Full Width(True/False)

मराठी मालिकांच्या सेटवर बच्चेकंपनीची घेतली जातेय अशी काळजी, नियम आहेत फारच कडक

वेदांगी काण्णव, मुंबई विद्यापीठ करोनाच्या पहिल्या लाटेनंतर अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आणि अटी शर्तींसह चित्रीकरण सुरु करण्यात आलं. पण त्यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ज्येष्ठ कलाकार आणि बालकलाकारांना चित्रीकरण करण्यास बंदी घालण्यात आली होती. चित्रीकरण सुरू झाल्यानंतर काही महिन्यांनी लस उपलब्ध होत गेली तसं ज्येष्ठ कलाकारांनादेखील चित्रकरणास परवानगी देण्यात आली. पण तोवर मालिकांमध्ये बालकलाकार फारसे दिसत नव्हते. आता मात्र बऱ्याच मालिकांमध्ये बच्चेकंपनी दिसू लागली आहे. या लहान मुलांची सेटवर योग्य ती काळजी घेत चित्रीकरण केलं जात असल्याचं सांगितलं जातंय. बालकलाकारांची सुरक्षा लक्षात घेता वेळोवेळी त्यांची चाचणी केली जाते. मेकअप रूमचं निर्जंतूकीकरण, त्यांच्या अवतीभोवती विनामास्क न फिरणे या गोष्टी आवर्जून पाळल्या जातात. 'रंग माझा वेगळा' या मालिकेत कार्तिकी आणि दीपिका या दोन्ही तान्ह्या बाळांचा मूड बघूनच चित्रीकरण केलं जातं. त्यानुसारच क्लोज शॉर्ट्स घेतले जातात. तसंच त्यांच्या झोपेच्या वेळा बघून त्यानुसार चित्रीकरण केलं जात आहे. सेटवर त्यांच्यासाठी दुधाची सोयदेखील करण्यात आली आहे. मालिकेत ही बाळं आता मोठी झालेली दाखवणार असून त्यांचं वय साडे सहा वर्ष असं असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन बालकलाकारांचीही योग्य ती काळजी घेतली जात आहे, असं मालिकेच्या टीमकडून समजतं. 'सारेगमप लिटल चॅम्प्स' या कार्यक्रमात स्पर्धक मंडळी लहान मुलंच असल्यानं सेटवर प्रत्येकाकडूनच खबरदारी घेतली जात आहे. 'स्पर्धक सेटवरील कलाकार, वादक आणि तंत्रज्ञ सोडल्यास बाहेरच्या कोणाच्याही संपर्कात येणार नाहीत याची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे. तसंच वादक कलाकारांबरोबर तालीम करतानाही गर्दी होत नाही ना हे बघितलं जातं', असं स्पर्धकांचे पालक सांगतात. 'माझी तुझी रेशीमगाठ'मधील परी, 'आई कुठे काय करते'मधील निखिल, 'गाथा नवनाथांची'मधील गोरक्षनाथ या छोट्या कलाकार मंडळींना वेगळी मेकअप रूम देण्यात आली आहे. शूट नसेल तेव्हा मास्क घालणं, त्यांना दिलेल्या खोलीत पालक सोडल्यास इतर लोकांचा वावर कमीतकमी असणं, सुरक्षित अंतर या गोष्टींकडे प्रामुख्यानं लक्ष दिलं जात आहे. परी ही भूमिका साकारणारी मायरा अगदीच लहान असल्यानं चित्रीकरण तिच्या कलेने केलं जातं. तिच्या खण्या-पिण्याच्या, झोपेच्या वेळा सांभाळून शूट करण्यात येतं, अशी माहिती तिच्या पालकांनी दिली. बालकलाकारांसाठी सेटवर घरगुती जेवणदेखील उपलब्ध करून देण्यात येतं. सध्या सर्वत्र ऑनलाइन शाळा सुरू आहेत. सेटवर नेटवर्कची उत्तम सोय असल्यानं बालकलाकारांना शाळेला नियमित हजेरी लावता येत असून त्यांचा अभ्यासही होतोय. मालिकांमध्ये झळकणाऱ्या बालकलाकारांची योग्य ती काळजी घेत चित्रीकरण केलं जात आहे. मालिकेत दोन बाळं असल्यानं त्यांच्या चित्रीकरणाचा कालावधी कमी ठेवण्यात आला आहे. सेटवर या बाळांबरोबर त्यांचे पालकदेखील उपस्थित असतात. तसंच त्यांना वेगळी मेकअप रूम देण्यात आली आहे. त्या खोलीचं दर तासाला निर्जंतूकीकरण केलं जातं. चित्रीकरणाच्या वेळी बाळाला घेतानाच कलाकार मास्क काढतात. इतर वेळेस त्यांना हाताळताना मास्क घालणं बंधनकारक आहे. - अपर्णा केतकर, निर्माती, रंग माझा वेगळा सेटवर आल्यानंतर शारीरिक तापमान तपासलं जातं. आमच्यासह आमच्या बॅग्ससुद्धा सॅनिटाइज केल्या जातात. तसंच मला वेगळी मेकअप रूम देण्यात आली आहे. चित्रीकरण नसताना सगळेच मास्क घालून असतात. - अमृत गायकवाड, गोरक्षनाथ, गाथा नवनाथांची कार्यक्रमात आम्ही सगळेच लहान असल्यानं सेटवर सतत निर्जंतूकीकरण केलं जातं. माझे बाबाच मला गाणं शिकवत असल्यानं आम्ही आमच्या खोलीतच रियाज करतो. - श्रुती भांडे, स्पर्धक, सारेगमप लिटिल चॅम्प


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3keptGt