मुंबई- प्रत्येक कलाकाराचा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर दृढ विश्वास असतो. अनेकजण देवावर विश्वास ठेवतात तर काहींचा अंक किंवा तारीख यावर अधिक विश्वास असतो. बॉलिवूडच्या ड्रीम गर्ल देखील अशाच श्रद्धाळू आहेत. हेमाजींनी ७० आणि ८० च्या दशकात बॉलिवूडवर अधिराज्य केलं. त्यांच्या अभिनयाची चर्चा प्रत्येकाच्या तोंडी होती. अनेक दिग्दर्शक आणि निर्माते त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्सुक असत. त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केलं. कधी मानधन कमी घेतलं तर कधी जास्त. पण हेमाजींनी एका चित्रपटाचं मानधन आजवर जपून ठेवलं आहे. त्याचं झालं असं की, १९७९ मध्ये एका चित्रपटाचं चित्रीकरण संपवून हेमाजी त्यांच्या घरी परतल्या. तर प्रसिद्ध निर्माते प्रेम त्यांची वाट पाहत त्यांच्या घरी बसले होते. ते अनेक वर्षांपासून हेमाजींसोबत चित्रपट बनविण्याच्या प्रयत्नात होते. परंतु, हेमाजींना त्यांच्या चित्रपटाची कथा आवडत नसे. यावेळेसही तेच झालं. यावर हेमा त्यांचं मन राखण्यासाठी म्हणाल्या, जर तुम्ही '' वर एखादा चित्रपट बनवाल तर मी त्यात नक्की अभिनय करेन.' हे ऐकून प्रेमजी तडक गुलजार यांच्याकडे गेले. त्यांनी त्यांना 'मीरा' वर कथा लिहिण्यास सांगितली. ती कथा घेऊन ते पुन्हा हेमाजींकडे आले. आता त्यांना नकार देण्याचा प्रश्नच येत नव्हता. 'मीरा' चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं. मात्र, चित्रपटाचं बजेट जास्त झाल्याने चित्रीकरण मध्येच थांबवावं लागलं. ही गोष्ट जेव्हा हेमाजींना समजली तेव्हा त्यांनी प्रेम यांना बोलावणं पाठवलं. त्या त्यांना म्हणाल्या, 'हा चित्रपट मी पैशांसाठी नाही तर कृष्णावरील माझ्या भक्तीसाठी करतेय. तुम्ही जे काही मानधन द्याल ते मी ठेवून घेईन.' त्यानंतर प्रेम यांनी ठरवलं की ते हेमाजींना दिवसांच्या हिशोबाने पैसे देणार. त्या चित्रपटासाठी हेमा यांना जेवढे पैसे मिळाले त्यांनी ते पैसे अजूनही जपून ठेवले आहेत. त्या पैशांचे लिफाफे अजूनही त्यांच्याकडे आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, 'हा कृष्णाचा प्रसाद आहे आणि तो मी कायम माझ्याकडे ठेवणार.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dPkGH2