Full Width(True/False)

...तर कंगनाला अटक करावी लागेल; कोर्टानं व्यक्त केला संताप

मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौतच्याविरोधात ज्येष्ठ गीतकार यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. मंगळवारी, १४ सप्टेंबर २०२१ रोजी या प्रकरणाची सुनावणी होती. या सुनावणीला जावेद अख्तर आणि त्यांची पत्नी शबाना आझमी न्यायालयात उपस्थित होते. परंतु कंगना या सुनावणीला पुन्हा एकदा गैरहजर राहिली आहे. कंगनाच्या या वर्तणुकीवर न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. केवळ इतकेच नाही तर न्यायालयाने कठोर शब्दांत कंगनाला समज देत सांगितले आहे की, पुढील सुनावणीवेळी जर ती न्यायालयात हजर राहिली नाही तर तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले जाईल. न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी उपस्थित होते. कंगना न्यायालयात न आल्याबद्दल न्यायमूर्तींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच ही सुनावणी आता २० सप्टेंबरला होईल, असे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी हे देखील सांगितले की, त्या तारखेला कंगना जर न्यायालयात हजर राहिली नाही तर तिच्याविरोधात अटक वॉरंट काढले जाईल. याआधी कंगनाने या खटल्याप्रकरणाच्या सुनावणीला गैरहजर राहू देण्याची विनंती अर्जाद्वारे केली होती. परंतु न्यायालयाने तिची ही विनंती फेटाळून लावली होती. कंगनाचे वकील रिजवान यांनी तिचा वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर केला. यामध्ये असे नमूद केले होते की कंगनाला कोविड १९ ची लक्षणे दिसत आहे. गेल्या १५ दिवसांपासून ती आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी खूप फिरली आहे. यावेळी ती अनेक लोकांच्या संपर्कात आली आहे. त्यामुळे तिच्या वकीलांनी न्यायालयाकडून सात दिवसांचा अवधी मागितला आहे. तोपर्यंत कंगनाची प्रकृती ही सुधारेल आणि ती याच काळात तिची कोविड टेस्टही करून घेईल. कंगनाच्या वकिलांनी यावेळी असेही सांगितले की, न्यायालयात सुनावणीवेळी ती व्हर्चुअल माध्यमातूनही हजर राहू शकते. कंगनाच्या वकिलांना प्रत्युत्तर देताना जावेद अख्तर यांच्या वकिलांनी सांगितले की, सुनावणीला गैरहजर राहणे टाळण्यासाठी म्हणून ही सर्व कारणे दिली जात आहे. तर याप्रकरणी जावेद अख्तर प्रत्येक सुनावणीला स्वतः उपस्थित राहतात, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ही सुनावणी सुरू असताना जावेद अख्तर त्यांच्या वकिलांसोबत उभे होते. तर शबाना आझमी पाठीमागे बसल्या होत्या. गेल्यावर्षी सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर कंगनाने अनेक वृत्तवाहिन्यांना मुलाखती दिल्या होत्या. एका मुलाखतीमध्ये कंगनाने जावेद अख्तर हे हिंदी सिनेमासृष्टीमध्ये गटबाजी करता असा आरोप केला होता. तसेच याच मुलाखतीमध्ये तिने अख्तर यांच्याविरोधात आणखी ही काही आरोप केले होते. कंगनाने केलेल्या या आरोपांनंतर जावेद अख्तर कमालीचे नाराज झाले आणि त्यांनी तिच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3z7YYXh