लग्नानंतरचा पाडवा १९९८ साली लग्नानंतर आम्ही अचानक मुंबईला शिफ्ट झालो. त्यावेळी आमच्याकडे घराचं भाडं भरण्याइतकेही पैसे नव्हते. त्यावेळी प्रसादला प्रत्येक प्रयोगाला फक्त ७५ रुपये मिळायचे. पहिला पाडवा आला आणि प्रसाद म्हणाला की माझ्याकडे तुला भेटवस्तू देण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत. तो स्वतःला खूप अपराधी समजत होता. मग मी त्याला म्हणाले काही हरकत नाही. पण दिवाळीच्या दरम्यान पुण्यात जाऊन प्रसादनं रात्रभर जागून चार-पाच दिवस गाण्याचे कार्यक्रम केले. मग त्यातून आलेल्या मानधनातून त्यानं मला एक साडी घेतली. मला समुद्रकिनाऱ्यावर फिरायला आवडत असल्यामुळे टॅक्सीनं तो मला तिथे घेऊन गेला. हा माझ्या कायम आठवणीत राहणारा पाडवा आहे. - मंजिरी प्रसाद ओक अविस्मरणीय भेट खरं तर अधूनमधून आदेश मला भेटवस्तू देत असतात. त्यामुळे पाडव्याला ते नेमकी कोणती भेटवस्तू देणार ही उत्सुकता नेहमीप्रमाणे यंदाही आहे. एकदा पाडव्याला त्यांनी मला अचानकपणे हिऱ्यांचा छोटासा नेकलेस दिला होता. तो नेकलेस छोटा असला तरी माझ्यासाठी मोठाच होता. कारण माझ्या हिऱ्यासारख्या नवऱ्यानं तो हिऱ्यांचा नेकलेस दिला होता. पाडव्याच्या दिवशी सरप्राइज म्हणून दिलेली ही भेटवस्तू कायम लक्षात राहणारी आहे. - घरासाठी भेटवस्तू आम्ही नवीन घर घेतलं तेव्हा त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तू घ्यायच्या असं ठरवलं होतं. सणांच्या निमित्तानं आम्ही एकमेकांसाठी नाही तर घरासाठी भेटवस्तू घ्यायचो. त्यामुळे लग्नानंतरचे अनेक सण या भेटवस्तूंमुळेच कायम लक्षात राहिले आहेत. सण साजरा करताना अनेकदा अनावश्यक वस्तूंची खरेदी होते. पण आपण थोडं थांबून नीट विचार करून गरजेच्या वस्तू घेतल्या तर आपला खर्च वाचतो, खरेदी होते आणि गरजाही भागवल्या जातात. समोरच्या व्यक्तीला उपयोगी अशी भेटवस्तू दिली तर त्याला काहीतरी महत्त्व आहे, असं मला वाटतं. म्हणूनच घरासाठी घेतलेल्या भेटवस्तू आम्हा दोघांच्याही स्मरणात राहणाऱ्या अशा आहेत. - ऐश्वर्या अविनाश नारकर मोठं सरप्राइज २०२१ची आपल्यासाठी खास असेल असं हेमंत म्हणाला होता आणि त्यानं आमच्या आगामी 'झिम्मा' या चित्रपटाची १९ नोव्हेंबर ही प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. दिवाळी पाडव्याच्या आधीच मला मिळालेली ही उत्तम भेटवस्तू आहे, असं मी मानते. या चित्रपटाच्या निमित्तानं मी पहिल्यांदाच निर्मातीच्या भूमिकेत असल्यामुळे ही दिवाळी आणि हे वर्ष माझ्यासाठी खूप खास असणार आहे. लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळी पाडव्याच्या वेळेस आम्ही दोघेही कामात व्यग्र होतो आणि त्यामुळे भेटवस्तू मिळण्याची मी अपेक्षाच केली नव्हती. पण त्या पाडव्याच्या दिवशी त्यानं मला माझ्या आवडीचे कानातले भेटवस्तू म्हणून दिले आणि ते माझ्यासाठी खूप मोठं सारप्राइझ होतं. - क्षिती जोग संकलन : मुंबई टाइम्स टीम


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3o3wo5I