सकारात्मक होण्यासाठी मदत नाटक सुरू होणार आणि आपण सगळे पुन्हा रंगभूमीशी एकरूप होणार. हे बाप्पा घडवून आणेलच. सध्याचं संकट फार मोठं आहे; पण आपली इच्छाशक्ती प्रबळ आहे. या संकटावर मात करण्याची शक्ती बाप्पाने प्रत्येकाला द्यावी. त्याची कृपा आहेच. ती लोकांमध्ये अजून दृढ व्हावी हे बाप्पाकडे मागणं आहे. लोकांनी सुदृढ आणि सद्गुणी व्हावं हीच इच्छा आहे. या नकारात्मक परिस्थितीत आपल्याला सकारात्मक होण्यासाठी मदत करावी. बाप्पाच्या आगमनानं ते होईलच; पण त्यापुढे मनात कसलीच शंका न धरता उभं राहता येण्यासाठी बळ द्यावं हे माझं गणेशाकडे साकडं आहे. - अशोक सराफ हा दुरावा पुन्हा नको रंगभूमीशी जोडलेला प्रत्येक जण आता नकारात्मक परिस्थितीत वावरतोय. त्यातून सुटका होणं गरजेचं आहे. आपण कितीही म्हटलं तरी रंगभूमीवरचा आणि पडद्यामागचा कलाकार हा सामान्य माणूसच आहे. एकीकडे काही लोकांवर या सगळ्या परिस्थितीचा काहीच परिणाम होत नसताना सामान्य माणसाची मात्र रोजच परीक्षा घेतली जात आहे. आता या परिस्थितीतून उठून नव्यानं सुरुवात करण्याचं बळ बाप्पानं द्यावं. कलाकाराच्या आयुष्यात रंगभूमीपासून असं लांब राहण्याची वेळ पुन्हा कधीच येऊ नये हे माझं बाप्पाकडे मागणं आणि साकडं आहे. - शरद पोंक्षे रंगभूमीची समृद्धी गणरायामुळेच मराठी रंगभूमीची समृद्धी गणरायाच्या आशीर्वादानं आहे. त्यानं दाखवलेल्या कृपेमुळे कलाकारसुद्धा आता समृद्ध होत आहेत. त्याच्याकडे आता काय साकडं घालावं; त्यानं सगळंच दिलंय. या दीर्घ नकारात्मक परिस्थितीतून आपण आता उभे राहत एक सकारात्मक बदल घडवून आणत आहोत. त्यालाही कारण तोच आहे. आपण त्याला सुखकर्ता दुःखहर्ता म्हणतो ते उगाच नाही. त्याच्या आगमनानं झालेल्या सुखाला काही प्रमाण नाही आणि त्यानं दूर केलेल्या आपल्या दुःखाची गणना नाही. या सगळ्यात त्याच्या आशीर्वादानं रंगभूमी पुन्हा सुरळीत व्हावी हे एवढंच साकडं त्याच्या चरणी. - कविता लाड सुजाणतेची जाणीव व्हावी ज्याच्या कृपेनं प्रत्येक कलाकाराचं आयुष्य सुखी आहे त्याला साकडं घालणं हे फार कठीण आहे. त्याला सगळं माहित आहे. बाप्पा येणार याच विचारानं आपण इतके आनंदून जातो आणि तो आल्यावर आपल्याला या जगाचा विसर पडतो. गजाननाच्या येण्यानं आपली दुःख दूर होतीलच; पण त्यानं सुजाणतेची एक जाणीव करून द्यावी. नाट्य रंगभूमी पुन्हा सुरू होण्यासाठी आशीर्वाद द्यावे. या परिस्थितीत अडकलेल्या प्रत्येकावर आपली कृपा ठेवावी आणि या नकारात्मक वातावरणातून सकारात्मक गोष्टीकडे आपली वाटचाल सुरू करण्याची समज द्यावी. - प्रशांत दामले संकलन : सुरज कांबळे


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nkOp0E