० गेल्या लॉकडाउनच्या काळात सर्वसामान्यांची आर्थिक गणित बिघडली आहेत. या पार्श्वभूमीवर '' हा कार्यक्रम काय बदल आणतोय?- लॉकडाउनमुळे निर्माण झालेली परिस्थिती सर्व जाणतातच. त्या वेदनादायी परिस्थितीत बुद्धिमत्ता असलेल्या सर्वसामान्यांना या कार्यक्रमातून आधार मिळतोय. कार्यक्रमात आम्ही 'ज्ञानाची साथ' असं म्हणतोय; ते केवळ पुस्तकी ज्ञान हवं असं नाही. कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी अनेकांनी छोटे-मोठे व्यवसाय सुरु केले. विद्यार्थ्यांनी घरी राहूनही नव्या शिक्षणाच्या संधी शोधल्या. या सगळ्यामुळे आलेली परिपक्वता 'कोण होणार करोडपती'मध्ये स्पर्धकांना यश मिळवून देतेय. कार्यक्रमात येणाऱ्या स्पर्धकांच्या जीवनातील अनुभव समजून घेणं ही माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी श्रीमंत करणारी गोष्ट आहे. ० 'रिअॅलिटी शो' जाणीवपूर्वक स्क्रिप्टेड केले जतात; अशी टीका वारंवार होत असते. याबाबत तुमचं मत काय?- प्रेक्षक सुज्ञ आहेत. कार्यक्रमात एखादा प्रसंग मुद्दाम आणला गेलाय; हे ते अचूकपणे पकडतात. माझ्यासमोर बसलेला एखादा स्पर्धक काही कारणास्तव भावुक होतो; तेव्हा त्या स्पर्धकानं त्याच्या भावनांना आवर घालून आधी खेळावं असं मला वाटतं. माझ्या मते हा 'रिअॅलिटी शो' नसून 'खेळ' आहे. ही एक स्पर्धा आहे. लेखक मला सूत्रसंचालनाची वाक्य लिहून देतो. बाकी स्पर्धक आणि माझ्यात जे संभाषण होतं ते गप्पांमधूनच होत असतं. त्यासाठी कोणतीही संहिता नसते. रिअॅलिटी शोमध्ये भावभावनांची पिळवणूक नक्कीच होता काम नये. ० तीन दशकांहून अधिक काळ तुम्ही मनोरंजनसृष्टीत वावरत आहात; स्वतःला अपडेट कसं ठेवता?- प्रेक्षकांनुसार आपणसुद्धा बदलायला हवं. नव्वद साली मी काम सुरू केलं तेव्हा कलाकारांकडून प्रेक्षकांच्या असणाऱ्या आपेक्षा आणि आताच्या प्रेक्षकांच्या अपेक्षा वेगवेगळ्या आहेत. त्यांच्या आवडी-निवडी बदलल्या आहेत. मनोरंजनाची जागतिक दालनं खुली झाली आहेत. त्यामुळे नव्या लोकांबरोबर, तरुणांबरोबर काम करणं हा माझा आग्रह असतो. तरूण पिढीची नवी दृष्टी समजून घेण्याचा मी प्रयत्न करतोय. यापूर्वी मी अनेक ज्येष्ठ आणि अनुभवी दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे. पण मला स्वतःला नव्या उजेडात पाहायचं असेल; तर नव्या दिग्दर्शकाने माझ्याकडे त्याच्या दृष्टीनं बघायला हवं, जेणेकरून प्रेक्षकांना मी नवा दिसेन. म्हणूनच मी मराठीसह हिंदी, दाक्षिणात्य सिनेमे करत असतो. या सगळ्यामागे माझा एकच स्वार्थ असतो; तो म्हणजे 'नवा प्रेक्षक मिळावा'. ० करोनामुळे चित्रीकरणाची गणितं बदलली आहेत; हा अनुभव कसा आहे?- टीव्ही माध्यम परिस्थितीवर मात करत नवनवे प्रयोग करत आहे. चित्रीकरणावेळी एखाद्या स्पर्धकाला मला धीर द्यायचा असेल, त्याला मिठी मारायची असेल, कौतुकाची थाप द्यायची असेल; तर ते मी आज करु शकत नाहीय. सेटवर वावरताना अनावश्यक ठिकाणी फिरत येत नाही. तिथल्या वस्तूंना हात लावता येत नाही. एका पिंजऱ्यात अडकल्याची भावना असते. पण, हे सर्व करणं, करोनाप्रतिबंधात्मक उपाययोजना, नियम पाळणं अत्यंत गरजेचं आहे. हा अनुभव नवा आणि कायमस्वरुपी स्मरणात राहणारा असा आहे. ० मराठी सिनेमांना ओटीटीवर (ओव्हर द टॉप) जितकं स्थान मिळायला हवं; तितकं मिळत नाहीय; असं का?- 'स्थान मिळत नाहीय' असं थेट म्हणता येणार नाही. संख्यात्मकदृष्ट्या इतर भाषांच्या तुलनेत ओटीटीवरील मराठी सिनेमे कमी आहेत. पण, हळूहळू त्याचा आलेख नक्कीच उंचावेल. अलीकडे 'डिसायपल', 'दिठी', 'जून'सारखे दर्जेदार सिनेमे ओटीटीवर आले. प्रेक्षकांना खरंच असे दर्जेदार मराठी सिनेमे ओटीटीवर पाहायचे असतील तर नक्कीच मराठी सिनेमे मोठ्या संख्येने त्यावर प्रदर्शित होतील.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3jerC2V