Full Width(True/False)

पाहा मालिकांच्या टीआरपीसाठी कसं धावून येतं 'शुभ मंगल सावधान'

चैताली जोशी मालिका कशी हवी? अ ने ब ला विचारलं. एकदम खुसखुशीत...ब चं उत्तर. खुसखुशीत म्हणजे ? - अ... म्हणजे एकदम तडकेबाज. त्यात सगळं हवं. भावना हव्यात, प्रेम हवं, मैत्री हवी, दुश्मनी हवी, तंटे हवेत, कारस्थानं हवीत.. - ब. एवढं सगळं? - अ. हो मग..आणि हा... अजून एक हवं.. - ब काय ? - अ. लग्न... - ब. लग्न? - अ.. हो मग... हा मालिकेतला स्पेशल तडका आहे. - ब. अरे मग हा स्पेशल तडका सध्या जरा जास्तच दिसू लागलाय की.. - अ. दिसणारच... मालिकेत जबरदस्त काहीतरी हॅपनिंग हवं असेल, तर हा हुकमी एक्का निघतोच. पण एक आहे... हा हुकमी एक्का नुसताच नको हां. याच्यासोबत हवं धमाकेदार नाट्य... - ब. अ विचार करत चॅनल सर्फिंग करू लागला. एकीकडे लतिका-अभिमन्यूच्या लग्नाचा घाट, दुसरीकडे गौरीच्या लग्नाचं नाट्य, तिसरीकडे अनेक अडथळ्यांनंतर अक्षराचं लग्न ठरलंय तर चौथीकडे काय तर किर्ती-शुभमचं नुकताच सुरू झालेला नवीन संसार, शंतनु-शर्वरीचं लग्न ठरण्याच्या मार्गावर... बरं हे कमी की काय, तिकडे हिंदीत अंबर आणि गुनीतचा लग्नसोहळा बरेच दिवस चालला. रोहनच्या लग्नाची घोषणा केलीय. अनुपमा आणि वनराजचं पुन्हा एकदा लग्न होणार आहे. तर एका आगामी मालिकेच्या प्रोमोमध्येच लग्न दाखवण्यात आलंय. सगळीकडे लग्नच लग्न... यावरून 'आया मौसम दोस्ती का' च्या ऐवजी 'आया मौसम शादी का' असं म्हणावसं वाटलं अ ला. लॉकडाउनमुळे बाकी ठिकाणी लग्न पुढे ढकलताहेत. पण टीव्हीवाले लग्न लावायला मंडप घालून बसलेत. मालिकेतल्या लग्नातलं जेवणं किमान बघायला तरी मिळणार म्हणून अ खुश होऊन गेला. 'फिल गुड फॅक्टर' म्हणतात ते हेच. पण, हे जेवणं असं सहजासहजी मिळणार नाही हे त्याला कळून चुकलं. मालिकेतल्या लग्नातल्या जेवणाला ट्विस्टच्या लोणच्याशिवाय मजाच नाही. ते हवं म्हणजे ह वं च. 'मुलगी झाली हो'मध्ये अक्षराचं लग्न ठरताना किती हो अडथळे? पण शेवटी ठरलं तिचं लग्न. 'सुंदरा मनामध्ये भरली'मध्ये तर लतिकाच्या लग्नामागची गोष्टच रंजक केली. मालिकेचा विषय खऱ्या अर्थानं आता सुरू होईल. 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेच्या पहिल्या २५ भागांमध्येच लग्नसोहळा सुरू झाला. 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये गौरीचं होत असलेलं लग्न जयदीप थांबवतो, असा प्रोमो सध्या सुरू आहे. तो ते लग्न थांबवून स्वत: तिच्याशी लग्न करतो की लग्न मोडतो की गौरीला समजावतो ? या झाल्या शक्यता. पण त्यासाठी महाएपिसोडपर्यंत थांबावं लागेल. हे एक असतं.. लग्न असेल की बऱ्याचदा महाएपिसोड हवाच. तो 'भव्य दिव्य' सोहळा वाटायला नको का? आता 'आई कुठे काय करते'चंच बघा ना. अगदी महाएपिसोड नाही, पण जवळपास तीन आठवडे घेतले मालिकेनं लग्नावर. प्रेक्षकांना त्यात इतकं गुंतवून ठेवायचं, की आपापल्या घरी संध्याकाळी ७.३० वाजता मालिका लावताना 'चल ये गं.... अरुची आज मेहंदी आहे' असं अशा आविर्भावात म्हणायचं की शेजारीच जाताहेत तिला बघायला. 'शुभमंगल ऑनलाइन' या नावातच सगळं आलं. इथे मुद्दा फक्त इतकाच की त्यात लग्न ठरतानाच्या गमतजमतीवर सध्या तरी भर दिसतोय. लवकरच सुरू होणाऱ्या 'कारभारी लय भारी' या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्येही लग्नाचा प्रसंग दाखवण्यात आलाय. हिंदीत तर याहून अति भव्यदिव्य चित्र. 'मेरे डॅड की दुल्हन' मालिकेत लग्नाचं जोडपं आहे पन्नाशीला पोहोचलेलं. पण, हौसेला मोल नसतं. लग्न म्हटलं की ते दमदार व्हायलाच हवं. 'अनुपमा'मध्ये अनुपमा आणि वनराजच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं पुन्हा एकदा लग्न लावणार आहेत. 'इंडियावाली मां'मध्ये नायकाच्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. म्हणजे थोड्याच दिवसांत तिथेही लग्नाचा बार उडेल यात तीळमात्र शंका नाही. 'गुम है किसी के प्यार में' या मालिकेच्या प्रोमोमध्येच लग्न आहे. घरबसल्या इतक्या साऱ्या लग्नसोहळ्यांना जाता येईल या विचारानं अ ला आणखीच आनंद झाला. पण ब ने पुढे आणखी सांगितलं. सरळ पद्धतीनं होईल ते मालिकेतलं लग्न कसलं? आणि एका दिवसात म्हणजे एका भागात असं पटकन आटपेल तेही मालिकेतलं लग्न नाहीच. ते आठवडा-आठवडा चाललंच पाहिजे. मेंदी, हळद, संगीत.. ह्यांव न् त्यांव... त्यात प्रत्येक समारंभात काहीतरी भन्नाट हॅपनिंग हवंच. तेव्हाच कुठे टीआरपीचे आकडे वाढतील ना. बरं या प्रत्येक दिवसांत कोणीतरी काहीतरी कारस्थान करणारं हवं, थोडा रोमान्स हवा, थोडा इमोशनल अत्याचार हवा, थोडीशी मजा-मस्तीही हवीच. पत्रिकेत जसं 'आमच्या आत्याच्या/ मावशीच्या/ काकाच्या/ मामाच्या/ दादाच्या/ ताईच्या लग्नाला यायचं हा' असं असतं ना तसं प्रेक्षक 'लतिका/ गौरी/ अक्षरा/ शर्वरी यांच्या लग्नाला जायचंच हा' असं म्हणत टीव्हीसमोर ठाण मांडून बसतात. एवढा सगळं ऐकून एक मोठा श्वास सोडत; असो.. आपण इथूनच अक्षता टाकून वधू-वरांना शुभेच्छा देऊ... असं म्हणत अ नं शेवटी विषयच संपवला. शुभ मंगल साSSSSSSवधान.... !


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jc4vnX