मुंबई- 'कबीर सिंह', 'गिल्टी', 'गुड न्यूज', 'इंदू की जवानी' आणि 'शेरशाह' या चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री सध्या बॉलिवूडमधील हिट अभिनेत्रींपैकी एक आहे. कियारा लवकरच कार्तिक आर्यन सोबत 'भूल भुलैया २' चित्रपटात झळकणार आहे. कियाराकडे आणखीही काही चित्रपट आहेत. परंतु, बॉलिवूडमध्ये कोणताही गॉडफादर नसताना कियाराने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकली. वेगवेगळ्या भूमिका करत कियाराने बॉलिवूडमध्ये स्वतःच स्थान निर्माण केलं. परंतु, 'फगली' चित्रपट फ्लॉप झाल्यावर बॉलिवूडमध्ये तग धरून राहण्यासाठी कियाराला प्रचंड मेहनत करावी लागली होती. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत कियाराने तिच्या प्रवासाबद्दल सांगितलं. कियारा म्हणाली, 'यंदाची माझी दिवाळी बहुतेक 'जुग जुग जिओ' चित्रपटाच्या सेटवर जाणार. मी थोडे दिवस घरी येण्याचा प्रयत्न नक्की करेन पण सेटवरदेखील घरासारखंच वातावरण असतं. तिथेही दिवाळी साजरी होते. आता मला जे मिळतंय त्यासाठी मी देवाचे आभार मानते. तोच माझा गॉडफादर. बॉलिवूडमध्ये गॉडफादर नसताना मला अनेक चित्रपटात काम करायची संधी मिळतेय. त्यासाठी मी खूप मेहनत घेतलीये. माझा पहिला चित्रपट 'फगली' आपटल्यावर मला काम मिळणं बंद झालेलं. मी दररोज निर्मात्यांकडे जायची. ऑडिशन द्यायची आणि परत यायची. अनेकदा समोरचा तुमचा अभिनय बघण्याऐवजी तुम्ही केलेला चित्रपट चालला की नाही ते बघतो.' कियारा पुढे म्हणाली, 'बॉलिवूडमध्ये टिकून राहणं अवघड आहे. मी रोज नवं काहीतरी शिकते. तुम्ही बॉलिवूडमध्ये आल्यावर तुम्हाला लगेच यश मिळेल ही भावना चूक आहे. तुमचा गॉडफादर असेल तर तो तुम्हाला चित्रपट मिळवून देईल. पण यश नाही देऊ शकत. यश मिळवण्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. इथे चांगले दिवस येतात तसे वाईट दिवसही येतात. फ्लॉप चित्रपटानंतर मला काम मिळणं बंदच झालं होतं. पण एके दिवशी 'धोनी' चित्रपट मिळाला आणि माझं आयुष्य बदललं. गोष्टी खूप बदलल्या आणि त्यामुळेच मी आज इथे आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wg5OtQ