कथानकाची गरज म्हणून पाऊस असेल, किंवा पावसानं उडवलेली दाणादाण असेल, कलाकारांकडे जलधारांच्या वर्षावाचे असे अनेक रम्य आणि थरारकही अनुभव असतात. सध्या सगळीकडे तुफान कोसळणाऱ्या धो-धो पावसानिमित्त, त्यांचे हेच अनुभव जाणून घेत 'मुंटा'नं तुमच्यासमोर मांडले आहेत. हिरवाई अन् इंद्रधनुष्य 'प्रतिबिंब' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानची ही गोष्ट आहे. गिरीश मोहिते दिग्दर्शित या चित्रपटामध्ये माझी आणि अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका आहे. आम्ही नाशिकजवळच्या एका गावात शूटिंग करत होतो. पावसामुळे सगळं गाव हिरवंगार झालं होतं. शेतात पिकं डोलत होती. ओढे खळाळून वाहत होते. पावसामुळे लोकेशनही एकदम सुंदर, प्रसन्न झालं होतं. त्या दिवशी मोंटाजेस शूट करायचे, असं ठरलं होतं. मोंटाजेस म्हणजे गाणं सुरू असताना चित्रपटात दिसणारे छोटे-छोटे शॉट्स. मला अनेक वेळा कपडे, गेटअप बदलावा लागणार होता. हे सगळं थोडाही वेळ न फुकट घालवता खूप पटापट करायचं होतं. त्यात कधीही पाऊस पडेल अशी चिन्हं दिसत होती. लोकेशनवर फक्त दोन व्हॅनिटी व्हॅन्सची सोय होती. इतकी धावपळ करायची म्हणजे खरं तर टेन्शन यायला हवं होतं. पण त्या दिवशीचं वातावरण कमालीचं ताजंतवानं करणारं होतं. अजिबात दमायला झालं नाही. शूटिंग करताना खूप मजा आली. मधल्या ब्रेक्समध्ये मी, अंकुश आणि गिरीश आकाशाचे बदलणारे रंग न्याहाळत बसायचो. इंद्रधनुष्यही आमच्या सोबतीला होतं. गरमागरम चहाचे घोट घेत अनुभवलेले ते क्षण अजूनही लक्षात आहेत. - सोनाली कुलकर्णी (सिनियर), अभिनेत्रीशूटिंगला पावसाची साथ 'फत्ते शिकस्त', 'फर्जंद'नंतर आता 'जंगजौहर' हा चित्रपट घेऊन आम्ही येतोय. या सिनेमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं आम्ही नव्या पिढीसाठी डॉक्युमेंटेशन करतोय. इतिहासाची पुनरावृत्ती करणं खूप आव्हानात्मक असतं. पन्हाळगडाला सिद्धीजौहरने घातलेला वेढा आणि तिथून महाराजांची झालेली सुटका हा मुख्य भाग 'जंगजौहर'मध्ये आहे. मूळ इतिहासातही पावसानं यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे चित्रीकरणादरम्यान आम्हाला पाऊस हवाच होता. आम्ही गेल्या वर्षाच्या जुलै महिन्यात कोल्हापुरात तालमींना सुरुवात केली होती. तालमीच्या वेळी पाऊस अक्षरशः धो-धो कोसळत होता. त्या धो-धो पावसात काम करताना आमचा थरकाप व्हायचा. तेव्हा प्रश्न पडायचे 'आताच आपल्या अंगावर इतका काटा येतोय, तर साडेतीनशे वर्षांपूर्वी जेव्हा इतिहास प्रत्यक्ष घडला तेव्हा काय झालं असेल? आणि आपल्या तालमींना तर पावसानं दणदणीत हजेरी लावली आहे. पण शूटिंग करताना पाऊस असेल ना?' पुढे डिसेंबर महिन्यात आम्ही या चित्रपटाचं शूटिंग केलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे डिसेंबरमध्येही पाऊस पडत होता. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड घेऊनही काही ठिकाणी पाऊस पाडला गेला. पण, ज्या सीन्ससाठी पाऊस पडणं अपेक्षित होतं, तेव्हा खरा पाऊसही पडला. पावसानं आमच्या शूटिंगला दिलखुलास साथ दिली. - मृणाल कुलकर्णी, अभिनेत्री वादळानं दाणादाण मला पाऊस खूप आवडतो. पाऊस त्याची एक वेगळी ऊर्जा, उत्साह घेऊन येतो. योगायोगानं माझ्या जवळजवळ प्रत्येक चित्रपटात पाऊस आहे. 