Full Width(True/False)

पटणामध्ये होणार सुशांतसिंह राजपूतचं अस्थिविसर्जन

मुंबई- आज १८ जून रोजी सुशांतसिंह राजपूतचं अस्थिविसर्जन पटणा येथे होणार आहे. याबद्दल सुशांतची बहीण श्वेतासिंह किर्तीने तिच्या फेसबुक पोस्टवर दिली. श्वेता अमेरिकेतून पटणा येथे आली आहे. सुशांतच्या निधनाची बातमी कळल्यानंतर त्याच्या वडिलांची तब्येत बिघडली होती. पण आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. बहीण म्हणाली प्रेमाने द्या निरोप- सुशांतसिंह राजपूत च्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बहीण श्वेता अमेरिकेत असल्यामुळे अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकली नव्हती. पण आता ती वडिलांकडे पटणाला पोहोचली आहे. तिने फेसबुकवर याची माहिती दिली. यासोबतच सुशांतसाठी प्रार्थना करणारे आणि मदत करणाऱ्या अनेकांचे तिने आभार मानले. श्वेता म्हणाली की, 'आज आम्ही भावाचं अस्थिविसर्जन करत आहोत. तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा, त्याला चांगल्या आठवणींसोबत आणि प्रेमाने अखेरचा निरोप द्या. त्याचं आयुष्य साजरं करा आणि आनंदाने त्याला निरोप द्या.' पटणामध्येच होतील पुढील सर्व विधी- सुशांतचं कुटुंब १५ जून रोजी अंत्यसंस्कारांनंतर पटणा परतले होते. सुशांतच्या अस्थी घेऊन त्याचे वडील बुधवारी राजीव नगर येथील घरी जायला निघाले. मुंबईत राहणारी मुलगी मीतू सिंह आणि जावई ओपी सिंह यांच्यासोबत ते पटणाला गेले. सध्या त्यांच्या घरी बाहेरील कोणतीही व्यक्ती जाऊ शकत नाही. सुशांतचं अस्थीविसर्जन आणि इतर विधी पटणामध्येच होतील. यात सुशांतचे वडील त्याच्या बहिणी आणि जावईच असतील असेही सांगण्यात आले. दरम्यान, सुशांतनं आत्महत्येचं इतकं टोकाचं पाऊल का उचललं या संदर्भात पोलीस आता तपास करणार आहेत. खरंच बॉलिवूडमधील स्पर्धेमुळं तो डिप्रेशनमध्ये गेला होता का? याची चौकशी केली जाईल असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखं यांनी म्हटलं आहे. सुशांतच्या शवविच्छेदनाच्या अहवालात त्याने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं होतं. याशिवाय तो क्लिनिकल डिप्रेशनमध्ये होता असंही त्या अहवालात म्हटलं आहे. याची दखल घेऊन गृहमंत्र्यांनी बॉलिवूडमधील स्पर्धा हेच याचे कारण आहे? का याची चौकशीचे आदेश दिले आहेत. मुंबई पोलीस या प्रकरणाचा छडा लावतील असंही त्यांनी म्हटलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YelVsO