संपदा जोशी करोनाचा विळखा दिवसेंदिवस अधिक घट्ट होत चाललाय. कडक निर्बंध आणि वीकेंड लॉकडाउन सुरू असताना मनोरंनसृष्टी मात्र सक्रिय आहे. त्यातही विशेषत: मालिकांचं चित्रीकरण सरकारचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून नियमितपणे सुरू आहे. पण या माध्यमात काम करणाऱ्या काही कलाकारांच्या घरी वयस्कर व्यक्ती तर काहींच्या घरी लहान मुलं आहे. त्यामुळे करोनापासून बचाव करण्यासाठी ही कलाकार मंडळी सेटवर आणि घरीसुद्धा विशेष काळजी घेताना दिसत आहेत. लोकप्रिय मालिकांचा निर्माता सध्या व्यग्र आहे. मालिकांचं चित्रीकरण, कलाकार-तंत्रज्ञांची काळजी, सेटवर सोयीसुविधा या सगळ्या गोष्टींकडे तो सध्या विशेष लक्ष देतोय. कामाच्या निमित्तानं त्याला प्रवास करावा लागतो. 'करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सरकारनं घालून दिलेले सगळे नियम सर्वांनी पाळले पाहिजे. मास्क लावूनच बाहेर पडलं पाहिजे. या मास्कनं आपला अर्धा ताण कमी होतो. माझ्या घरी माझे आजी-आजोबा आणि मुलगी जीजासुद्धा आहे. त्यामुळे निश्चितच मी स्वतःची आणि घरच्यांची खूप काळजी घेतोय', असं आदिनाथनं सांगितलं. इतर बऱ्याच क्षेत्रांचं काम ऑनलाइन सुरू असलं तरी कलाकारांना चित्रीकरणासाठी सेटवर जाणं गरजेचं आहे. सेटवर सर्वोतोपरी काळजी घेतली जात असली तरी सेटवर अनेकांचा वावर असतो. सुरक्षित वावराचे सगळे नियम पाळले जात असले तरी थोडा फार ताण असतोच, असं काही कलाकार सांगतात. अभिनेत्री माधवी निमकरनं याबद्दल सांगितलं, 'आमच्या सेटवर नियमितपणे निर्जंतुकीकरण केलं जातं. वारंवार हात धुणं, एकमेकांपासून अंतर ठेवणं, सीन शूट झाल्यावर मास्क लावणं या गोष्टी कटाक्षानं पाळल्या जातात. मी घरी गेल्यावर स्वच्छ अंघोळ करून, माझ्या गोष्टींचं निर्जंतुकीकरण करून त्यानंतरच मुलाला जवळ घेते. मी उगाचच कुठेही फिरत नाही. सेटवरून थेट घरी आणि घरून सेटवर एवढाच प्रवास मी रोज करते.' अभिनेत्री नम्रता आवटे संभेरावच्या घरी तिचा लहान मुलगा आणि सासू असे दोघेही आहेत. त्याबाबत तिनं सांगितलं, 'मी स्वतः नुकतीच करोनातून बरी झाली आहे. मला बरं नसताना मी मुलाला आणि सासूबाईंना गावाला पाठवलं होतं. मागच्या वर्षी जितक्या काटेकोरपणे आपण नियम पाळले, काळजी घेतली त्या सगळ्याची उजळणी करण्याची आता गरज आहे. मास्क लावणं, सतत हात धुणं, सामाजिक अंतर पाळणं हे सगळं मी करते आहे.' करोनामुळे लहानग्यांनाही आता मास्क, हात सतत धुण्याबाबतचं महत्त्व कळू लागलंय. त्यामुळे कलाकारांसोबत त्यांची मुलंही परिस्थिती समजुतीने हाताळत असल्याचं काही कलाकारांनी सांगितलं. 'मी महिन्यातून बारा दिवस चित्रीकरण करते. कारण मला माझ्या मुलालाही वेळ द्यायचा असतो. सध्या भीती निश्चितच वाढली आहे. मास्क, सॅनिटायझर हे जवळ असतंच. तसंच डॉक्टरांच्या सल्यानं मी व्हिटॅमिन्स घेतेय. सेटवरही सुरक्षित अंतर ठेवते. सेटवर स्वतःचा डबा, पाण्याची बाटली, ताट, पेला असं आपापलं नेणं आता गरजेचं आहे', असं अभिनेत्री अदिती सारंगधरनं सांगितलं. तर अभिनेता प्रसाद खांडेकर याविषयी म्हणाला, 'मी सेटवर नेत असलेली बॅग घरात वेगळीच ठेवतो. चित्रीकरणावरून घरी आल्यावर आंघोळ करतो आणि वस्तू सॅनिटाइज करतो. सेटवर कलाकारांना वेगळ्या मेकअप रूम दिल्या आहेत. तसंच जेवण घरचंच नेतो.' करोनाच्या या संकटात लहान मुलं आणि वयस्कर मंडळींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. कामासाठी बाहेर पडलेले कलाकार अशा प्रकारची दुहेरी जबाबदारी पार पाडत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3252xj5