Full Width(True/False)

तशा भूमिकांसाठी विचारणा झाल्यास अभिनेत्री म्हणून मी नक्कीच त्यांचा विचार करीन: अनिता दाते

नाटक या माध्यमावर प्रेम करणाऱ्या नं मालिका आणि चित्रपटांतल्या भूमिकांमध्येही लक्षात राहील असा पल्ला गाठला. ‘सनई चौघडे’ या २००८ मध्ये आलेल्या चित्रपटापासून ‘जोर लगाके हैय्या’, ‘जोगवा’, ‘गंध’, ‘अडगुळं मडगुळं’, ‘पोपट’, ‘आजोबा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, हिंदीतला ‘अय्या’ आणि अलीकडचा ‘तुंबाड’ या बहुभाषिक चित्रपटातल्या तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. टीव्हीवर ‘अग्नीहोत्र’, ‘मंथन’, ‘बंदिनी’, ‘भाई, भय्या और ब्रदर’, ‘बालवीर’, ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा मराठी-हिंदी मालिका तिनं केल्या. ‘राधिका’ या छोट्या पडद्यावरच्या भूमिकेनं तिला आणखी लोकप्रियता मिळवून दिली. सर्वसामान्य रसिकांना आपलीशी वाटणं, गृहिणींनी या भूमिकेत आपलं सुख-दुःख दिसणं आणि अनेकींशी या निमित्तानं घडणारा संवाद अनिताला महत्त्वाचा वाटतो. ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातही ती छान रमली आहे. या निमित्तानं झालेल्या गप्पा. नव्या भूमिकेत ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाच्या सेटवर ‘राधिका’तून बाहेर पडण्याची संधी मिळाली का, असं विचारताच अनिता म्हणाली, ‘या भूमिकेनं खूप काही दिलं. अनेकींचा संघर्ष तिच्यातून व्यक्त झाला. या निमित्तानं अनेकांशी संवाद घडला. मालिकेत या भूमिकेच्या वाट्याला विनोद नव्हता. सौमित्रनं केलेले विनोदही न कळणारी, फारशी विनोदबुद्धी नसणारी अशी ती दाखवली होती. सेटवर इतरांच्या तुलनेत तसे विनोदी प्रसंग नव्हतेच त्यामुळे आता इथं मनापासून या नव्या भूमिकेचा आनंद घेतला. कलाकार म्हणून एका भूमिकेतून वा पठडीतून बाहेर पडत स्वतःला सतत तपासणं, सुधारणं आणि वैविध्यपूर्ण काम करत राहणं गरजेचं असतं. तेच सध्या अनुभवत आहे.’ वैविध्य जपूनच... ‘तुंबाड’मधल्या भूमिकेनंतर ‘मी वसंतराव’ या आगामी चित्रपटात अनिता दिसणार आहे. चित्रपटांबद्दल ती म्हणाली, ‘दोन चित्रपट तयार आहेत. मी वसंतराव आणि परेश मोकाशी यांचा एक चित्रपट तयार आहे. अय्या या चित्रपटानंतर तुंबाडमध्ये संधी मिळाली. अनेकांनी त्यासाठी ऑडिशन दिली होती. कोकणची पार्श्वभूमी होती. दिसणं, भाषा आणि वावर पूरक असल्यानं माझी निवड झाली असावी. राही बर्वे यांच्यासोबत काम करणं आणि या चित्रपटाची एकूणच प्रक्रिया मला भावली. आगामी चित्रपटांतल्या भूमिकाही रसिकांना आवडतील अशी खात्री आहे. आपण जसे दिसतो, बोलतो किंवा शोभतो त्या अनुषंगानं भूमिकांसाठी विचारणा होते. अभिनेत्री म्हणून तशा भूमिकांसाठी विचारणा झाल्यास व्यावसायिक अभिनेत्री म्हणून मी नक्कीच त्यांचा विचार करीन, अर्थात त्यातलं वैविध्य जपणं हे कलाकार म्हणून माझं काम आहे. अभिनेत्री म्हणून करिअर करताना हे वैविध्य आणि भूमिकांमधलं समाजभान जपण्याचा विचार करणंही मला आवश्यक वाटतं. ’ नाटकाचं प्रशिक्षण घेतलं आणि खूप वर्षं नाटक केलं. ते मिस करतेय किंवा लवकरच नाटकात दिसेन या बोलण्याला सध्या तरी अर्थ नाही. परिस्थिती पूर्ववत होऊन निर्माते पुन्हा उभे राहतील त्यानंतरच हे शक्य असल्याची जाणीव आहे. तोपर्यंत आहे ती परिस्थिती स्वीकारणं गरजेचं आहे. - अनिता दाते


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/34mCm8t