मुंबई- बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर घराणेशाही या विषयाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. बॉलिवूडप्रमाणे मराठी सिनेसृष्टीमध्येही थोड्या- अधिक प्रमाणात या गोष्टी चालतात असा नवा वाद सुरू झाला आहे. यात आताचे नवीन कलाकार ज्येष्ठ कलाकारांना मान देत नसल्याचे आरोप होत आहेत. मराठी तारकांच्या फेसबुक अकाउंटवर यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त करत अभिनेता शशांक केतकरवर आरोप केले. शशांकच्या कुसूम मनोहर लेले नाटकाला त्या गेल्या असता शशांकने त्यांना ओळख दाखवली नसल्याचं त्यांनी या फेसबुक लाइव्हमध्ये म्हटलं. यावर शशांकने महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. 'एका गैरसमजूतीतून या सर्व गोष्टी झाल्या. एका स्टेटमेन्टमुळे मला जो मानसिक त्रास होत आहे त्याचं काय? लोक फार एकतर्फी विचार करतात.. कोणतीही पार्श्वभूमी माहीत नसताना या चर्चा केल्या जातात याचं फार वाईट वाटतं. एक कलाकार म्हणून आम्ही अनेक गोष्टी सोडून देत असतो. पण त्याचा आमच्या मनावर किती परिणाम होतो याचं मोजमाप कोण करणार.. ही गोष्ट एवढी मोठी नाही जेवढी ती केली जात आहे. लोकांना कोणत्याही कलाकाराच्या स्ट्रगलबद्दल आणि त्याच्या कुटुंबियांबद्दल, भूतकाळाबद्दल माहीत नसतं. तर त्यांनी जिव्हारी लागणाऱ्या कमेन्ट करणं किती योग्य आहे याचाही नेटकऱ्यांनी विचार करावा. कोणाच्याही खासगी आयुष्याबद्दल माहीत नसताना त्यांच्यावर थेट हल्ला करणं अत्यंत चुकीचं आहे. कलाकारांनाही मन आहे.. त्यांनाही भावना आहेत याचा साऱ्यांनी विचार करावा.' शशांक केतकरने दिली प्रतिक्रिया- 'नमस्कार. सगळ्यातआधी, माझ्याकडून असं काही घडलं असेल तर मी मनापासून माफी मागतो. मी वयानी आणि अनुभवांनी लहान आहे आणि याची मला पूर्ण कल्पना आहे. पूजा ताई नाटकाला आली होती आणि आम्ही बोललो ही होतो, असं मला तरी आठवतंय. असो... Respect बद्दल बोलायचं झालं तर मी माझ्या लहानपणापासून प्रत्येकाचाच respect करतं आलो आहे... Irrespective of वय आणि अनुभव. जे मला personally ओळखतात ते माझ्या अपरोक्षसुद्धा हे नक्कीच सांगू शकतील की मी असा नाही. माझ्या नाटकाला आलेला प्रत्येक प्रेक्षक हे सांगू शकेल की प्रयोग संपल्यावर, अगदी शेवटचा प्रेक्षक भेटून बाहेर पडल्या शिवाय मी कधीच theatre मधून बाहेर पडत नाही. माझ्या आई बाबांकडून, शिक्षकांकडून, आजू बाजूच्या सगळ्याच कलाकारांकडून मी कायमच आदर आणि प्रामाणिक पणा शिकत आलो आहे. मी ताई ला personally phone सुध्धा करेन, तिच्याशी बोलेन. या पेक्षा अधिक कुणालाही कुठलच explanation द्यावं असं मला वाटतं नाही. Comments करणाऱ्या सर्वांना एक विनंती आहे, personally तुम्ही एखाद्याला ओळखत नसाल तर नुसत्या ऐकलेल्या गोष्टींवरून त्या माणसाचे संस्कार, त्याचा पैसा, त्याची लायकी, त्याची प्रगती, या विषयी authority नी बोलून त्या विषयी निर्णय देऊन मोकळे होऊ नका. मला आता हा विषय वाढवायचा नाहीये. मी माझी प्रामाणिक प्रतिक्रिया देणं हे माझं मी कर्तव समजतो, जे मी पार पाडले आहे. सर्वच senior actors ना माझा प्रेमाचा नमस्कार. तुमचे आशीर्वाद कायमच पाठीशी राहतील याची खात्री आहे. शशांक केतकर.' फेसबुक लाइव्हमध्ये काय म्हणाल्या होत्या पूजा पवार- फिरूनी नवे जन्मेन मी या मालिकेमध्ये पूजा यांनी शशांकच्या आईची भूमिका साकारली होती. कुसूम मनोहर लेले नाटक पाहून झाल्यानंतर त्या टीमला भेटायला गेल्या असता त्यांना शशांकने ओळख दाखवली नसल्याचं म्हटलं. यासोबतच असे अनेक कलाकार आहेत जे ज्येष्ठ कलाकारांचा मान ठेवत नाहीत. नव्या कलाकारांनी सिनिअर कलाकारांना मान द्यायला शिकलं पाहिजे. यातूनच ते पुढे जातील.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fUxMlF