Full Width(True/False)

काही विलक्षण अनुभवायचं असेल तर एक तरी वारी कराच

मराठी वर्षातील आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे दैवत. प्रत्येक आषाढी एकादशीला पंढरपूरला वारकरी वारी घेऊन जातात. गेल्या आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून ही वारी सुरू असल्याचे मानले जाते. आषाढी एकादशी म्हटले की, प्रथम डोळ्यांसमोर येते, ती पंढरपूरची वारी. वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीलाही अनन्य साधारण महत्त्व आहे. या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, अशी मान्यता आहे. पंढरपूरच्या वारीची थोरवी गावी, ऐकावी तेवढी थोडीच आहे. वारीबद्दल सांगण्यापेक्षा ती अनुभवण्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. महाराष्ट्राची आगळीवेगळी परंपरा असलेल्या पंढरपूरच्या वारीचा प्रत्यक्ष अनुभव काही कलाकारांनी घेतला आहे. विठ्ठलभक्तीच्या या अगाध सोहळ्यात सहभागी होताना काय वाटलं? या वारीनं त्यांना नेमकं काय दिलं हे जाणून घेऊ त्यांच्याच शब्दांत. शब्दांकन : अजय उभारे

वारीनं मला खूप भरभरून दिलं. वारीच्या निमित्तानं मला माणूसपण बघायला मिळालं. विविध आव्हानांना सामोरं जाण्याचं बळ दिलं. प्रचंड पावसातही वारीतील प्रत्येक वारकरी बेभान होऊन नाचत, विठूनामाचा गजर करताना पाहून भारावून जायला होतं. विठ्ठलभक्तीत तल्लीन असणाऱ्या कुणालाही वाटेत येणाऱ्या अडचणींची तमा नसते. मनाची श्रीमंती दाखवत वारकऱ्यांची पावलं पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात. माऊलींच्या रथावर बसायचा योग मला आला होता. त्या रथावरून दर्शन घेणं आणि काही वेळ त्याचं सारथ्य करणं हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण होता. एका वर्षी मला पंढरपुरात जाऊन गर्दीमुळे मला फक्त कळसदर्शन मिळालं होतं. त्यावेळी एका मित्राच्या सांगण्यावरून तिथल्या 'पालवी' आश्रमात मी थांबलो. एचआयव्हीग्रस्त लहान मुलांचं वास्तव्य असलेला हा आश्रम. पांडुरंगाचं दर्शन मिळालं नाही म्हणून मी थोडा हिरमुसला होतो. पण, 'पालवी'मधील लहानग्यांसोबत खेळून, त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद बघून मला मिळालेलं समाधान हे माऊली दर्शन होतं. त्यापैकी पाच मुलांना मी दत्तक घेतलं आहे. माऊली कृपेनं 'पालवी'मधील प्रत्येकाशी जुळलेलं हे आपुलकीचं नातं आहे.

'गजर' चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा २०१० साली वारीला गेलो होतो. हा संपूर्ण चित्रपट वारीतच चित्रित झाला असल्यामुळे तब्बल अठरा दिवस मी आणि माझी संपूर्ण टीम चित्रीकरणाबरोबरच वारीचाही मनोमन आनंद घेत होतो. त्याच्यानंतरही कधी पालखी प्रस्थान सोहळ्यावेळी तर, कधी आषाढी एकादशीला मी पंढरपूरला गेलो आहे. वारीतील चित्रीकरणाचा अनुभव हा माझ्या अनेक अविस्मरणीय अनुभवांपैकी एक आहे. वारीत लाखो भाविकांमध्ये राहून एक अख्खा चित्रपट करणं ही काही सोपी गोष्ट नाही. प्रत्येक वारकरी एक वेगळी भावना आणि नाद मनात घेऊन चालत असतो. त्यामुळे 'गजर'चं चित्रीकरण हे एक आव्हान होतंच. पण, माऊली कृपेनं ते सुरळीत पार पडलं. वारी हा एक समुद्र आहे. आपण मात्र आपापल्या डबक्यात जगत असतो. महाराष्ट्र म्हणजे काय हे तुम्हाला वारीत जवळून पाहता येतं. मी जेवढ्या वेळेला मी वारी केली तो प्रत्येक क्षण मला नवी ऊर्जा आणि सकारात्मकता देणारा ठरला. वारकऱ्यांची तल्लीनता अनुभवणं विलक्षण आहे.

