मुंबई : निसर्गाची जेव्हा आपण काळजी घेतो तेव्हा तो देखील आपली काळजी घेतो, आपले संरक्षण करत असतो. आपल्‍या दैनंदिन कृतींचा पर्यावरणावर कळत नकळतपणे परिणाम होत असतो. सध्या लॉकडाउनमुळे मानवी व्यवहार काहीसे मंदावलेले आहेत. गाड्या कमी संख्येने रस्त्यावर धावत असल्याने प्रदूषणही कमी झाले आहे. परिणामी निसर्ग बहरला आहे. त्याचे हे बहरणे कायम राखणे आपल्या हातात आहे. यासाठीच पर्यावरणपूरक राहणीमान अवलंबणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यंदाच्‍या जागतिक पर्यावरण दिनाची थीम आहे 'इकोसिस्टिम रिस्‍टोरेशन.' एण्ड टीव्‍हीवरील 'भाबीजी घर पर है' या मालिकेतील अनिता भाभी म्हणजे अभिनेत्री आणि 'और भई क्‍या चल रहा है?' मालिकेतील सकिना मिर्झा म्हणजे आकांशा शर्मा या व्यक्तिगत आयुष्यातही पर्यावरणपूरक रहाणीमान जगत आहेत. त्याबद्दल त्यांचे हे अनुभव... आयुष्यातून प्लॅस्टिकला केले हद्दपार 'भाबीजी घर पर है'मधील अनिता भाभीची भूमिका साकारणाऱ्या नेहाने सांगितले की, ‘सोप्‍या भाषेत सस्टेनेबल राहणीमान म्‍हणजे आपल्‍या जीवनशैली निवडींचा आसपासच्‍या विश्‍वावर होणारा परिणाम जाणून घेणे. त्यानुसार सर्वांनी उत्तमपणे व जबाबदारपूर्वक जगण्‍यासाठी मार्ग शोधून काढणे. हरित पद्धतींचा अवलंब हा आपल्‍या भूमातेचे संवर्धन व संरक्षण करण्‍याचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळेच मी दैनंदिन आयुष्यातून प्‍लॅस्टिकचा वापर कमी केला आहे. त्‍याऐवजी सामान आणण्यासाठी सुती किंवा तागाच्‍या पिशव्‍यांचा वापर करते. लाइटबाबतही एलइडी लायटिंग किंवा सीएफएल बल्‍ब्सचा वापर करते, कारण हे दीर्घकाळापर्यंत टिकतात आणि ऊर्जेची बचत करतात. आपल्‍या रोजच्‍या सवयींमधील हे लहानसे बदल आपल्‍याला पर्यावरणदृष्‍ट्या जागरूक बनवू शकतात आणि मोठे परिवर्तन घडून येऊ शकते. ‘वाहनांचा वापर कमीत कमी करते’ 'और भई क्‍या चल रहा है?' या मालिकेतील सकिना मिर्झा ही भूमिका करणारी अभिनेत्री आकांशा शर्माने सांगितले, ‘पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि पर्यावरणाचा ऱ्हास कमी करणे महत्त्वाचे आहे. या भूमातेच्‍या अधिवासामध्‍ये आपले नैतिक कर्तव्‍य पर्यावरणाचे प्रदूषणापासून, तसेच पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या इतर कृतींपासून संरक्षण करण्‍याचे असले पाहिजे. आपले पर्यावरण आपल्‍याला शुद्ध हवा, पाणी, अन्‍न अशी अनेक नैसर्गिक संसाधने देते आणि आपण पर्यावरणाचे संरक्षण करत ऋण फेडले पाहिजे. वाहनांद्वारे होणारे वायू प्रदूषण विशेषत: मेट्रो शहरांमध्‍ये मोठी समस्‍या बनली आहे. म्‍हणून मी माझ्या वाहनाचा वापर न करता शक्‍यतो लहान अंतरासाठी पायीच चालत जाते. तसेच मी प्‍लॅस्टिकचा वापर आणि पाणी व इतर नैसर्गिक संसाधनांचा अपव्‍यय टाळते. आपल्‍या भूमातेची परतफेड आणि भेट म्‍हणून आम्ही दर सहा महिन्‍यांनी एक रोपटे लावण्‍याचे ठरवले आहे. आपण हरित व शुद्ध पर्यावरणासाठी अनेक गोष्‍टी करू शकतो. चला तर मग संघटित होऊन असे सोपे मार्ग शोधून काढूया, जे आपल्‍याला पर्यावरणाप्रती आपले योगदान देण्‍यामध्‍ये मदत करू शकतात.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34Nujlt