लॉकडाउन नुकताच जाहीर झाला होता. घरी आम्ही सगळे कसंबसं ह्या न्यू नॉर्मलला सरावू लागलो होतो. घरचं सामान आणताना हातात सॅनिटायझर घेऊनच बाहेर पडत होतो. मास्क लावून फिरताना देखील मास्कच्या बाहेरच्या बाजूला हात न लावता जपून मास्क काढायचो आणी घालायचो. सोशल डिस्टन्सिंग तर हमखास पाळायचो. अशा परिस्थितीत आणी अशा वातावरणात माझे ९४ वर्षांचे आजोबा अचानक आजारी पडले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करावं लागलं. काही प्राथमिक चाचण्या केल्यावर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं, की त्यांना किमान दोन दिवस रुग्णालयात निरीक्षणाखाली राहावं लागणार आहे. अर्थातच मी त्यांच्या सोबत राहायचं ठरवलं. एरवी आजोबांकडे बघून कुणाला वाटणारही नाही, की ते ९४ वर्षांचे आहेत. पण, त्या आजारपणात त्यांची तब्येत फारच खालावली होती. (सर्व फोटो- आदिनाथ कोठारे इन्स्टाग्राम)
लॉकडाउन नुकताच जाहीर झाला होता. घरी आम्ही सगळे कसंबसं ह्या न्यू नॉर्मलला सरावू लागलो होतो. घरचं सामान आणताना हातात सॅनिटायझर घेऊनच बाहेर पडत होतो. मास्क लावून फिरताना देखील मास्कच्या बाहेरच्या बाजूला हात न लावता जपून मास्क काढायचो आणी घालायचो. सोशल डिस्टन्सिंग तर हमखास पाळायचो. अशा परिस्थितीत आणी अशा वातावरणात माझे ९४ वर्षांचे आजोबा अचानक आजारी पडले. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करावं लागलं. काही प्राथमिक चाचण्या केल्यावर डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं, की त्यांना किमान दोन दिवस रुग्णालयात निरीक्षणाखाली राहावं लागणार आहे. अर्थातच मी त्यांच्या सोबत राहायचं ठरवलं. एरवी आजोबांकडे बघून कुणाला वाटणारही नाही, की ते ९४ वर्षांचे आहेत. पण, त्या आजारपणात त्यांची तब्येत फारच खालावली होती. (सर्व फोटो- आदिनाथ कोठारे इन्स्टाग्राम)
त्यांच्या हातांची पकड आजही जाणवते
मला त्यांना अधूनमधून आठवण करून द्यायला लागायची, की ते घरी नाही हॅास्पिटलमध्ये आहेत. ह्या वयात जरा मनाविरूद्ध झालं की माणसाची चिडचिड होते. तशीच त्यांचीदेखील होत असते. पण इथे त्यांच्या चिडचिडीचा रोख माझ्याकडे होता. कारण मी त्यांना या रुग्णालयाच्या खोलीत डांबून ठेवलं आहे असं त्यांना कदाचित वाटत असावं. माझ्या हाताचा पंजा अगदी माझ्या आजोबांसारखा आहे. ओबडधोबड आणी गुबगुबीत. लहान असताना आमच्या घरासमोरचा रस्ता ओलांडताना त्या पंज्यात धरलेल्या माझ्या चिमुकल्या हातांवर त्यांची पकड मला आजही जाणवते.
अन् त्यांनी सलाईनची सुईच काढून टाकली
आज ती पकड माझी त्यांच्या हातांवर होती. पण ती त्यांना ह्या परिस्थितीत कदाचित जाणवत नसावी. रात्री आजोबांना झोपच येत नव्हती. त्यांना झोपताना गैरसोय होत असावी, म्हणून माझं लक्ष नसताना त्यांनी दोनदा सलाईनची सुई त्यांच्या हातातून उचकटून काढली. नर्स आणि डॅाक्टरांची पळापळ. माझे वडील जेव्हा लहान होते तेव्हा ते वरळी नाक्यावर राहत. त्या काळात तो फार बरा परिसर नव्हता. बरेच टवाळखोर लोक तिथे आजुबाजूला असायचे. एक दिवस एक गाडी त्या परिसरातल्या एका सिग्नलवर थांबली. माझे तरूण तडफदार आजोबा गाडी चालवत होते, माझी देखणी आजी त्यांच्या बाजूला होती.
मवाल्यांना आजोबांनी घडवली अद्दल
तेव्हा माझे शाळेतल्या वयाचे वडील मागच्या सीटवर मस्ती करत होते. इतक्यात सिग्नलच्या शेजारी कट्ट्यावर बसलेल्या तीन मवाल्यांपैकी एकानं माझ्या आजीकडे पाहून एक चावट कमेंट केली. रस्त्यावरच्या मवाल्यांच्या तोंडी न लागण हा पांढरपेश्यांचा पहिला नियम. पण, माझे आजोबा शांतपणे गाडीतून उतरले, रस्ता ओलांडून त्या तीन मवाल्यांकडे गेले. तिघांच्या श्रीमुखात भडकावून पुन्हा शांतपणे गाडीत येऊन बसले. गाडी स्टार्ट केली आणी सिग्नल हिरवा होईपर्यंत वाट बघत थांबले.