पुण्यात ज्या दिवशी पालखी येणार त्या दिवशी शाळांना अर्धा दिवस सुट्टी दिली जायची. पालखीच्या स्वागतासाठी अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जायचे. माझे एक काका फर्ग्युसन रोडला राहायचे. त्यांच्या घराच्या बाल्कनीमधून आम्ही दरवर्षी पालखी बघायला जात असू. पालखी बघणं हा खरंच एक सुखद अनुभव असायचा. माऊलींची पालखी जसं जशी जवळ यायची तसतसा वाढत जाणारा टाळ-मृदुंगाचा आणि वारकऱ्यांचा गजर, लेझीम आणि ध्वजपथकाचा आवाज बळ देणारा ठरतो. 'ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम', असे घोष करत सबंध रस्ता वारकऱ्यांनी फुलून जायचा. हे सगळं अनुभवण, धावत जाऊन पालखीचं दर्शन घेणं हा थरारक अनुभव असायचा. पालख्या पुढे गेल्या तरी विठूनामाचा गजर पुढचे अनेक दिवस कानात ऐकू येत असतो. पालखीची विविध ठिकाणची दृश्य बघायलाही मला फार आवडतं. या सगळ्याच शब्दांत वर्णन करणं खरंच कठीण आहे.

महाराष्ट्रातील वारीची परंपरा आणि वारकरी संप्रदाय यांनी प्रत्येक माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं. वारी म्हणजे, माणसाने माणसाशी माणसासारखं वागण्याचा संदेश देणारी एक परंपरा आहे. आज जात, धर्म, भाषा, गरीब-श्रीमंत यातून आपण माणसं एकमेकांवर कुरघोडी करु पाहतोय. पण अडल्यानडल्याला मदत करत, विठूनामाचा गजर करत पुढे चालत राहण्याची मोलाची शिकवण वारीनं दिली. आपण वारीत चालतो आणि प्रत्येक वारकऱ्याकडे पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की त्यांना माऊलीखेरीज अन्य कोणत्याही गोष्टीशी काही देणं-घेणं नसतं. चालत जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यावर विठूरायाचं नेहमी लक्ष असतं असं मला वाटतं. 'ग्यानबा तुकारामाचा' गजर करत मी देहूपासून पंढरपूरपर्यंत वारी अनुभवली आहे. 'ज्ञानेश्वर माऊली' आणि 'तुकाराम माऊली' या दोन्ही पालख्यांचा अनुभव मी घेतला आहे. त्यावेळी वारकऱ्यांकडून मला मिळालेली उर्जा आणि सकारात्मकता शब्दांत मांडणं अशक्य आहे.

अवधूत गुप्ते दिग्दर्शित 'एक तारा' या चित्रपटातील माझी भूमिका ज्ञानेश्वर सदाबा लोखंडे (माऊली) ही काहीशी वारकऱ्याशी साधर्म्य साधणारी होती. या भूमिकेसाठी मी योग्य नाही असं सुरुवातीला त्यांना वाटलं होतं. गावात भजन गाणारा माळकरी वंशातील एक मुलगा या चित्रपटात साकारायची संधी मला मिळाली. भजन-कीर्तन करत विठ्ठलभक्तीत तल्लीन होणं म्हणजे नक्की काय हे मला त्यावेळी कळलं. ती व्यक्तिरेखा एवढी सोज्वळ, पवित्र होती की त्याचा उपयोग मला खऱ्या आयुष्यातही झाला. माझ्या हातून ते काम योग्यरित्या झालं हेही माऊलीची कृपा आहे. माळकरी होणं म्हणजे काय याचा फरक मला त्यावेळी जाणवला. एकमेकांबद्दल, एकमेकांच्या विचारांबद्दल आदर करणं वारी शिकवते. या विठूरायाच्या भक्तांविषयी मला प्रचंड आदर आहे. जेव्हा बोलावणं येईल तेव्हा मलाही प्रत्यक्षात माझी वारीला जाण्याची इच्छा आहे.



from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2BjKtrI