मुंबई : ख्यातनाम अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार गरोदर असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर तिने पती निखिल जैन शी फारकत घेतल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या. अनेकांना दोघांमध्ये नक्की काय बिनसलं हे कळलंच नाही. यासंदर्भात नुसरतने एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्या निवेदनामध्ये तिने निखिलसोबतच्या लग्नाबद्दल अनेक खुलासे केले आहेत. नुसरतने पती निखिलवर तिच्या परवानगीशिवाय बँक खात्यातून पैसे, दागिने काढल्याचा आरोपही केला आहे. नुसरतने प्रसिद्ध केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, 'जी व्यक्ती स्वतःला श्रीमंत असल्याचे सांगते आणि मिरवते तिच व्यक्ती म्हणते की मी त्याचा वापर केला. हीच व्यक्ती रात्री- बेरात्री माझ्या परवानगीशिवाय माझ्याच बँक खात्यामधून पैसे काढते. आम्ही वेगळे झाल्यानंतरही हे तो करत होता. मी बँकेच्या अधिकाऱ्यांना यासदंर्भात सांगितलेदेखील होते आणि लवकरच याबाबत मी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणार आहे.' न विचारता बँक खात्यातून पैसे काढले नुसरतने तिच्या निवेदनात म्हटले आहे की, 'त्याने आग्रह केला म्हणून माझ्या आणि कुटुंबातील इतर सदस्यांच्या बँक खात्यांची सर्व माहिती त्याला दिली. त्यानंतर आमच्या खात्यामधून परवानगीशिवाय वेगवेगळ्या खात्यांमधील रक्कमांचा गैरवापर करण्यात आला. याची माहिती आम्हाला बँकांनीही दिली नाही. यासंदर्भात बँकांसोबत माझे बोलणे सुरू आहे. गरज भासल्यास मी आवश्यक ते सर्व पुरावे सादर करीन.' वडिलोपार्जित दागिने त्याच्याजवळ नुसरतने या निवेदनात पुढे म्हटले की, 'आजही माझे कपडे, बॅग, दागिने त्याच्याकडे आहेत. मला सांगतानाही अतिशय दुःख होत आहे, आमचे परंपरागत दागिने माझ्या कुटुंबाने मला दिले होते. तसेच काही दागिने माझ्या मित्रांनी, नातेवाईकांनी दिले होते तसेच मी स्वतः केलेले दागिने आणि पैसे आजही त्याच्याजवळ आहेत.' 'श्रीमंत असणे म्हणजे तुम्ही कुणालाही त्रास देऊ शकता असा त्याचा अर्थ होत नाही. कठोर मेहनतीने मी स्वतःची ओळख, प्रतिष्ठा मिळवली आहे. त्यामुळेच माझ्याशी संबंधित असलेल्या कुणाही व्यक्तीला माझ्या ओळखीचा, माझ्या प्रतिष्ठेचा वापर करण्याचा अधिकार मी दिलेला नाही,' असेही तिने निवेदनात म्हटले. तुर्कीत केलेले आमचे लग्न भारतात अवैधच याच निवेदनामध्ये नुसरतने निखिल जैनशी झालेले लग्न अमान्य असल्याचे म्हटले आहे. याबाबत स्पष्टीकरण देताना तिने सांगितले की, 'आमचे लग्न तुर्की कायद्यानुसार झाले. हे लग्न भारतामध्ये मान्य नाही. भारतामध्ये अशा लग्नासाठी स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गंत इंटरफेथ मॅरेज (दोन वेगळ्या धर्मांतील व्यक्तींमध्ये झालेले लग्न) आहे. त्या अंतर्गंत आमचे लग्न झालेले नसल्याने भारतामध्ये आमचे लग्न अवैधच आहे.' निवेदनाच्या शेवटी नुसरतने लिहिले की, 'आम्ही दोघेजण खूप आधी विभक्त झालो आहोत. परंतु मला आता त्याच्यावर काहीही बोलायचे नाही. कारण माझे खासगी आयुष्य स्वतःपुरतेच मर्यादित ठेवायचे आहे. आमचे लग्न कायदेशीररित्या वैध नाही. येथील कायद्याच्यादृष्टीने आमचे लग्न झालेलेच नाही.' दोन वर्षांत झाले वेगळे दरम्यान, लग्नाआधीच नुसरतने राजकारणात प्रवेश केला होता. निवडणूक जिंकल्यानंतर नुसरतने तिचा बॉयफ्रेंड आणि उद्योगपती निखिल जैन सोबत २०१९ तुर्कीमध्ये जाऊन लग्न केले होते. या दोघांचे लग्न अतिशय दिमाखदार आणि शाही पद्धतीने झाले. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाले होते. लग्नाच्यावेळी सात जन्म एकत्र राहण्याचे वचन या दोघांनी एकमेकांना दिले होते, परंतु दोन वर्षांमध्येच त्यांचे नाते संपुष्टात आले. निखिल आणि नुसरतमध्ये सतत वाद होत असल्याने हे दोघेजण सहा महिन्यांपासून वेगळे रहात आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2TeB5OG