मुंबई : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता याचे गुरुवारी निधन झाले. त्यानंतर त्याचे कूपर रुग्णालयात पोस्टमार्टम झाले. शुक्रवारी दुपारी सिद्धार्थवर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शुक्ला कुटुंबातील सदस्य, सिद्धार्थचे मित्र मैत्रिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिद्धार्थच्या अचानक जाण्याचा मोठा धक्का त्याच्या आईला आणि दोन्ही बहिणींना बसला आहे. सिद्धार्थची आई रीता शुक्ला आपल्या मुलाला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होती. आपल्या भावना, आपले दुःख जगजाहीर होऊ नये यासाठी सिद्धार्थच्या आईने त्यांचा चेहरा ओढणीने पूर्णपणे झाकला होता. सिद्धार्थची आई त्याच्या बहिणीसोबत तिथे आली होती. आपल्या लाडक्या अभिनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी सिद्धार्थचे चाहते मोठ्या संख्येने ओशिवरा येथे जमा झाले होते. त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना त्यांना आवरताना मोठी कसरत करावी लागत होती. सिद्धार्थला गुरुवारी कूपर इस्पितळात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याची तपासणी केली असता डॉक्टरांनी त्याचे निधन झाल्याचे सांगितले. त्यानंतर सिद्धार्थचे पोस्टमार्टम करण्यात आले. रात्री उशीरा पोस्टमार्टम पूर्ण झाले. सिद्धार्थचे पार्थीव त्याच्या कुटुंबियांना शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता देण्यात आले. त्यानंतर पार्थिव घरी नेण्यात आले. काही काळ तिथे ठेवल्यानंतर सिद्धार्थचा अखेरचा प्रवास सुरू झाला. सिद्धार्थचे पार्थिव ओशिवरा स्मशानभूमीत नेण्यात आले. तिथे प्रजापिता ब्रह्मकुमारी समाजाच्या रीती-रिवाजानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धार्थ आणि त्याचे कुटुंबिय ब्रह्मकुमार समाजाशी निगडीत होते. सिद्धार्थ आईच्या खूप जवळ होता सिद्धार्थच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर सिद्धार्थ आणि त्याचा दोन्ही बहिणींना त्याच्या आईनेच मोठे केले. सिद्धार्थ त्याच्या आईशी खूपच जवळ होता. प्रत्येक गोष्ट तो आईशी शेअर करायचा. सिद्धार्थने जेव्हा मॉडेलिंग करण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या आई पाठिंबा दिला. सिद्धार्थ आपल्या आईची खूप काळजी घ्यायचा. तिला कोणताही त्रास होऊ नये यासाठी तो खूपच सजग असायचा. सिद्धार्थही त्याच्या आईच्या जगण्याचा आधार होता. परंतु त्या माऊलीचा हाच आधार आज हरपला आहे...


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3yDKiis