सुशांतनं आत्महत्या केली त्यावेळी घरात नोकर, क्रिएटिव्ह मॅनेजर आणि आणखी एक व्यक्ती उपस्थित होता. सकाळी ६.३० वाजता सुशांत झोपेतून उठला. सकाळी ९.०० वाजता त्यानं एक ज्युस घेतला, काही वेळ आपल्या बहिणीशी संवाद साधला आणि त्यानंतर तो आपल्या रुममध्ये निघून गेला. रुम त्यानं आतून बंद केला. जेवणासाठी नोकर विचारणा करायला गेला तरी त्यानं दरवाजा उघडला नाही. २-३ तासांनंतर मॅनेजरनं सुशांतच्या बहिणीला फोन केला. बहिण आल्यानंतर चावीवाल्याला बोलावून दरवाजा उघडला गेला तेव्हा सुशांत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. नोकरानं मुंबई पोलिसांना फोन करून या घटनेची माहिती दिली.
मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केलीय. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. परंतु, पोलिसांना अद्याप कोणतीही संशयास्पद गोष्टही आढळलेली नाही. पोलिसांना दुपारी २.०० वाजल्याच्या सुमारास या घटनेबद्दल माहिती मिळाली होती. सुशांतचा मृतदेह त्यांना बेडवर आढळला. त्याच्या बेडरुमधल्या पंख्याला हिरव्या रंगाचा कपडा लटकलेला होता, याच कपड्याचा सुशांतनं गळफास म्हणून वापर केला होता. पोस्टमॉर्टेमनंतर सुशांतचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? हे समोर येईल असं पोलिसांनी म्हटलंय.
दुसरीकडे, क्राईम ब्रान्चची एक टीम सुशांतच्या घरी दाखल झालीय. क्राईम ब्रान्च सुशांतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीही याबाबतीत चर्चा करून माहिती घेणार आहेत. तसंच सुशांत आर्थिक बाबींमुळे चिंतेत होता का? त्याच्यासमोर काही आर्थिक समस्या होत्या का? याबाबतीत पोलिसांकडून तपास सुरू आहे. यासाठी सुशांतचे बँक अकाऊंटचा तपशील मागवण्यात आलाय. रविवार असल्यानं बँका बंद आहेत. त्यामुळे सोमवारी बँक अकाऊंटची माहिती पोलिसांच्या हाती लागू शकते.
सुशांतच्या कुटुंबीयांपर्यंत त्याच्या आत्महत्येची बातमी टीव्हीवरूनच पोहचली. सुशांतच्या मामाने यासंबंधी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. कुटुंबियांच्या मते, गेल्या काही दिवसांपासून सुशांतला एका बंगाली मुलीकडून त्रास दिला जात होता. सुशांतला भेटण्यासाठी त्याचे वडील काही दिवसांनी मुंबईला येणार होते. सुशांतच्या मामांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केलीय.
मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वृद्ध वडिलांची - के के सिंह यांची तब्येत खालावल्याचं समोर येतंय. सुशांतचे वडील निवृत्त आहेत आणि पाटण्यात एकटेच राहतात. सुशांतच्या आईचं निधन झालंय. त्याच्या चार बहिणींपैंकी एकीचा मृत्यू झालाय. तर तीन बहिणी आपल्या पती आणि कुटुंबासोबत राहतात. सुशांतचे वडील सोमवारी सकाळी ११.०० वाजता विमानानं मुंबईला दाखल होणार आहेत. त्यांच्यासोबत सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजप आमदार नीरज बबलू हेदेखील असणार आहेत
सुशांतचा चुलत भाऊ पन्ना सिंह यांच्या दाव्यानुसार, सुशांत सिंह राजपूत याच वर्षी बोहल्यावर चढणार होता. येत्या नोव्हेंबर महिन्यात त्याच्या विवाह सोहळ्याचं आयोजन करण्याची कुटुंबीयांची तयारी सुरू होती. परंतु, सुशांत कुणासोबत विवाहबद्ध होणार होता, हे मात्र त्यांनी गुलदस्त्यातच ठेवलंय. गेल्या आठवड्यात सुशांत सिंहचे वडील के के सिंह यांनी सुशांतचं नोव्हेंबर महिन्यात लग्न आहे, मुंबईला जायचंय, तयारी करून ठेवा असं म्हटल्याचंही पन्ना सिंहनं म्हटलंय
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Y1Qv8Y