अजय उभारे लॉकडाउनच्या काळात उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीत प्रत्येकजण आपल्या कुटुंबासोबत आहे. कुटुंबियांना वेळ देतोय. आपल्या जोडीदारासोबत क्षण जगतोय. पण, कधी कधी नात्यांमध्ये अधिक जवळीक आली तरी दुरावा निर्माण होतो. वाद-तक्रारी वाढू लागतात. जबाबदारी आणि कामाच्या ओघात तो तिच्या किंवा ती त्याच्या भावना समजून घेण्यात कमी पडतात का? आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी ती करत असलेली धडपड या कशातच तो नव्हता याची त्याला जाणीव होते का? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला तेव्हाच मिळायला लागतात जेव्हा ती व्यक्ती आपल्यासोबत नसते. 'शेवंती' हा लघुपट अशाच प्रकारे तरुण-तरुणींना त्यांच्या नात्यातील गुंता हळुवारपणे सोडवण्याचा संदेश देतो. वननेस फिल्म्स निर्मित हा लघुपट आहे. कवी-लेखक चंद्रशेखर गोखले यांनी लेखन आणि निलेश अरुण कुंजीर यांनी 'शेवंती' या लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नातेसंबंध जपायला आणि जगायला शिकवणारी ही गोष्ट अभिनेता आणि अभिनेत्री दीप्ती देवीच्या अभिनयानं साकारली असून, प्रेक्षकांना ती अनुभवता येणार आहे. जोडप्यांमधील प्रेम, वाद-संवाद, सहवास, आपलेपणा आणि दुरावा या सर्व अव्यक्त भावना आदिनाथ आणि दीप्ती या जोडीनं आपल्या सुंदर अभिनयातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. या लघुपटाच्या निमित्तानं प्रथमच आदिनाथ कोठारे आणि ही जोडी प्रेक्षकांसमोर येते आहे. आदिनाथ आणि दीप्ती या जोडीच्या बरोबरीने प्रथमेश रांगोळे (छायाचित्रण), जागेश्वर ढोबळे (संकलन), प्रशांत कांबळे (साऊंड डिझायन) आणि अमित धनराज (डीआय) अशी टीम पडद्यामागे आहे. या लघुपटाचं कथावाचन गायक आणि संगीतकार मिलिंद इंगळे यांनी केलंय. इंगळे यांनी त्यांचा मुलगा सुरेल इंगळेसोबत 'शेवंती'ला पार्श्वसंगीत दिलं आहे. 'सर्वोत्तम शॉर्ट फिल्म', 'सर्वोत्तम दिग्दर्शक' असे ५ पुरस्कार विजेती ठरलेला 'शेवंती' आता एमएक्स ,एअरटेल एक्ट्रीम आणि हंगामा प्लेअवर पाहू शकता. चंद्रशेखर गोखले यांच्या एका छोट्या कथेचं आमच्या दिग्दर्शकांनी उत्तम पद्धतीनं सादरीकरण केलं आहे. दीप्तीबरोबर काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. सहकलाकार म्हणून तिच्यासोबत काम करायला खूप मजा आली. माझ्यासाठी हा लघुपट एक वेगळा अनुभव देणारा ठरला. प्रत्येकाच्या आयुष्यात येणाऱ्या या टप्प्याचा सामना आपण कसा करतो, त्यातून काय अनुभव मिळतो? या सगळ्या गोष्टींवर भाष्य करणारा हा आमचा लघुपट आहे. ही कथा प्रेक्षकांनाही आवडेल अशी खात्री वाटते. -आदिनाथ कोठारे, अभिनेता


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gtAkr3