-श्रेया बुगडे 'चला हवा येऊ द्या'चं आम्ही अगदी सलग शूट करत असतो. एखाद्या नाटकाच्या प्रयोगासारखी आमची स्किट्स वन टेक होतात. हा साद-प्रतिसादाचा खेळ लाइव्ह स्टुडिओतल्या प्रेक्षकांच्या हशा-टाळ्यांमुळे अधिक रंगतो. प्रत्येक भागात आम्ही कलाकार कोणत्या हट के भूमिकेत दिसणार आहोत, याची उत्सुकता रसिकांना असते. पण, येत्या काळातल्या 'न्यू नॉर्मल'मध्ये प्रेक्षकांची प्रत्यक्ष दाद आम्हाला अनुभवता येणार नाहीय. खरं तर आमच्यासाठी प्रेक्षक खूप महत्त्वाचे आहेत. त्यांच्याशिवाय सादरीकरण करणं हे आम्हा कलाकारांसाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. आता लेखकांना विचार करायला भरपूर वेळ मिळाल्यामुळे नवीन संकल्पनांना हात घालण्याचा आमचा प्रयत्न असेल. स्किट्स मुळातच वेगळ्या पद्धतीनं लिहिली जातील. आणि अधिक कल्पकतेनं सादर करण्याचा आमचा प्रयत्न असेल. या ब्रेकमध्ये भरपूर विश्रांती घेऊन आम्हीही नव्या जोमानं काम करण्यासाठी सज्ज झालो आहोत. सुरुवातीला सगळंच थोडं वेगळं वाटेल. परिस्थितीशी जुळवून घ्यायला थोडा वेळ द्यावा लागेल. पण, प्रेक्षकही आम्हाला समजून घेतील असा विश्वास आहे. 'हवा येऊ द्या'चा विश्वदौरा आम्ही केला त्यावेळी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग आम्ही केले होते. काही मोजक्या देशांमध्ये मराठी प्रेक्षकच नव्हते. तेव्हा प्रेक्षकांच्या सहभागाशिवाय स्किट्स बसवली होती. हा अनुभव या न्यू नॉर्मलमध्ये आमच्या गाठीशी आहे. त्यामुळे अजिबात हार न मानता ही वेळ निभावून नेऊ. इतर वेळीही स्किटमध्ये एखादं वाक्य राहिलं, कुठे धडपडलो तरीही आम्ही प्रसंगावधान राखून ती वेळ निभावून नेतो. अशा गोंधळलेल्या वेळी कधीकधी अधिक चांगली विनोदनिर्मिती साधता येते. तसंच या वेगळ्या परिस्थितीशी जुळवून घेताना काहीसे हट के फंडे वापरून सकस मनोरंजन करण्याकडे आमचा कल असेल. 'चला हवा येऊ द्या'वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. वेळप्रसंगी कान धरला आणि पाठ थोपटून भरपूर कौतुकही केलं. प्रेक्षक प्रत्यक्ष भेटून पाठ थोपटतात तेव्हा खूप छान वाटतं. आज प्रेक्षकांच्या काही खास आठवणी तुमच्याशी शेअर करते. लंडनला प्रयोगानंतर आम्ही तिथल्या प्रेक्षकांसाठी 'मीट अँड ग्रीट' कार्यक्रम ठेवला होता. तेव्हा तिथे राहणाऱ्या मराठी कुटुंबातील एक आजी आम्हाला भेटायला आल्या. त्या दिवशी आजींची पंच्याहत्तरी होती. आणि वाढदिवसाची सरप्राइज भेट म्हणून त्यांच्या मुलानं त्यांना आमचा कार्यक्रम दाखवायला आणलं होतं. आम्हा कलाकारांना भेटून आजींना खूप भरून आलं आणि त्यांनी चक्क आम्हाला खाली वाकून नमस्कार केला. 'तुम्ही देव आहात!' हे त्यांचे शब्द होते. आजही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. दर सोमवार-मंगळवरची रात्रीची वेळ ही त्या आजींसाठी खूप खास होती. कारण 'हवा येऊ द्या' बघण्यासाठी त्यांचं सगळं कुटुंब एकत्र जमायचं. तो क्वालिटी टाइम त्यांना खूप काही देऊन जायचा. तिथल्या पाश्चात्य संस्कृतीत कुटुंबाच्या क्वालिटी टाइमचं निमित्त आम्हाला होता येतंय, यासाठी खूप धन्य वाटलं. असेच पुण्यात एक आजोबा बॅकस्टेजला आम्हाला भेटायला आले होते. 'आता मी खूप थकलोय. पुन्हा कधी भेटायला येता येईल का ते माहीत नाही. तुम्ही मला खळखळून हसवता. असेच हसवत राहा', असा आशीर्वाद देऊन एक पाकीट त्यांनी हातावर ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियातला अनुभव आणखी निराळा आणि सुखावणारा आहे. तिथे स्थायिक झालेल्या कुटुंबातील पालकांनी आमचे खूप आभार मानले. 'हवा येऊ द्या'मुळे मराठी शब्द आमच्या मुलांच्या कानावर पडू लागले. मराठी भाषेविषयीचं त्यांचं कुतूहल वाढलं. एखादा पंच कळला नाही, तर मुलं विचारतात. पालकांकडे तो समजावून सांगण्याचा आग्रह धरतात. ही कुटुंब मराठीतून पुन्हा एकदा संवाद साधू लागली. 'सध्याच्या लॉकडाउनमध्येही 'हवा येऊ द्या'मुळे आमचा वेळ मजेत जातो', असं सांगणारे अनेक फोन आणि मेसेजेस आले. वेगवेगळ्या सामाजिक स्तरातील लोक आमचा कार्यक्रम तितक्याच आवडीनं पाहतात. या संकट काळात प्रत्येकाला आपापल्या काळज्या आणि ताण-तणाव आहेत. पण, निदान काही क्षणासाठी तरी रसिकांच्या चेहेऱ्यावर आम्ही हसू आणू शकतो, हे ऐकून खूप बरं वाटतं. आम्ही सुरुवात केली तेव्हा इतका मोठा पल्ला गाठू, असं वाटलं नव्हतं. पण आज 'हवा येऊ द्या' ही एक प्रकारची ह्युमर थेरपी आहे, हे जाणवतं. प्रेक्षकांना आनंदी ठेवण्याचं , हसवण्याचं पुण्यांचं आम्ही यापुढेही असंच करत राहणार आहोत. नव्या नियमांमुळे काही दिवस लाइव्ह स्टुडिओत प्रेक्षकांना येता येणार नाही. आम्ही त्यांना नक्कीच मिस करू. थोडे तांत्रिक बदल करून, वेगळ्या प्रकारची स्किट्स सादर केली जातील. प्रेक्षकांसाठी हास्यविनोदाची रसरशीत मेजवानी घेऊन येण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. मनोरंजनाचा दर्जा उत्तमच असेल याची खात्री देते. (शब्दांकन - गौरी आंबेडकर)
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/31b84Fs