायचो की कोणाची होडी किती पुढे जाते. तेव्हाचे पावसातील खेळ आणि ती मजा आताच्या लहान मुलांमध्ये कुठेतरी हरवत चालली आहे असं वाटतं. - किशोरी शहाणे माथेरानची सहलपाऊस म्हटला की मला माझी बालपणीची एक माथेरान सहल आठवते. माझ्या संपूर्ण कुटुंबाबरोबर मी तिथे गेले होते. त्यावेळचं मला आठवतंय ते फक्त सगळीकडे पसरलेलं धुकं आणि त्या धुक्यात घोड्यावरून फिरणारे लोक. असं वाटत होतं की राजकुमार आणि राजकुमारीच जणू घोड्यावरून फिरत आहेत. ती सहल माझ्या इतकी जवळची आहे की मी आजही पावसाळ्यात माथेरानला जरूर जाते. माथेरानमधील तेव्हाचा क्षण मनात इतका बसला होता की माझ्या 'पावसाचा हनिमून' या नाटकाची सुरुवातदेखील आम्ही माथेरानमधील पावसाळ्यानेच केली आहे. - अमृता सुभाष चमन बॉलमाझं बालपण वांद्रे परिसरात गेलं आहे. इथली माझी पावसाळ्यातील आठवण म्हणजे माझा चमन बॉल. टेनिसचा जो बॉल असतो त्याचं कव्हर काढला की जो गुळगुळीत बॉल होतो त्याला आम्ही चमन बॉल म्हणायचो. हा बॉल पावसाळ्यात ओलसर रस्त्यावर उडवला की सीझन बॉलसारखा स्विंग होत वेगाने जातो आणि म्हणूनच आम्ही पावसाची आतुरतेने वाट बघायचो. पाऊस आला की हा बॉल घेऊन परिसरातील ४० ते ५० लोक एकत्र येऊन क्रिकेट खेळाची मजा घ्यायचो. - मिलिंद गुणाजी शाळा बुडवण्याची गंमतकळव्यातील खारेगाव मनीषा नगरमध्ये माझं बालपण गेलंय. शाळा बुडवून पावसात फिरत राहणं, पाण्यात खेळणं हे एवढंच करायचो. आमचं घर खाडीच्या जवळ होतं. पावसाळ्यात घरात पाणी यायचं. त्या पाण्यातून तीवरसुद्धा घरात यायची. त्यावेळी ती घरातून बाहेर काढायची जबाबदारी आमची असायची. एका काठीने उचलून पुन्हा आम्ही ती खाडीत टाकायचो. पूर्वी मी पत्र्याच्या घरात राहत होतो. पावसाळ्यात घर गळायचं. त्यावेळी भांडी ठेवून ते पडणारं पाणी साचवायचं आणि ते भरलं की बाहेर टाकायचं; हे काम नियमितपणे करायचो. - संतोष जुवेकर ...आणि परिसर स्वच्छ झालाकाही वर्षांपूर्वी मी येऊरला गेलो होतो. तिथे बराच प्लास्टिकचा कचरा होता. मी तो कचरा उचलू लागलो. ते पाहून माझ्या मित्राने त्याबाबत विचारलं असता मी म्हणालो, 'आपल्या इथे पाणी तुंबण्याचं कारण हे प्लास्टिक आहे. ते असं कुठेही पडून राहतं आणि मग त्याचा परिणाम आपल्या सर्वांना भोगावा लागतो. हे एका बाजूला करून ठेवलं तर त्याचा थोडासा फायदाच होईल.' मित्रांनीदेखील कचरा उचलायला सुरुवात केली. हे बघून तिथे असलेला प्रत्येक जण कचरा उचलू लागला आणि २० मिनिटांत तो संपूर्ण परिसर स्वच्छ झाला. - संजय नार्वेकर संकलन : अनुश्री पवार, सूरज कांबळे


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2SmS55j