Full Width(True/False)

सोशल मीडियामुळं सेलिब्रिटींचे चाहते झाले मित्र

कालपर्यंत कपाटात दाबून ठेवलेली गुपितं ही ब्लॉगच्या रूपातून बाहेर यायला लागली. सोशल मीडियामुळे अनेकांना वाटू लागलं की आपण नट/कलाकार/गायक/लेखक/स्वयंपाकी किंवा जगातलं इतरही बरेच काही आहोत. आत्मविश्वास मिळवण्यासाठी ही चांगलीच गोष्ट असावी. पण ही लोकप्रियता क्षणभंगुर आहे, कारण हा फक्त काही ‘लाइक्स’चा मामला आहे. आता तुमचा व्हिडीओ ‘लाइक’ करणारे, (अनेकदा न बघताही), दुसऱ्या क्षणाला दुसरं काहीतरी लाइक करत असतात. अर्ध्या तासापूर्वी काहीतरी वेगळं trend होत होतं, आता काहीतरी वेगळं! आणि आपणही कुणाबाबत तरी असंच करत असतो! हे सगळंच कमाल आणि धमाल आहे.प्रत्येक चाहत्याला भेटणं शक्य नसलं, तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकार मंडळी चाहत्यांशी संपर्कात असतात. या माध्यमावर भेटलेल्या आणि चांगला कनेक्ट ठेवून असणाऱ्या चाहत्यांच्या काही आठवणी कलाकारांनी शेअर केल्या आहेत आजच्या 'जागतिक सोशल मीडिया दिना'निमित्त.

सोशल मीडियावर 'शशांक केतकर' फॅनपेज चालवणाऱ्या अनेकांना मी भेटलोय. अनेकदा त्यांना मी माझं नाटकं पाहण्यासाठी निमंत्रित करतो, तर कधी त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारतो. एका चाहत्याच्या वाढदिवशी भेटून आम्ही वृक्षारोपण करणार होतो. पण, आत्ता ते शक्य झालं नाही. माझ्या प्रत्येक चाहत्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे हे पाहून छान वाटतं. सोशल मीडियामुळे चार विविध ठिकाणच्या मुली, केवळ चाहत्या म्हणून आज माझ्या चांगल्या मैत्रिणी बनल्या आहेत. त्या माझं एक फॅनपेजही चालवतात. एकदा कोल्हापुरात मी 'कुसुम मनोहर लेले' या माझ्या नाटकाच्या प्रयोगासाठी गेलो असताना सोशल मीडियावरील अश्विनी नावाची माझी एक फॅन मला भेटायला आली. प्रयोग संपल्यानंतर तिनं तिच्या शेतातला ऊस आणून आमच्या संपूर्ण टीमला दिला. शिवाय, कडीपत्त्याची रोपं आम्हाला भेट म्हणून दिली होती. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून असा कुणी फॅन मला मिळतोय तर त्याहून दुसरा आनंद तो काय‌? गायत्री नावाची माझी एक फॅन उत्तम कविता करते. सोशल मीडियावर माझ्यासाठी कविता पोस्ट करते. माझ्या एका वाढदिवशी तिनं माझ्यावरील शंभर कवितांची डायरी मला भेट म्हणून दिली. सोशल मीडियावरील हा चाहतावर्ग माझ्यासाठी फार जवळचा आहे.

-शशांक केतकर, अभिनेता

माझ्यासाठी वेळोवेळी मेहनत करणारे, माझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या चाहत्यांचे आभार मानावेत असं मला नेहमी वाटायचं. त्यांचं माझ्यावरील प्रेम पाहून भारावून जायला होतं. त्यातील प्रत्येकाला मेसेजवर रिप्लाय करणं खरं तर शक्य होत नाही. पण, माझ्यासाठी एवढं सगळं करणाऱ्या माझ्या चाहत्यांशी बोलण्याची माझी खूप इच्छा होती. या लॉकडाउनच्या दिवसांत माझी ती इच्छा पूर्ण झाली. माझं फॅनपेज चालवणाऱ्या काही निवडक चाहत्यांशी मी व्हिडीओकॉलच्या माध्यमातून संपर्क साधला. यावेळी आमची अनेक विषयांवर चर्चा झाली, मनमुराद गप्पाही झाल्या. त्यांच्याशी गप्पा मारताना मलाही खूप आनंद झाला. माझ्या या चाहत्यांना मला भेटता आलं नाही तरी सोशल मीडियामुळे त्यांच्या संपर्कात राहता येतं ही सुखावणारी गोष्ट आहे.

-ऋता दुर्गुळे, अभिनेत्री

मुंबई-पुण्यात माझे असे अनेक चाहते आहेत जे माझ्या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला आवर्जून येतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगलीची ऐश्वर्या माझ्याशी जोडली गेली. तिनं माझ्या नावाचा टॅटू काढून, नंतर सोशल मीडियावर मेसेज करून ते मला पाठवलं होतं. मी सांगलीला तिला भेटायला गेलो त्यावेळी आमच्या थोड्या-फार गप्पा झाल्या. माझं काम बघून, तिलाही नाटकांमधून काम करण्याची आवड निर्माण झाल्याचं तिनं सांगितलं. त्यानंतर तिने थिएटर मॅनेजमेंटचं रीतसर प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केल्याचं मला कळवलं. शिवाय, चार-पाच वर्षांची एक लहान मुलगी माझे टीव्ही आणि सोशल मीडियावरील व्हिडीओ, फोटो बघून मला ओळखू लागली होती. तिचे पालक एकदा 'दळण'च्या प्रयोगाला तिला घेऊन आले होते. प्रयोग सुरू असताना मला रंगमंचावर पाहून तिनं एक-दोन वेळा आवाजही दिला. प्रयोगानंतर गर्दीतून वाट काढत पुढे येऊन ती मला भेटली.

-अमेय वाघ, अभिनेता

प्रियंका मांजरेकर नावाची माझी एक चाहती आहे. लॉकडाउनच्या दिवसांत मी केलेल्या सर्व पन्नास लाइव्ह सेशन्सना तिनं सोशल मीडियावर हजेरी लावली होती. त्या प्रत्येक सेशनची आठवण म्हणून त्या प्रत्येक सेशनचे फोटो तिनं काढून ठेवले होते. प्रियंकानं मला पन्नासाव्या दिवशी एक व्हिडीओ पाठवून सुखद धक्का दिला. माझ्या लाइव्हमध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकार मंडळींना आणि माझं सेशन रोज बघणाऱ्या चाहत्यांना विनंती करून माझं कौतुक करणारा आणि माझ्या लाइव्हसाठी आभार मानणारा व्हिडीओ तिनं बनवला होता. प्रत्येक कलाकार मित्र-मैत्रिणीचा छोटा व्हिडीओ तिनं मागून घेतला होता. त्यामुळे मला तो व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रचंड आनंद झाला. आम्ही अजून भेटलेलो नाही. पण, तरीही माझ्यावरील प्रेमाखातर तिनं घेतलेल्या या मेहनतीला तोड नाही. शिवाय, सोशल मीडियावरून असे अनेक चाहते जोडले जातात. त्यांना भेटणं, प्रत्येकाला मेसेज करणं शक्य होत नसलं तरी माझा प्रत्येक चाहता माझ्यासाठी स्पेशल आहे.

- प्रसाद ओक, अभिनेता



from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ifxvvD