मुंबई- पाली हिल येथील कार्यालयात बेकायदा बांधकाम केल्यामुळे अभिनेत्री पुढील अडचणी वाढल्या आहेत. महापालिकेने कंगनाला मंगळवारी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना कायद्याअन्वये ३५४ ची नोटीस बजावली होती. यात २४ तासांत कागदपत्र सादर न केल्यास अवैध बांधकाम पाडण्याचा इशारा दिला होता. २४ तास उलटून गेल्यानंतर कंगनाच्या कार्यालयातील बेकायदा बांधकामावर अखेर हातोडा पडला. दरम्यान कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी बीएमसीने बजावलेली नोटीस बेकायदा असल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रिझवान म्हणाले की, 'कंगनाच्या अनुपस्थितीत बीएमसीचे कर्मचारी तिच्या ऑफिसमध्ये घुसले. हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे. याचमुळे आता कंगनाने बीएमसीच्या विरोधात ट्रेसपासिंग आणि जबाबी कारवाईची नोटीस जारी केली आहे. यानुसार बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना तुरुंगात जावं लागू शकतं. द्वारे 'स्टॉप वर्क' अंतर्गत जी नोटीस बंगल्यावर चिकटवण्यात आली ती चुकीची आहे. तिथे कोणत्याही प्रकारचं अवैध्य बांधकाम सुरू नव्हतं.' रिझवान पुढे म्हणाले की, 'तसेच बंगल्यात बदल केल्याचं नोटीसमध्ये म्हटलं आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी कंगनाला सात दिवसांच्या आत उत्तर देण्याची नोटीस दिली पाहिजे होती. पण बीएमसीने फक्त एका दिवसाची नोटीस दिली. या सर्व गोष्टी फक्त कंगनाला त्रास देण्यासाठीच केल्या जात आहेत.' कंगनाने शिवसेनेशी पंगा घेतल्यानंतर ४८ तासांतच महापालिकेच्या वांद्रे पश्चिम येथील एच-पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभागाच्या पथकाने सोमवारी तिच्या बंगल्याची पाहणी केली. त्यात काही बांधकाम सुरू असल्याचं आढळलं. त्यानंतर पालिकेने मंगळवारी प्रशासकीय परवानगीची कागदपत्रं सादर करण्याची नोटीस पाठवली. पालिकेचे कर्मचारी नोटीस बजावण्यासाठी गेले असता तिथे हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी ती स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे पालिकेने कार्यालयावर नोटीस चिकटवली. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर त्यात काही त्रुटी आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. असे एच-पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी सांगितलं होतं. अखेर आज तिच्या बंगल्यावर बीएमसीचा हातोडा चालला. बंगल्यावर चिकटवलेल्या नोटिशीत स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, हा बंगला निवासी असल्यानं त्यात कार्यालय सुरू करण्यासाठी रीतसर परवानगी घेणं गरजेचं होतं. पालिका अधिनियम ३५४ (अ) अंतर्गत कोणत्याही निवासी जागेचा व्यावसायिक वापर करता येत नाही, असेही या नोटिशीत नमूद आहे. बंगल्यामध्ये चटईक्षेत्र नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. तसेच काही ठिकाणी वाढीव बांधकामही करण्यात आलं आहे, तर पूर्वीची दोन बांधकामं जोडण्यात आली आहेत. तसेच अंतर्गत बदलही करण्यात आले आहेत. यात स्वच्छतागृह तोडून त्या जागी कार्यालय बांधण्यात आलं आहे. तसेच परवानगी न घेता नवे स्वच्छतागृह बांधण्यात आलं असल्याचं प्रथमदर्शिनी दिसतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RbSIKo