० लॉकडाउनचा काळ कसा जातोय? सुरू झालं तेव्हा सुरुवातीला दोन महिने रिकामा वेळ मिळाल्यानं आनंद झाला होता. बरेच दिवस करता न आलेल्या गोष्टी केल्या. काही पाककृती करून पाहिल्या. बरीच पुस्तकं वाचून झाली. काही चित्रपट पाहिले. जे-जे करता आलं नव्हतं, ते केलं. नंतर मात्र कंटाळा येऊ लागला. घरातली बरीचशी कामं झाली, साफसफाई झाली. मुळात आमच्या क्षेत्रात तशी काही विशेष घडामोड नव्हती. ऑनलाइन अॅक्टीव्हीटींमध्ये मला फारसा रस नव्हताच. त्यामुळे त्याकडे मी वळले नाही. घरच्या घरी व्यायाम, योग, डाएट अशा गोष्टी करत होते. ० सोशल मीडियावर तुम्ही दिसत नाही... सोशल मीडियावर राहणं मला नाही आवडत. मी फेसबुक अकाऊंट अनइन्स्टॉल केलंय. इन्स्टाग्राम अकाऊंट फक्त प्रोजेक्ट प्रमोशनसाठी वगैरे वापरते. मला ते फारसं आवडत नाही. काही लोक या माध्यमाचा सकारात्मक वापर करून घेतात. नाटकांच्या प्रमोशनसाठी वगैरे त्याचा उपयोग केला जातो. पण, सोशल मीडियावर फॉलो करणारी मंडळी प्रत्यक्षात नाटकाला किती येतात हा प्रश्नच आहे. माझं सोशल मीडियावर व्यक्त होणंही होत नाही. माझा त्यावरील वावर अगदी बेसिक गोष्टींपुरता आहे. 'लाइव्ह' सेशन्समध्येही चाहत्यांना नुसतं 'हाय, हॅलो' करत राहणं मला आवडत नाही. त्यात काहीतरी भरीव घडलं पाहिजे, नाही तर सगळा नुसता बाष्कळपणा होतो. ते माझ्या पचनी पडत नाही. वाचा: ० लॉकडाउननंतर चित्रीकरणाचं युनिट कमी होणार आहे. काय अडचणी येतील शूटिंग करताना? सरकारनं एवढे नियम आखून दिले आहेत, की त्या नियमांनुसार प्रत्यक्ष काम करतानाच अनेक गोष्टी कळताहेत. मुळात कमी युनिटसह चित्रीकरण करण्यात येणार आहे. मेकअप आर्टिस्ट कमी आहेत. आमच्या 'स्वामिनी'सारख्या ऐतिहासिक मालिकेसाठी मेकअप आर्टिस्ट जास्त लागायचे. पण, आता कर्मचारी कमी झाल्यामुळे कलाकारांवर अधिक जबाबदारी आलीय. कलाकार कमी असल्यानं सीन कोरिओग्राफ करताना खूप बदल करावे लागतील. या पद्धतीनं कमीत कमी लोकांमध्ये काम करत दृश्य प्रभावीपणे साकारण्याचं आव्हान असेल. काम करताना सतत जागरुक राहावं लागेल. चित्रीकरणात बऱ्याच तांत्रिक गोष्टी असतात. ऐतिहासिक मालिका असेल, तर भरजरी पेहरावात वावरावं लागतं. त्यामुळे एकूणच सेटवर काम करताना अडचणी वाढणार आहेत. वाचा: ० अनेक कलाकार सध्या वेब सीरिजकडे धाव घेत असताना तुम्ही मात्र अद्याप या माध्यमावर का दिसला नाहीत? वेब सीरिजमध्ये बऱ्याचदा अंगप्रदर्शन करणारी, बोल्ड दृश्यं असतात. मला अशा व्यक्तिरेखा करायच्या नाहीयत. मी ज्या भूमिका करेन, त्यांना काहीतरी अर्थ असला पाहिजे. उगाचच, वेबवर काम करायचंय म्हणून मी करणार नाही. मी माझ्या अटींवर काम करते. त्या अटी वेब प्लॅटफॉर्मवर काम करताना किती वर्कआऊट होतील ते माहीत नाही. करेन तर मी माझ्या अटींवर करेन, अन्यथा नाही. माझ्या अटींसह ते कसं जमायचं ते बघू. अलीकडेच मी लॉकडाउनमध्ये घरबसल्या ऋषी मनोहरबरोबर एका प्रोजेक्टवर काम केलं. एका कंपनीला त्याचा आशय एवढा आवडला की त्यांनी लॉकडाउननंतर त्यावर काम करण्यास सांगितलं आहे. लॉकडाउननंतर आम्ही त्याची वेब सीरिज करू. नीट चित्रीकरण करून तो प्रसारित करू. ० सुशांतसिंहच्या आत्महत्येनंतर नैराश्याबाबत खूप बोललं जातंय. इतकी वर्षं इंडस्ट्रीत काम करत असताना तुम्हाला कधी नैराश्याशी सामना करावा लागला होता का? नाही. एक तर मी खूप प्रॅक्टीकल आहे. मला भारंभार सगळ्याच गोष्टी करायच्या नाहीत. मला जे करायचंय ते मला बरोब्बर माहीत आहे. काही वर्षांपूर्वी मी जेव्हा ग्रामीण भागात चालणारे चित्रपट करत होते तेव्हाही माझा त्यामागचा उद्देश स्पष्ट होता. काही कामांचा तुम्हाला योग्य तो दाम मिळत असतो. पण ते सगळेच प्रोजेक्ट मनासारखे असतात असं नाही. तेव्हाही मी काम करण्यातला आनंद घेत होते. नंतर मी मालिका करू लागले. माझ्या मर्यादा मला ठाऊक आहेत. मला प्रगती करून कुठवर जायचंय हे मला माहीतय. तुमच्या आजुबाजूची माणसं खूप महत्त्वाची असतात. अविनाश मला नेहमी प्रोत्साहन देत असतात. काही वेळा एखादी संधी हातून गेल्यावर वाईट नक्कीच वाटतं. पण, त्याचा मनावर परिणाम होऊ देत नाही. तसं वातावरण घरात कायम राखणं हे समोरच्या व्यक्तीवरही अवलंबून असतं. सुदैवानं ते मला नेहमीच मिळालं. सोशल मीडियावर राहणं मला नाही आवडत. माझा त्यावरील वावर अगदी बेसिक गोष्टींपुरता आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3iB3yGj