मुंबई- मालिकेचा प्रत्येक एपिसोड दाखवला गेला की त्यातले माझे संवाद घेऊन लगेचच तयार केले जातात. मालिकेतल्या ‘’नं एखादी नवीन गोष्ट केली रे केली, की मिम्समधून अनेक जण त्यावर व्यक्त होतात. 'बबड्यामुळे माझी आईही माझ्यावर शंका घ्यायला लागलीय' असे गमतीशीर मेसेज मला येत असतात. खरंच सर्व जण खूपच छान छान मिम्स तयार करतात. हे मिम्स बघून खूप मजा येते, हसू येतं. माझी भूमिका प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचतेय याची ही पोचपावती असल्यामुळे मला खूप छान वाटतं. मित्रांचे मेसेजेस येतात, मी स्वत:ही बबड्यावर येणारे मिम्स फॉरवर्ड करत असतो. यापुढच्या भागांमध्ये बबड्या ज्या-ज्या गोष्टी करेल त्यावर अनेक मिम्स बनतील हे नक्की. नुकतंच आमच्या मालिकेला एक वर्ष पूर्ण झालं. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद, आमच्यावरील प्रेम, प्रेक्षकांकडून आमच्या भूमिकांना वेळोवेळी मिळालेली दाद या सर्वांमुळे खूप छान वाटतं. मला जेव्हा या भूमिकेसाठी विचारणा झाली, तेव्हा सोहम हे काहीसं ग्रे शेड (नकारात्मक) असलेलं पात्र असल्यामुळे सुरुवातीला मी जरासा गोंधळलो होतो. पण, एक कलाकार म्हणून मी हे आव्हान स्वीकारलं. लगेचच या भूमिकेसाठी होकार दिला. हा बबड्या प्रत्येकाच्या घराघरात आणि मिम्सपर्यंतसुद्धा पोहोचला आहे. पुढील भागांत 'बबड्या काय नवीन करणार' याची उत्सुकता जितकी प्रेक्षकांना असते, तितकीच मला देखील असते. त्यामुळे स्क्रिप्ट हातात पडली रे पडली, की अतिशय उत्सुकतेनं मी ती पहातो. कधी-कधी तर 'अरे, काय हा मुलगा आहे' असं माझंदेखील होतं. ही एक भूमिका आहे आणि ती ताकदीनं प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे, हे ध्यानात ठेवून मी ती भूमिका वठवतो. प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि बबड्यावर येणारे मिम्स पाहून खूपच भारी वाटतं. माझे कुटुंबीयसुद्धा माझ्या भूमिकेला नेहमी पोचपावती देतात. बऱ्याचदा चित्रीकरण संपवून मी घरी पोहोचतो, तोपर्यंत टीव्हीवर मालिकेचा त्या दिवसाचा एपिसोड दाखवून झालेला असतो. घरी पोहोचलो की दरवाजा उघडतानाच आई माझ्याकडे रागानं पाहते. आईच्या डोळ्यांतील राग पाहिल्यावर मला त्या दिवशीच्या भागात बबड्यानं केलेली गोष्ट आठवते. त्या एपिसोडमधलं माझं काम योग्य प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्याची माझी खात्री पटते. लॉकडाउनमध्ये मी चित्रपट, वेब सीरिज पाहणं, वाचन करणं यासारख्या गोष्टी केल्या. हॉटेल मॅनेजमेंट केल्यानंतर लगेच मी अभिनय क्षेत्राकडे वळलो होतो. त्यामुळे लॉकडाउनमध्ये मिळालेल्या वेळेत विविध पदार्थ करून पाहिले. 'मला व्यवस्थित जेवण करता येतं' हे मला लॉकडाउनमुळे कळलं. लॉकडाउनदरम्यान आणि सध्याही चित्रीकरण जास्त वेळ लांबत नसल्यामुळे मिळालेल्या वेळेत मी घरी आईला कामात मदत करतोय. आयुष्यात संकटं, अपयश या गोष्टी येतच असतात. त्यामुळे निराश होऊन धीर सोडू नका. सकारात्मक राहून मेहनत करत राहा हे मी आजच्या तरुणांना आवर्जून सांगू इच्छितो. सुरक्षिततेचे सगळे नियम पाळून आमचं चित्रीकरण सुरू झालंय. सेटवर प्रत्येकाला वेगवेगळ्या रुम्स आहेत. सुरक्षित वावराचे नियम, प्रत्येक गोष्टीचं काटेकोरपणे पालन होतंय. आमच्या सर्वांच्या आणि प्रेक्षकांच्याही लाडक्या आजोबांना आम्ही सर्व जण खूप मिस करतोय. प्रत्यक्ष भेटत नसलो, तर आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. - शब्दांकन : केतकी मोडक (विद्यावर्धिनीज कॉलेज)
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jT6ejB