सजावटीचं सरप्राईजमी मुंबईतलं काम संपवून गणपतीच्या आदल्या दिवशी पुण्याला जाणार आहे. यंदा माझा भाऊ आणि मुलं मिळून गणपतीची आरास तयार करणार आहेत. सजावटीसाठी त्यांचा काय बेत आहे हे घरी गेल्याशिवाय मला कळणार नाही. या सजावटीच्या सरप्राईजसाठी मी उत्सुक आहे. यंदाच्या गणेशोत्सवात गर्दी टाळणं, मास्क वापरणं आणि सुरक्षित अंतर राखणं हे तीन नियम प्रत्येकानं कटाक्षानं पाळायला हवेत. - सुबोध भावे मूर्ती घडवण्याचा आनंददरवर्षी आम्ही घरातले चौघेही गणपतीची मूर्ती स्वतःच्या हातानं तयार करतो. चारपैकी जी मूर्ती सर्वोत्तम जमली असेल त्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतो. यंदा माझ्या मुलाची अथर्वची मूर्ती आम्ही निवडली आहे. मूर्तीला रंग देण्याचं काम अजून सुरू आहे. आमच्या मूर्तीचा आकार साधारण चार-पाच इंच असतो. लहान आकारामुळे मूर्तीचं घरच्याघरी विसर्जन करणंही सहज शक्य होतं. यंदा आम्ही दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्यांना मिठाईचा प्रसाद न आणण्याची पूर्वसूचना दिली आहे. त्याऐवजी बाप्पासामोर एक दानपेटी ठेवणार आहोत. त्यामध्ये जमा होणारी रक्कम सामाजिक संस्थेला भेट म्हणून देण्याचं योजलं आहे. - रवी जाधव पडद्यांवरचे श्लोकआमच्याकडे गौरी गणपती येतात. दरवर्षी वेगळी सजावट काय करायची असा प्रश्न नेहमी पडलेला असतो. इको फ्रेंडली, साधं, छान, सुटसुटीत असं काहीतरी करण्याचा प्रयत्न असतो. यंदा एक अनोखा प्रयोग करणार आहोत. पडद्यांवर श्लोक लिहून ते पडदे गौरी गणपतीच्या मागे लावणार आहोत. बाप्पाच्या मागे आपल्या सर्वांना येत असलेलं 'वक्रतुंड महाकाय' आणि गौरीच्या मागे 'महालक्ष्मीअष्टकम्' हे आठ श्लोकांचं स्तोत्रं पडद्यावर लिहिलेलं असणार आहे. मी वाचकांना सांगू इच्छिते की सगळ्यांची काळजी घेऊन उत्साहात हा सण साजरा करू या. - सायली संजीव भक्तीभावाचा उत्सवआम्ही आदल्या दिवशीच गणपतीची मूर्ती घरात आणून ठेवतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा आसनावर विराजमान होतात. गेल्या वर्षीपासून मूर्तीचा आकार आम्ही लहान केला. कारण घरच्याघरी विसर्जनासाठी शाडूची लहान मूर्ती सोयीस्कर ठरते. गणपतीत घरी नातेवाईक, मित्रमंडळी असे खूप जण जमायचे. पण गेल्या वर्षीपासून अगदी मोजकीच मंडळी दर्शनासाठी येतात. पण तरीही उत्साह तोच आहे. आपली संस्कृती टिकवण्यासाठी सण साजरे व्हायला हवेत. अर्थात आरोग्याची योग्य काळजी घेऊनच उत्सव साजरे करायला हवेत. - केदार शिंदे निसर्गाला जपू या यंदा आमचं घरी मूर्ती तयार करण्याचं सलग तिसरं वर्ष आहे. माझा भाऊ मूर्तीला आकार देतो आणि रंग देण्याचं काम माझं असतं. आदल्या दिवशी पुण्याला घरी जाऊन मी मूर्तीला रंग देणार आहे. हळदी-कुंकवापासून तयार केलेले नैसर्गिक रंग आम्ही वापरतो. मी वाचकांना आवाहन करू इच्छिते की कोणत्याही प्रकारे निसर्गाला हानी पोहोचवणारी सजावट करू नका. थर्माकॉलचा वापर कटाक्षानं टाळा. घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात कल्पकतेनं नाविन्यपूर्ण सजावट करता येते. - सोनाली कुलकर्णी संकलन : गौरी आंबेडकर, एसएनडीटी विद्यापीठ


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nuK3V9