Full Width(True/False)

अभिजीत राजे आणि तुमच्यात काय साम्य आहे? गिरीश ओक म्हणतात...

संपदा जोशी ० बऱ्याच वर्षांनी मालिकेत नायकाची भूमिका साकारताना कसं वाटतंय ?- मालिकेत मुख्य नायक म्हणूनच मी पुढेही दिसणार आहे. मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असं होतंय की मालिकेचं नाव, कथा आणि काही पात्र बदलणार आहेत. या प्रयोगाचा मी साक्षीदार असल्यानं मला छान वाटतंय. ० मालिकेचा ट्रॅक बदलतोय. त्याबद्दल काय सांगाल ?- बायको नोकरी किंवा व्यवसाय करते आणि नवरा घर सांभाळतोय, ही कथेची संकल्पना आहे. आपण मुलींना मुलांसारखं वागायला शिकवलं पण मुलांना मुलींसारखं वागायला शिकवलं नाही. मालिकेच्या कथेप्रमाणे प्रत्यक्षातही मी अशी जोडपी पाहिली आहेत ज्यात बायको नोकरी करते आणि नवरा घर सांभाळतो. एक वेगळा दृष्टिकोन प्रेक्षकांना यातून मिळणार आहे. ० पात्रात आणि तुमच्यात काय साम्य आहे ?- बाइक चालवण्याची आवड, गाण्यांची आवड, महिलावर्गाविषयी आणि त्यांच्या कामाविषयी वाटणारा आदर, समोरच्या माणसावर प्रेम करणं हे आमच्यातलं साम्य आहे. अभिजीत राजे हे पात्र सगळ्यांचं लाडकं आहे. तसंच खऱ्या आयुष्यातही माझा कोणीच शत्रू नाही. सगळ्यांना आवडणारा, तुलना न करणारा, कोणाचा रागराग न करणं ही काही साम्य आहेत. ० महिलावर्गाकडून तुम्हाला काय प्रतिक्रिया मिळतात ?- सोशल मीडियावर किंवा बाहेर प्रत्यक्ष भेटलेल्यांची प्रतिक्रिया एकच असते, 'तुम्ही घरीही असंच वागता का?', 'स्वयंपाक करता का?'. आपण साकारत असलेल्या व्यक्तिरेखेचं काम प्रेक्षकांना आवडतंय, हे अशा प्रतिक्रियांमधून समजतं. समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी मालिका कारणीभूत ठरली, याचा आनंद आहे. ० खऱ्या आयुष्यात सुद्धा जेवण बनवता का?- हो. अगदी आवडीने करतो. मी स्वयंपाकात तज्ज्ञ वगैरे नाही पण मला येतं आणि करायला आवडतंही. मला स्वयंपाकाचं चित्रकलेशी खूप साधर्म्य वाटतं. चित्रकलेत जसं तुम्ही काहीतरी तयार करत असता तसंच स्वयंपाकाचंही असतं. माझा वेगवेगवेगळे प्रयोग करण्याकडे कल असतो. ० तुम्ही डॉक्टरही आहात. त्याचा या क्षेत्रात कसा उपयोग होतो ?- डॉक्टर असण्याचा स्वतःसाठी तर नक्कीच उपयोग होतो. स्वतःला काय होतंय, हे तर मी सांगू शकतो. शिवाय आजूबाजूच्या लोकांना तंदुरुस्त राहण्यासाठी, कोणताही आजार न होण्यासाठी काय करता येईल याविषयी मी त्यांना माहिती देतो. तसंच कोणत्या आजारासाठी कोणत्या डॉक्टरकडे जा याबाबत सल्ला देतो. ० पुन्हा नाटकात कधी दिसणार?- बाहेरचं वातावरण थोडं आटोक्यात आलं की नाटकात दिसणार. मध्यंतरी मी एका नाटकाचं वाचन केलं आहे. मालिकेला वेळ द्यायचा होता म्हणून मी तेव्हा ते नाटक केलं नव्हतं. पण आता नाटकाशिवाय स्वस्थ बसवत नाहीय. बाहेरचं वातावरण अनुकूल झालं की नाटक करणार हे मात्र नक्की. मीसुद्धा माझ्याच नाटकाची वाट पाहतोय. माझं येणारं नाटक हे ५० वं व्यावसायिक नाटक असणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eIY3G5