Full Width(True/False)

स्मिता आणि धीरेंद्रनं लेकीचं केलं बारसं; नावाचा असा आहे सुंदर अर्थ

मुंबई : अभिनेत्री स्मिता तांबे आणि धीरेंद्र द्विवेदी यांना काही दिवसांपूर्वी कन्यारत्न झाले. स्मिता आणि धीरेंद्र यांनी आपल्या लाडक्या लेकीचे बारसे केले असून त्यांनी तिचे नाव वैदिका असे ठेवले आहे. वेदिका या नावाचा अर्थ आहे बुद्धीची देवता. हे नाव माझ्या नव-याने धीरेंद्र यांनी ठेवले असल्याची माहिती स्मिताने दिली आहे.सध्या स्मिता आणि धीरेंद्र त्यांच्या लेकीची सरबराई करण्यात खूपच व्यग्र आहेत. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर ते आपल्या लेकीची जरा जास्तच काळजी घेत आहेत. दरम्यान, अभिनेत्री स्मिताचा मित्र, अभिनेता, कवी जितेंद्र जोशी यानेही एक सुंदर पोस्ट या मायलेकींसाठी शेअर केली आहे. जितेंद्रने त्याच्या नजरेतून स्मिता कशी आहे यावर छान नोट लिहिली आहे. जितेंद्रने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'प्रिय स्मिता,आजवरच्या तुझ्या आयुष्यात तू जे काही पाहिलंस, काम केलंस, अनुभव घेतलास त्या सर्व गोष्टी करताना तू ठामपणे स्वतः सोबत उभी राहिलीस. तुझ्यासोबत हमिदाबाईची कोठी नाटकात काम करताना मी तुला कधीही सांगू शकलो नाही की तू किती प्रामाणिक आणि मेहनती नटी आहेस. आपली घट्ट मैत्री वगैरे नाही; ना आपण कधी तासनतास गप्पा मारल्या परंतु तुझं काहीतरी चांगलं होवो आणि तुला तुझ्या आयुष्यात सुख लाभो ही इच्छा माझ्या मनात होती. तू आई झाल्याची बातमी मला आज समजली आणि वैदिका सोबत तुझे फोटो पाहून मन भरून आलं. तुझ्या पुढच्या वैवाहिक, व्यावसायिक , सामाजिक आयुष्यात तुला भरभरून सुख आणि यश मिळो ही प्रार्थना...' याच पोस्टच्या शेवटी जितेंद्रने लिहिले आहे की, ' सुमित्रा भावेंच्या एका शॉर्टफिल्म मध्ये एक स्त्री गर्भार राहते तेव्हा तिला आपल्या बाळाविषयी काय वाटत असावं अशी कल्पना करून एक छोटी कविता लिहिली होती ती तुला आणि वैदिकाला अर्पण.' असे नमूद करत खूप सुंदर अशी कविता लिहिली आहे.... जितेंद्रने या दोघींचा खूपच सुरेख असा फोटोही शेअर केला आहे... दरम्यान, स्मिताने ती प्रेग्नेंट असल्याची माहिती सोशल मीडियावरून जुलै महिन्यात दिली होती. त्यानंतर तिच्या जवळच्या मैत्रिणी रेशम टिपणीस आदिती सारंगधर, फुलवा खामकर, अमृता संत यांनी डोहळजेवण दणक्यात साजरे केले होते. यावेळी सगळ्यांनी मिळून खूपच मज्जा केली होती. स्मिताच्या डोहाळजेवणाचा व्हिडिओ आदिती ने सोशल मीडियावरही शेअर केला होता. स्मिता आणि धीरेंद्र यांनी काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की,'आम्ही दोघेही जण बाळाची आतुरतेने वाट बघत आहोत. आमच्या दोघांच्याही आयुष्याची ही नवीन सुरुवात असणार आहे. त्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.' स्मिता आणि धीरेंद्र द्विदेवी यांचे २०१९ मध्ये लग्न झाले आहे. स्मिताने मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वामध्ये स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. स्मिताने जोगवा, ७२ माईल्स, देऊळ यांसारख्या मराठी सिनेमात काम केले आहे. तर सिंघम रिर्टन्स या लोकप्रिय हिंदी सिनेमातही तिने काम केले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Xf7ozn