'नटरंग'च्या वेळचा एक खतरनाक किस्सा आहे. आम्ही चित्रीकरण करत होतो ते पावसाचे दिवस नव्हते. त्यामुळे मी तसा निर्धास्त होतो. पण, कसा माहीत नाही...पाऊस आला. जणू आमचं शूटिंग सुरू आहे हे त्यानं कदाचित पाहिलं आणि मग पुरतं गाजवायचं त्यानं मनावर घेतलं. पावसाचं रूपांतर वादळात झालं. आम्ही ठोकलेले कापडी तंबू उडून जाऊ लागले. मला आठवतंय आमच्या टीममधला प्रत्येक जण एकेका खांबाला अक्षरशः मिठी मारून उभा होता. पण निसर्गाच्या तांडवासमोर आम्ही काहीच करू शकलो नाही. आमचं खूप नुकसान झालं. 'न्यूड' चित्रपटाचा शेवटचा सीनही मुसळधार पावसात शूट केला आहे. नालासोपाऱ्याच्या एका समुद्र किनाऱ्यावर आम्ही होतो. बेभान वारा, तुफान पाऊस आणि त्यात समुद्राला भरती होती. सेटवरचे सगळे चिंब भिजले होते. समुद्राच्या लाटांचा वेग इतका होता, की दर दहा मिनिटांनी आम्हाला दीड किलोमीटर मागे यावं लागायचं. ते शूट पूर्ण करताना कसरत झाली होती. तरीही माझ्यासाठी पाऊस खूप लकी आहे, असं मी म्हणेन. या पुढच्या चित्रपटातही आणखी वेगळ्या मूडमधला पाऊस दाखवायला मला आवडेल. - रवी जाधव, दिग्दर्शक तरी प्रयोग गाठला… 'इडियट्स' या आमच्या नाटकाचा डोंबिवलीला प्रयोग लावला होता. पावसाळ्यामध्ये डोंबिवलीला प्रयोग म्हणून मला थोडं टेन्शन आलं होतं. त्यात माझी गाडी सर्व्हिसिंगला दिली होती. त्यामुळे पावसाळ्यात प्रवासाची कसरत करत पोहोचावं लागणार असा अंदाज होता. डोंबिवलीला दुपारी चारचा प्रयोग होता. म्हणजे साडेतीनपर्यंत मला नाट्यगृहात पोहोचणं भाग होतं. मी मढ आयलंडला राहते. पाऊस पडत होता म्हणून नेहमीपेक्षा लवकरच मी निघाले. जेट्टी स्टँडवर पोहोचताच मला कळलं की धोक्याचा इशारा दिल्यामुळे जेट्टी पूर्ण बंद आहे. मग टॅक्सी, मेट्रो असा प्रवास करत कसंबसं घाटकोपर स्टेशन गाठलं. पावसाचा जोर वाढत होता. मी पूर्णपणे भिजले होते. ट्रेननं जेमतेम ठाण्यापर्यंत पोहचले आणि कळलं की ठाण्याच्या पुढे ट्रेन जात नाहीयत. काय करावं मला काहीही सुचत नव्हतं. साडेतीन वाजता ठाणे स्टेशनच्या बाहेर मी उभी होते. अॅपवरुन टॅक्सीचं बुकिंग होत नव्हतं. आजूबाजूला पाणी भरलंय अशा बातम्या कानावर पडत होत्या. मला काहीही करून डोंबिवलीच्या थिएटरपर्यंत पोहोचायचं होतं. कसं जावं हे लक्षात येत नव्हतं. तितक्यात एका रिक्षावाल्यानं मला ओळखलं. मी त्याला सगळी परिस्थिती समजावून सांगितली. तो म्हणाला, 'मॅडम, तुम्ही रिक्षात बसा. मी चारच्या आधी तुम्हाला थिएटरमध्ये पोहोचवतो.' आणि, जिकडेतिकडे साचलेल्या पाण्यातून अक्षरशः भरधाव वेगानं रिक्षा चालवत त्यानं ३.५५ ला मला थिएटरजवळ उतरवलं. मी त्या रिक्षाचालकाचे आभार मानले. त्याला प्रयोगाला बसण्याची विनंती केली. पण तो काही थांबला नाहीत. तेव्हाच्या या प्रवासानंतर, पावसाळ्यामध्ये नाटकाचा प्रयोग म्हटला की मला थोडी भीतीचं वाटते. - स्मिता तांबे, अभिनेत्री गौरी आंबेडकर, रुईया कॉलेज
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/30lcxTM