'ज्या लेखक-दिग्दर्शकांना चांगला चित्रपट करायचा आहे, अशांनी बिनदिक्कत माझ्याकडे यावं', असं ती सांगते. '' सिनेमाच्या निमित्तानं सोबत झालेल्या गप्पा. ० पुन्हा एकदा तुझ्या भूमिकेची जोरदार चर्चा आहे. ही भूमिका निवडताना नेमकं काय मनात होतं?- ह्युमन कम्प्युटर म्हणून ज्या भारतीय स्त्रीची ख्याती जगभरात झाली, तिची भूमिका साकारायला मिळणं यातच एक वेगळा आनंद सामावला आहे. अनु मेनननं कथा ऐकवली तेव्हाच कुठंतरी मनात भूमिकेचं काम सुरू झालं. प्रत्येक स्त्रीनं स्वतःसाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी आणि ती खरी करण्यासाठी असं बिनधास्त असावं, असं वाटून गेलं. ० आर्यभट्ट, रामानुजन अशी थोर गणितज्ज्ञांची परंपरा आपण सांगतो. मग त्यामानानं शकुंतलादेवी यांच्यावर चित्रपट येईपर्यंत त्या अनेकांना माहीत नसणं याबद्दल तुला काय वाटतं?- स्त्री म्हणून उपेक्षित असणं हा मुद्दा त्यात आहेच. आपल्याच माणसांची माहिती नसणं, वा त्यांचं कार्य विस्मृतीत जाणं हा समाज म्हणून आपलाच दोष आहे. आता त्यांचं कार्य सगळ्यांसमोर येईल. असामान्य गणिती ज्ञान असलेल्या स्त्रीचं कार्य, जीवन आपण सेलिब्रेट करायला हवं. ० चित्रपटगृहांत ज्यांचा आनंद घेता येईल अशा कलाकृती आता ओटीटीकडे वळत आहेत...तुझं मत काय?- चित्रपटगृहं सुरू झाली, तरी लोक तिथं केव्हा जातील हे सांगता येणं कठीण आहे. निश्चितच हा चित्रपटही थिएटरसाठीच झाला आहे. मात्र, सध्याच्या काळाचं माध्यम म्हणून ओटीटीला हरकत नाही. चित्रपट तयार झाल्यावर तो प्रदर्शित होणं मला महत्त्वाचं वाटतं. अॅमेझॉन प्राइममुळे चित्रपट जगभरात पोहेचेल, सहकुटुंब पाहिला जाईल याचं समाधान आहे. ० 'परिणिता'पासून 'कहानी', 'बेगम जान', 'तुम्हारी सुलू' आणि आता तुझ्या या चित्रपटापर्यंतच्या भूमिकांकडे वुमेन पॉवर म्हणून पाहिलं जातं. 'पॉवर' या अर्थानं तू त्याकडे कसं पाहतेस?- खरं तर हा चाहत्यांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा आशीर्वाद आहे. मी प्रामाणिकपणे माझं काम करायचा प्रयत्न करतेय. चाहत्यांकडून मिळणारं प्रेम आणि विश्वास माझ्यासाठी प्रेरणा आहे. जेव्हा मी निराश असते, तेव्हा याच ऊर्जेच्या बळावर पुढे जाते. तुमच्या मनासारखं काम तुम्ही करू शकणं आणि ती हिंमत, निर्णयक्षमता तुमच्या ठायी येणं या दृष्टिकोनातून मी त्याकडे पाहते. ० ज्या भूमिकांनी तुला बॉक्स ऑफिसचा हुकमी एक्का हे स्थान मिळवून दिलं, त्या भूमिका इतरांवर प्रभाव टाकतील ही जाणीव भूमिका साकारताना येते का?- चित्रपट करताना हे लक्षात येत नाही. मात्र या भूमिकांमधून कुणाला प्रेरणा मिळत असेल याची जाणीवच मला थक्क करते. तुझ्या भूमिकेनं दिलेली प्रेरणा घेऊन मी जगतेय, असं जेव्हा मुली-महिला मला सांगतात तेव्हा मनोमन समाधान मिळतं. मी कुठलाही प्लॅन करून या भूमिका साकारत नाही. त्या नैसर्गिकपणे जगणं मला महत्त्वाचं वाटतं. आज ज्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत, त्यांचीच छबी मी पडद्यावर साकारते. ही प्रेरणा समाजातूनच मिळते आणि ती पुन्हा समाजातच जाते, असं मला वाटतं. ० मध्यंतरी तू 'नटखट' या लघुपटाची निर्मिती केलीस. दिग्दर्शिक किंवा निर्माती म्हणून पुढे काही करणार आहेस का?- माझा पती सिद्धार्थ हा निर्माता आहे आणि त्याचं काम पाहिल्यावर निर्मात्याला किती तणावांचा सामना करावा लागतो, हे कळलं. त्यामुळे माझं माझ्या अभिनयावर प्रेम आहे आणि ते करत पुढे जायचं आहे. ० 'हम पाँच' या तुझ्या मालिकेची आजही आठवण काढली जाते. मालिकेच्या सेटवरच्या तुझ्या वावरण्याचं कौतुक ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी केलं होतं. त्या दिवसांबद्दल काय सांगशील?- ते दिवस संघर्षाचा अर्थ सांगून-शिकवून गेले. अशोकजींसारख्या मोठ्या अभिनेत्यानं माझं कौतुक करावं, हा त्यांचा मोठेपणा आहे. माझ्या पालकांनी मला आणि माझ्या बहिणीला कायमच चांगुलपणावर विश्वास ठेवण्याची शिकवण दिली. ० विद्या फक्त चांगलाच चित्रपट करते हा विश्वास तुझ्या कामातून तू निर्माण केलास. अभिनेत्रींचं मानधन असो, महिला सक्षमीकरण असो या मुद्द्यांवरही तू भाष्य करतेस... मागे वळून पाहताना काय वाटतं? - मी इथवर पोहोचेन असं वाटलं नव्हतं. एवढं काही घडलंय, की आता मागे वळून पाहताना त्याचा विचार करायची गरज नाही असं वाटतं. जे योग्य आहे त्यावर भाष्य करून ते बदलण्यासाठी प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. चांगल्या कामाचा आत्मविश्वास भूमिकांनी दिला. ज्या लेखक-दिग्दर्शकांना चांगला चित्रपट करायचाय त्यांनी बिनदिक्कत माझ्याकडे यावं, असं म्हणेन. सध्याच्या नकारात्मक वातावरणात विद्यानं तिच्या चाहत्यांसाठी काही ओळी तिचा संदेश म्हणून दिल्या आहेत. ये वक्त भी गुजर जाएगा... याद रख्खे, पलक झपकनें से पहले ये वक्त गुजर जाएगा... कितनें चीजों से गुजरे है... फिर से सूरज उगेगा.. नयी आशा जगेगी
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2CLn9nk