मुंबई : बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमारची आई,अरुणा भाटिया यांचे आज, बुधवारी ( ८ सप्टेंबर) सकाळी निधन झाले. अक्षयने ट्विट करून ही माहिती चाहत्यांनी दिली.आईची तब्येत बिघडल्याची बातमी समजल्यावर लंडनमध्ये सुरू असलेले चित्रीकरण अर्ध्यावर सोडून तो सोमवारीच भारतात परतला. आईच्या निधनामुळे अक्षय खूपच भावूक झाला आहे. आईसोबत अक्षयचे खास बाँडिंग होते. अक्षयवर आईचा मोठा प्रभाव होता. अक्षयसाठी आई सर्वस्व होती. त्यामुळेच जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा अक्षय आईसोबत वेळ घालवायचा. इतकेच नाही तर अक्षय आईला घेऊन लंडनला गेला होता. तेव्हा त्याच्या आईला चालताना त्रास व्हायचा. म्हणून त्याने आईला व्हिलचेअरमध्ये बसवून लंडनमधील रस्त्यांवर फिरला होता. हा व्हिडिओ शेअर करत अक्षयने लिहिले होते की, 'लंडनमध्ये चित्रीकरण सुरू असताना काही वेळ आईसोबत घालवला. तुम्ही कामात किती व्यग्र आहात.. तुम्ही आयुष्यात कोणत्या टप्प्यावर आहात... असे काहीही असले तरी तुमचे आईवडिलही म्हातारे होऊ लागले आहेत...तेव्हा काही वेळ त्यांच्यासोबतही घालवायला हवा...' अक्षय कुमारची आई गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. त्यांच्यावर मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात उपचार सुरू होते. आईची तब्येत जास्त बिघडल्याची बातमी अक्षयला कळल्यावर तो सोमवारी तातडीने लंडनमधून भारतात परत आला. त्यानंतर मंगळवारी संध्याकाळी त्याने ट्विट करून आईच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली होती. तसेच तिच्यासाठी प्रार्थना करणा-या चाहत्यांचे आभार मानले होते. परंतु बुधवारी सकाळीच त्याच्या आईचे निधन झाले. ही बातमी अक्षयनेच ट्विट करून चाहत्यांना दिली. अरुणा भाटिया यांनी २५ कोटींचे केले दान गेल्यावर्षी करोनाशी लढण्यासाठी म्हणून आईच्यावतीने अक्षय कुमारने २५ कोटी रुपयांची मदत केली होती. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये अक्षयने सांगितले होते की, 'ही मदत करणारा मी कुणीच नाही. आपण आपल्या देशाला भारत माता म्हणतो. त्यामुळे ही मदत माझ्याकडून नाही तर आईकडून भारत मातेला करण्यात आली आहे.' मदर्स डे ला आईसोबत शेअर केला होता फोटो या वर्षी झालेल्या मदर्स डे ला अक्षयने आईसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, 'आईसारखं कुणीच नाही...'गेल्यावर्षीही मदर्स डे ला अक्षयने आईसोबत फोटो शेअर केला होता. हा फोटो शेअर करत लिहिले होते की, 'आज याही वयात कोणत्याही कठीण प प्रसंगात एक हात माझ्या डोक्यावर कायम असतो. हा हात माझ्या डोक्यावर जेव्हा असतो तेव्हा मला शांतता मिळते. मला माहिती आहे की आई, तु्झ्या आशिर्वादातून जे हवे आहे ते नक्की मिळणार..'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jO7uGt