Full Width(True/False)

अखेरचा हा तुला दंडवत...गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन

मुंबई- गेल्या आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला. जगतविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. जातपात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणार्या स्वरमैफलीने अखेरची भैरवी घेतली. नक्षत्रांचे हे देणे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले. लतादीदींच्या निधनामुळे संगीत व सांस्कृतिक विश्वावर शोककळा पसरली आहे. संगीतामुळं तृप्त होणारं प्रत्येक मन खंतावलं आहे. लतादीदी लौकिकार्थानं आपल्यातून निघून गेल्या असल्या तरी कालजयी सुरांच्या रूपानं त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील, अशी भावना जगभरात व्यक्त होत आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज ६ फेब्रुवारी रोजीवयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. गेल्या २८ दिवसांपासून त्या ब्रीच कँडी इस्पितळात उपचार घेत होत्या. करोना आणि न्युमोनियाची लागण झाल्याने त्यांना तातडीने इस्पितळात हलवण्यात आले होते. अनेक दिवसांच्या उपचारांनंतर त्यांनी करोनावर मातही केली होती. यानंतर त्यांची प्रकृती सुधारल्यामुळे त्यांची कृत्रिम श्वसनयंत्रणा काढण्यात आली होती. मात्र, आज सकाळी त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना पुन्हा कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले. अखेर आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उपचारादरम्यान मृत्यूची उडाली होती अफवा काही दिवसांपूर्वी लता मंगेशकर यांच्या निधनाची अफवा पसरली होती. यानंतर त्यांच्या ट्विटर हँडलवरुन ट्वीट करत मंगेशकर कुटुंबियांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याची विनंती केली होती. यावेळी डॉ. प्रतिमा समदानी यांनी त्यांच्या तब्येतीबाबत अधिक माहितीही दिली होती. दीदींच्या प्रकृतीत सुधारणा होत असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्या लवकर बऱ्या होऊन स्वघरी जाव्यात अशी आमची इच्छा असल्याचे डॉक्टरांनी म्हटले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/k5Yh04O