लहानपणी भोगले अतोनात कष्ट
गैरसोयीमुळे सलाईनची सुई उचकटून काढण्यात कदाचित त्यांचा तो डेअरिंगबाज स्वभाव कुठेतरी डोकावत असावा. तरूणपणीचे आजोबा आम्हाला असे अधूनमधून झलक देत असतात. त्यांचा हा काटक आणी धीट स्वभाव अर्थात त्यांच्या स्वानुभावातून आला असावा. आजोबांचे वडिल त्या काळात मोठे इंजिनीअर होते. ठाकूरद्वारला त्यांचं मोठं घर होतं. आजोबा तीन-चार वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचं निधन झाले. त्यानंतर आजोबांच्या आईची कोऱ्या कागदावर सही घेऊन तिच्या दिरांनी तिला फसवलं आणि माझ्या आजोबांची आई तिच्या आठ मुलांना घेऊन अक्षरक्ष: रस्त्यावर आली. माझे आजोबा त्यांच्या आई आणि सात भावंडांबरोबर एका छोट्याश्या खोलीत त्यांच्या मोठ्या बहिणीच्या कुटुंबासोबत वाढले.
नव्वद वर्षांमध्ये अनेक प्रसंग त्यांनी पाहिले
मॅट्रिकला डिस्टिंक्शन मिळवूनही त्यांना त्यांच्या धाकट्या भावाला शिकवण्यासाठी स्वत:चं शिक्षण सोडून कोर्टात बेलीफची नोकरी पत्करावी लागली. पुढे जाऊन आजोबा ब्रिटिश बँक ॲाफ मिडल ईस्ट, म्हणजेच आजची एचएसबीसीमध्ये क्लार्क म्हणून लागले. माझ्या वडिलांनी जेव्हा 'धूमधडाका' बनवायचा ठरवला, तेव्हा त्यांना पाठिंबा देण्यासाठी मॅनेजर पदापर्यंत पोचलेल्या आजोबांनी व्हीआरएस घेतली. ठाकूरद्वार ते ठाकूर व्हिलेज हा प्रेरणादायी प्रवास ह्या माणसानं नव्वद वर्षांत साधला.
आयुष्य कसं जगावं हे त्यांनी शिकवलं
तिसऱ्या दिवशी आजोबा खडखडीत बरे झाले. सकाळी माझे वडील जेव्हा आम्हाला घरी न्यायला आले, तेव्हा त्यांचा चेहरा एखाद्या लहान मुलासारखा खुलला. घरात पाऊल ठेवल्या-ठेवल्या सगळ्यात आधी आजोबा त्यांच्या सोफ्यावर जाऊन बसले. नेहमीप्रमाणे टीव्ही ॲान करून, जी कुठली क्रिकेट मॅच सुरू होती ती बघू लागले. जणू काही झालंच नव्हतं. आयुष्य कसं जगावं ह्याचे धडे आम्ही सगळे नकळतपणे आजोबांकडून घेत असतो. त्याच दिवशी पहाटे रुग्णालयात आजोबांच्या बेडच्या बाजूला सोफ्यावर झोपलेलो असताना मला अचानक जाग आली.
जुन्या गोष्टी आठवल्या की वाईट वाटतं
मला आजोबांची हाक ऐकू आली होती. लहानपणी परीक्षेच्या वेळी मी पहाटेचा गजर लावून झोपायचो. माझा गजर ऐकून मी सोडून घरातली सगळी माणसं उठायची. तो गजर बंद करून मला उठवायला यायचे ते माझे आजोबाच. "बोबी ऊठ!" अशी मला ते लाडानं हाक मारायचे. मी झोपमोड झाली म्हणून त्या लहान वयात त्यांच्यावर चिडायचो आणि पाच मिनिटांनी उठणार, असं उद्धटपणे सांगायचो. माझा हा बालीशपणा माझ्यावरील प्रेमापोटी ते खपवून घ्यायचे. आज मला ते आठवलं, की माझी मलाच लाज वाटते.
ते मला लाडानं बोबी बोलतात
हल्ली आजोबा खूप कमी बोलतात. मला त्यांनी शेवटची लाडानं "बोबी" अशी हाक कधी मारली हे आठवतही नाही. त्या पहाटे मी त्यांची हाक ऐकली ती हीच होती "बोबी". मी लगेच उठून त्यांच्या कॅाटजवळ गेलो. पण आजोबा गाढ झोपले होते. मला स्वप्न पडलं होतं. ज्या इच्छा आपण आपल्या मनात दडवून ठेवतो, त्या आपल्या सुप्त मनात जाऊन घर करतात आणी मग कधी कधी स्वप्नात भेटतात. ती स्वप्नं खरी करण्यासाठी आपलं सुप्त मन आपल्याला नकळतपणे त्या दिशेनं ओढत असतं. माझे आजोबा रोज सकाळी वर्तमानपत्र वाचतात. बघू या माझी इच्छा पूर्ण होते का.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3lPG69h